गणपतराव देशमुख एकाच पक्षातून 11 वेळा कसे निवडून आले होते?

फोटो स्रोत, Twitter / BhaiJagtap1
सोलापूर येथे आज (13 ऑगस्ट) डॉ.गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा पार पडला.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की,"गणपतरावांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर कळतं की ते म्हणजे राजकारणातलं शाश्वत सत्य होते. परिवर्तनाचे सगळे नियम बाजूला सारुन त्यांनी शेवटपर्यंत एका विचारासाठीच संघर्ष केला."
फडणवीस पुढे म्हणाले, "जसं एकलव्यानं धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं, तसंच मला गणपतरावांकडून शिकायला मिळालं. आम्हाला आधी विदर्भाचं दुखणं कळायचं. पण महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचं दुखणं गणपतरावांमुळे आम्हाला समजलं.
"गणपतराव देशमुखांचं मोठं स्मारक विधीमंडळात होईल, याची मी ग्वाही देतो. आबासाहेबांनी ज्या शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी आयुष्य खर्ची घातले, त्यांच्या भल्यासाठी काम करण्याची शक्ती आपल्याला मिळो."
शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, "महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गणपतरावांनी आगळंवेगळं काम दाखवलं. गणपतराव 1962 साली महाराष्ट्राच्या विधानभवनात आले.
देवेंद्र फडणवीसांना मी सांगू शकतो की, सांगोला हा एकमेव मतदारसंघ असा आहे जिथं सामान्य जनतेनं काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाशिवाय दुसरा कोणताही पक्ष स्वीकारला नाही."
सांगोला तालुक्याचं दुष्काळग्रस्त तालुका हे चित्र बदलावं असा गणपतरावांचा हट्टा होता. त्यासाठी ते सतत संघर्ष करत राहिले, असंही पवार पुढे म्हणाले.
सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार
महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं.
विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी 2019मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला.
11 वेळा तुम्ही आमदार म्हणून कशामुळे निवडून येऊ शकले, एबीपी माझाच्या कार्यक्रमात विचारलेल्या या प्रश्नावर गणपतराव देशमुख यांनी म्हटलं होतं, "यात जादू वगैरे काही नाही. लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद यामागे आहेत.
"माझी क्षमता आणि कुवत बघून मी स्वत:च्या मतदारसंघापुरतं मर्यादित राहायचं ठरवलं. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांच्यासाठीच काम करायला वेळ कमी पडतो. विधानसभेचं अधिवेशन संपलं की मी प्रत्येक गावाला वर्षातून किमान दोन वेळा भेटी देतो. विधानसभेत झालेले निर्णय सांगतो. लोकांशी संपर्क न चुकता ठेवतो आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतो."
1962 साली गणपतराव देशमुखांनी शेकापच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता ते सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्त्व करत होते.

फोटो स्रोत, Twitter/@GanpatravD
1972 साली काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी केला, तर 1995 साली काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी पराभव केला. हे दोन पराभव वगळता त्यांनी सांगोल्यातून सतत विजय मिळवला.
आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकांवरच काढली. मात्र, 1978 आणि 1999 सालची सरकारं त्याला अपवाद राहिली. कारण 1978 साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती. तर 1999 साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात 55 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा 2017 साली सन्मान झाला होता.
गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै 2021 रोजी निधन झालं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








