कोरोना : लशीचे दोन्ही डोस घेऊनही मुंबईतील 'या' डॉक्टरला दोन वेळा झाला कोरोना

डॉ. सृष्टी हेलारी

फोटो स्रोत, Dr. Shrishti Helari

फोटो कॅप्शन, डॉ. सृष्टी हेलारी
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मला तीन वेळा कोरोनासंसर्ग झालाय. कोव्हिड-19 विरोधी लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दोनवेळा मी पॉझिटिव्ह आले. त्या क्षणी मला जबरदस्त धक्का बसला. विश्वासच बसत नव्हता. हे कसं शक्य आहे?"

मुंबईच्या 26 वर्षीय डॉ. सृष्टी हेलारी यांना गेल्या 13 महिन्यात तब्बल तीनवेळा कोरोनाची लागण झालीये.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोरोनाविरोधी कोव्हिशिल्ड लशीचे दोन्ही घेतल्यानंतरही डॉ. सृष्टी यांना दोनवेळा कोरोनासंसर्ग झालाय.

तज्ज्ञ सांगतात, लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कोव्हिड-19 संसर्ग झालाच, तर परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता कमी आहे.

तर भारत सरकारच्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

'लशीचे दोन डोस झाल्यानंतर दोनवेळा पॉझिटिव्ह आले'

डॉ. सृष्टी हेलारी मुंबईच्या वीर सावरकर रुग्णालयात कोव्हिड वॉर्डमध्ये ड्युटी करत होत्या. या रुग्णालयावर मुंबई महापालिकेच्या मीठागर कोव्हिड सेंटरची जबाबदारी होती.

डॉ. सृष्टी म्हणतात, "8 मार्चला मी कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतला. तर 29 एप्रिलला मला दुसरा डोस देण्यात आला."

पण कोरोनाविरोधी लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका महिन्याने त्यांना कोरोनाची लागण झाली.

डॉ. सृष्टी हेलारी

फोटो स्रोत, Dr. Shrishti Helari

फोटो कॅप्शन, डॉ. सृष्टी हेलारी

"29 मे रोजी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मला दुसऱ्यांदा लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर 11 जुलैला तिसऱ्यांदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला," असं डॉ. सृष्टी सांगतात.

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली होती. डेल्टा व्हेरियंट एप्रिल-मे महिन्यात झपाट्याने पसरू लागला होता. त्या पुढे म्हणाल्या, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला होता.

लसीकरणानंतर झालेल्या संसर्गाला वैद्यकीय भाषेच ब्रेक-थ्रू इन्फेक्शन असं म्हणतात.

डॉ. सृष्टी पुढे सांगतात, "माझा अंदाज आहे की मला कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाली असावी. हा व्हायरस झपाट्याने म्युटेट होतोय."

'मला वाटलं रिपोर्ट चुकीचा असेल'

मे महिन्यात डॉ. सृष्टी हेलारी यांना कोरोनाची लक्षणं दिसून येत होती.

त्याचवेळी, कोरोनाचे नव-नवीन व्हेरियंट आढळून येत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली.

"खरंतर, मी कोरोनाविरोधी लशीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे, मला वाटलं, मला कोरोनासंसर्ग होणार नाही. ही लक्षणं साध्या तापाची असतील," त्या पुढे म्हणाल्या.

त्यांना थोडं तापासारखं वाटत होतं. थोडा सर्दी, खोकलाही होता.

डॉ. सृष्टी म्हणतात, "कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्यानंतर मला वाटलं, रिपोर्ट चुकीचा असेल, काहीतरी चूक झालीये." पण, काही दिवसातच वास येईनासा झाला.

तिसऱ्यांदा झाला कोरोनासंसर्ग

मे महिन्यातील कोरोना संसर्गावर यशस्वी मात करून डॉ. सृष्टी बऱ्या झाल्या आणि कामाला सुरूवात करणार होत्या.

त्या सांगतात, "घरातील सर्वांचा लशीचा दुसरा डोस घेऊन 21 दिवस उलटले होते. त्यामुळे, शरीरात अॅन्टीबॉडीज तयार होणं सुरू झालं होतं."

पण जुलै महिन्यात हेलारी कुटुंबाला पुन्हा जबरदस्त धक्का बसला. डॉ. सृष्टी यांची कोरोना चाचणी तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली. तर, कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

"तिसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला, तेव्हा लक्षणं फार नव्हती. पण, पुन्हा-पुन्हा लागण होत असल्याने मी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी मला योग्य उपचार घ्यायचे होते. अँटी व्हायरल औषधं घ्यायची होती. जेणेकरून इंन्फेक्शन पूर्णत: नष्ट होऊन जाईल," त्या सांगतात.

डॉ. सृष्टी हेलारी

फोटो स्रोत, Dr. Srishti Helari

फोटो कॅप्शन, डॉ. सृष्टी हेलारी

"तिसऱ्यांदा झालेल्या कोरोनासंसर्गाचं कारण दुसऱ्या संसर्गाचं रिअॅक्टिव्हेशन असावं, असं मला वाटतंय," डॉ. सृष्टी म्हणाल्या.

योग्य उपचार घेतले नाहीत, तर, संसर्ग पुन्हा होण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले.

तिसऱ्यांदा कोरोना झाल्यामुळे भीती वाटली?

लस घेतल्यानंतर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्याने भीती वाटली? या प्रश्नावर त्या म्हणतात, "मी स्वत: कोव्हिड वॉर्डमध्ये काम केलंय. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार केलेत. त्यामुळे भीती अजिबात वाटली नाही."

मला कुटुंबीयांची काळजी होती. भावाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं, असं त्या सांगतात. आता हेलारी कुटुंबीयांनी कोरोनावर मात केलीय.

डॉ. सृष्टी यांच्या नमुन्याचं होणार जिनोम सिक्वेंसिंग

डॉ. सृष्टी यांना सर्वात पहिल्यांदा जून 2020 मध्ये कोरोनासंसर्ग झाला होता. कोव्हिड रुग्णालयात काम करताना, त्यांना लागण झाली होती. गेल्या 13 महिन्यांच्या कालावधित, त्या तीन वेळा कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्या आहेत.

डॉ. सृष्टी यांना तीन वेळा कोरोनाची लागण का झाली? हे शोधण्यासाठी त्यांच्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.

"माझे नमुने व्हेरियंट चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यामुळे मला मे आणि जुलै महिन्यात कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटची लागण झाली. याची माहिती मिळण्यास मदत होईल," डॉ. सृष्टी म्हणतात.

'लशीमुळे मी आणि कुटुंबीय सुरक्षित'

तीन महिने कोव्हिड सेंटरमध्ये काम केल्यानंतर आणि तीन वेळा कोरोनाशी झुंज दिल्यानंतर आता डॉ. सृष्टी यांनी पुढील अभ्यासासाठी ब्रेक घेतलाय.

डेल्टा प्लस व्हेरियंट

फोटो स्रोत, Getty Images

"लशीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे, मी आणि कुटुंबीय सुरक्षित आहोत. कोरोनासंसर्गाचा फटका आमच्या फुफ्फुसांना बसला नाही," त्या पुढे सांगतात.

कोव्हिडमुक्त झाल्यानंतर लोकांना श्वास घेण्याचा त्रास होतोय. काही लोकांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी होतेय. पण, लस घेतल्यामुळे डॉ. सृष्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढचा त्रास झाला नाही.

कोरोनाविरोधी लस खूप प्रभावी आहे, त्या म्हणतात.

'लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग होऊ शकतो'

तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयातील इंटर्नल मेडिसिनतज्ज्ञ डॉ. बेहराम पारडिवाला सांगतात, "लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झालेले बरेच रुग्ण मी पाहिले आहेत. प्रत्येक वयोगटातील रुग्णांना लस घेतल्यानंतर कोव्हिड झाल्याचं आढळून आलंय. याला ब्रेक-थ्रू इंन्फेक्शन असं म्हणतात."

संसर्गजन्य आजारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, लस घेतल्यानंतर होणाऱ्या संसर्गाची तीव्रता फार कमी असते. लक्षणं फार कमी असतात आणि लवकर बरे होतात. या रुग्णांचा आजार गंभीर बनत नाही.

केंद्र सरकारने एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या 0.04 टक्के लोकांमध्ये कोरोनासंसर्ग आढळून आलाय. तर, कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये हे प्रमाण 0.03 एवढं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)