जेव्हा येडियुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांच्या कानाखाली लगावली होती

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी बंगळुरूहून

कर्नाटकमध्ये झालेला पराभव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वीकारला आहे.

पंतप्रधानांपासून ते आमच्या तमाम नेत्यांपर्यंत, सर्वांनी खूप प्रयत्न केले, तरीही हा काँग्रेसला विजय मिळताना दिसतोय, असं ते म्हणाले.

तसंच आम्ही या निकालाचं विश्लेषण करू, कुठे कमी पडलो याचा विचार करू आणि पक्ष संघटना आणखी कशी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू. लोकसभेसाठी आम्ही आणखी जोमाने काम करू, असं बोम्मई यांनी म्हटलंय.

येडीयुरप्पा यांना हाटवून भाजपने 28 जुलै 2021ला बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केलं होतं.

बसवराज बोम्मई हे बीएस येडियुरप्पा यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. बोम्मई हे अतिशय संयमी देखील समजले जातात. त्यांच्या या संयमाचेच फळ त्यांना मिळाल्याची चर्चा आहे.

काही वर्षांपूर्वी बी. एस. येडियुरप्पा यांनी बोम्मई यांच्या कानाखाली लगावली होती पण तरी देखील त्यांनी त्यांचा संयम ढळू नव्हता दिला असं म्हटलं जातं.

जनता दल सेक्युलर सोडून भाजपमध्ये आलेले बसवराज हे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहेत.

याआधी येडियुरप्पा यांनी आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी बसवराज यांचं नाव सुचवलं होतं.

त्यांच्या नावाची घोषणा करण्याआधी धर्मेंद्र प्रधान आणि किशन रेड्डी यांनी कर्नाटक भाजपचे प्रभारी अर्जुन सिंह यांच्यासोबत कोअर कमिटीची एक बैठकही बोलावली होती.

जेडीएस ते भाजप- बोम्मईंचा प्रवास

61 वर्षीय बोम्मई हे लिंगायत समाजातील नेते आहेत.

जनता दल सेक्युलरमध्ये निराश झालेल्या बोम्मई यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. पक्षप्रवेशासंबंधी काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांकडून काहीतरी निरोप मिळेल या आशेवर त्यांनी जवळपास आठवडाभर वाट पाहिली होती.

तिथे काही हाती नाही लागल्यानंतर ते येडियुरप्पा यांना भेटायला गेले. तिथे वेटिंग रुममध्ये थांबून ते येडियुरप्पांची वाट पहायचे.

त्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं होतं, "मी काहीच बोलायचो नाही. तिथे शांतपणे बसून राहायचो. एक दिवस एक व्यक्ती येडियुरप्पांना तिकिटासाठी हैराण करत होता. तेव्हा त्यांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं- त्यांना पाहा...किती संयम ठेवून वाट बघताहेत."

येडियुरप्पांचा राजीनामा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2021 ला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

"मी राजीनामा कुठल्याही दु:खात देत नाही, आनंदाने राजीनामा देतोय," असं भावनिक होत येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती.

कर्नाटकमधील भाजप सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमात बी. एस. येडियुरप्पा बोलत होते.

भारतीय जनता पक्षानं 2019 साली 75 वर्षांच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचं धोरण सोडलं आणि बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं होतं.

त्यापूर्वी 2008 साली येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री होते.

तीन वर्षांतच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्होट बँकेचं मोठं नुकसान केलं.

कर्नाटकच्या राजकारणातील अनुभवी नेता आणि लिंगायत समाजातील नेता म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांचं राज्यात वर्चस्व राहिलं आहे.

बोम्मई एक संयमी व्यक्तिमत्व

बसवराज बोम्मई हे त्यांचे वडील सोमप्पा रायप्पा बोम्मई यांच्याप्रमाणेच एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

येडीयुरप्पा यांनी भाजपमधून बाहेर पडून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी बोम्मई यांनी येडीयुरप्पांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला होता.

त्यावेळी त्यांनी KJP मध्ये प्रवेश केला नाही. उलट नरेंद्र मोदी यांनी 2013 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला त्यावेळी त्यांनी येडीयुरप्पांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली होती.

कर्नाटक लोकायुक्तांकडून ये़डीयुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला त्यावेळी बोम्मई यांनी जुलै 2011 मध्ये त्यांना पक्षादेश मानण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण येडीयुरप्पा यांनी त्यांचं न ऐकता त्यांच्याच थोबाडीत लगावली होती, अशा बातम्या त्यावेळी छापून आल्या होत्या.

तुमच्या वडिलांनी कधी तुम्हाला लहानपणी थोबाडीत मारली का, असा प्रश्न मी बोम्मई यांना केला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं. "मला माझ्या वडिलांनी कधीच मारलं नाही. पण त्यांनी मारलं."

अखेर, संयमाचं फळ बोम्मई यांना आता मिळालं.

पण 2023 च्या निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना नाकारलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)