शरद पवार की ममता बॅनर्जी : राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट कोण बांधणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडींच्या आणि भेटीगाठींच्या सिलसिल्यावरुन हा प्रश्न कुतुहलाचा बनणं स्वाभाविक आहे की, देशात विरोधकांची एकत्र आघाडी बनवण्याचे प्रयत्न तर होत आहेत, पण त्याचं नेतृत्व शरद पवार करणार की ममता बॅनर्जी?
तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ममता बॅनर्जी परत कोलकात्याला गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, नितीन गडकरी, सोनिया गांधी अशा अनेक नेत्यांना भेटल्या. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीमागून भेटी झाल्या. पण शरद पवारांची आणि ममतांची भेट झाली नाही. दोघांच्याही वतीनं ही भेट लवकरच होईल असं सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून, विशेषत: बंगालमधल्या भाजपाच्या पराभवापासून, देशामध्ये 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपाविरोधी आघाडीची चर्चा सुरु आहे.
कोरोनाच्या भयावह दुसऱ्या लाटेनंतर, वाढलेल्या महागाई आणि बिकट अर्थव्यवस्थेनंतर मोदी सरकारवर टीका होत असताना नव्या आघाडीसाठी उघडपणे होत असलेल्या हालचाली नव्या समीकरणांची शक्यता दाट करताहेत. ही शक्यता सध्या तरी दोन नावांभोवती फिरते आहे. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरं म्हणजे ममता बॅनर्जी.
दोघांनीही आपापल्या राजकारणाच्या पद्धतीप्रमाणे आपापल्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता रोखली आहे. पवारांनी महाराष्ट्रात बेरजेचं राजकारण केलं, तर ममतांनी बंगाली पद्धतीचं आक्रमक राजकारण करत तिसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवली.
जेव्हा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या दोन व्यक्तिमत्वांच्या लढाईत मोदींची सातत्यानं सरशी होतांना दिसते आहे, तेव्हा 2024 मध्ये विरोधकांचा चेहरा कोण हा प्रश्न महत्वाचा ठरतो.
त्यावेळेस शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या हालचाली लक्ष वेधून घेत आहेत.
'राष्ट्र मंच'च्या निमित्तानं पवारांनी दिल्लीत अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची आणि महत्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. तर दिल्ली दौऱ्यात ममतांनी तेच केलं.
ममतांसोबत बंगालची लढाई लढणारे प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांत अनेकदा पवारांना भेटले आहेत. त्यामुळेच आता प्रश्न हा आहे की राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट कोण बांधणार, शरद पवार की ममता बॅनर्जी?
'हे उद्योग मी पूर्वी अनेकदा केले आहेत'
शरद पवारांचं अनेक वर्षांपासून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिलं आहे. कॉंग्रेसमध्ये असतांनाही आणि बाहेर पडल्यावरही. मोदींच्या काळात भाजपाची सलग दोन वेळा बहुमतातली सत्ता आल्यावरही पवारांच्या नावाची चर्चा कधीही थांबली नाही.
जेव्हाही कॉंग्रेस आणि भाजपा वगळत्या तिसऱ्या आघाडीची चर्चा होते, तेव्हा पवारांचं नाव पुढं येतं. त्यामुळेच जेव्हा गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा पवारांच्या भेटीगाठी सुरु झाल्या तेव्हा ते नव्या आघाडीची रचना करताहेत का असं पुन्हा विचारलं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, NILESH DHOTRE
स्वत: शरद पवारांनी यापूर्वीही आणि यावेळेसही ते असं काही करत असल्याचं नाकारलं आहे. दिल्लीत 'राष्ट्र मंचा'च्या बैठकीनंतर पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलतांना आपण असे उद्योग पूर्वी बरेच केले असून आता करणार नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
अर्थात त्यांच्याच पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी मात्र देशात भाजपाविरोधी आघाडी करण्यासाठी शरद पवार अनेकांशी बोलत असल्याचं म्हटलं होतं.
पण जर देशाच्या राजकारणातली सद्य परिस्थिती लक्षात घेतली, तर भाजपाविरोधी राजकीय आघाडी करण्याची ताकद आणि मान्यता असणाऱ्यांमध्ये शरद पवारांचं नाव वरचं आहे. त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव तर आहेत, पण आघाड्यांच्या राजकारणात ते मुरलेलेही आहेत.
देशातल्या सगळ्या पक्षांशी आणि नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. सत्तेत असोत वा नसोत एकाच वेळेस नरेंद्र मोदींपासून सोनिया गांधींशी त्यांचा संवाद सुरु असतो. आघाडीच्या राजकारणात सर्वांना सोबत घेण्याची मानसिकता आहे. बेरजेचं लवचिक राजकारण त्यांनी सद्य राजकारणात असं करुन दाखवलं की तीन दशकं ज्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राजकारण केलं त्या शिवसेनेसोबत त्यांनी सरकार स्थापन करुन दाखवलं. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नवे मित्र जोडणं आणि त्यांना सोबत ठेवणं हे पवार करु शकतात.

फोटो स्रोत, Twitter/PawarSpeaks
निवडणुक प्रचार असो वा अधिवेशन काळातलं राजकारण, शरद पवार सातत्यानं कार्यरत असतात. पण त्यांचं वय हाही आघाडीच्या नव्या हालचालीमध्ये मुद्दा होऊ शकतो. त्याशिवाय दिल्लीच्या वर्तुळात 'नेमकं त्यांच्या मनात काय आहे आणि काय करतील सांगता येत नाही' अशी अनेक वर्षांची प्रतिमा हाही एक मुद्दा आहे. पण 2014 च्या निवडणुकीपेक्षा शरद पवार हे 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत विरोधकांचे उमेदवार असू शकतात अशीही एक चर्चा आहे. ही निवडणूक चुरशीची होऊ शकते असाही एक कयास आहे. त्यामुळे 2024 च्या अगोदर पवार 2022 मध्येच विरोधकांची मोट बांधताहेत का असाही प्रश्न आहे.
बंगालनंतर आता देशात 'खेला होबे'
एकीकडे शरद पवार, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी सगळ्या विरोधकांची मोट बांधायचा प्रयत्न करताहेत, हेही लपून राहिलेलं नाही आहे. दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात आता सगळ्या देशात 'खेला होबे' होणार असं त्या म्हणाल्या. आता दर काही महिन्यांनी सातत्यानं दिल्लीत आपण येत राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
दिल्लीचं राजकारण ममता बॅनर्जी यांना काही नवीन नाही. त्यामुळे बंगाल एकहाती जिंकल्यानंतर त्या विरोधकांचा राष्ट्रीय चेहरा होणार का?

फोटो स्रोत, Twitter / AITCofficial
ममता बॅनर्जी यांच्या बाजूचे काही मुद्दे आहेत. ममता यांनी ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात लढलेल्या भाजपचा बंगालच्या निवडणुकीत एकहाती पराभव केला आहे, ते पाहता शरद पवारांनंतर भाजपाला सत्तेपासून रोखता येते हे दाखवणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या आहेत.
भाजपासारखी आक्रमकता निवडणुकीत दाखवता येते हेही त्यांनी दाखवलं आहे. शरद पवारांसारखंच, आपल्या पक्षातले सहकारी सोडून भाजपामध्ये गेले, तरीही निवडणूक लढवून ती जिंकता येते, हे त्यांनी बंगालमध्ये सिद्ध केलं आहे.
ममतांचा प्रचार आणि विजय त्यांना देशभरात घेऊन गेला. त्यांचं महिला असणं हे सध्याच्या राजकारणात पथ्यावर पडणारं आहे. ममता यांनी एनडीए आणि यूपीए या दोन्ही सरकारमध्ये एकेकाळी सहभाग घेतला आहे. त्यामुळे आघाड्यांचं राजकारण त्यांना नवीन नव्हे. सर्व पक्षांमध्ये त्यांचे संबंध आहेत. सोनिया गांधींशीही त्यांचे संबंध उत्तम राहिलेले आहेत.
पण दुसरीकडे ममता यांचं आक्रमक व्यक्तिमत्व आघाडीच्या राजकारणात सर्वसमावेशक बनण्याचा अडथळा ठरु शकतं. त्यांचं शीघ्रकोपी असणं यापूर्वीच्या आघाड्यांमध्ये अडचणीचं ठरलं आहे. त्यामुळे विरोधकांची मोट बांधतांना शरद पवार प्रसंगी जो राजकीय संयम दाखवू शकतील, तसा ममता दाखवतील का हा एक प्रश्न आहे.
ममतांना दिल्लीमध्ये जेव्हा विरोधकांचं नेतृत्व करणार का असं विचारलं तेव्हा स्पष्ट उत्तर दिलं नाही. पण त्यांची कृती स्पष्ट होती.
'एक चेहरा असणार नाही, कलेक्टिव्ह लीडरशीप असेल'
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते जरी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटी, हालचाली दिसत असल्या तरीही एक असा चेहरा असणार आणि सध्याचं राजकारण पाहता अशी कोणती आघाडी लगेच तयार होईल याची शक्यता नाही.
"एक कुठलं नावं आलं तर प्रश्न येईल की मग उद्धव ठाकरे का नाही? संजय राऊत यांनी तसंही म्हटलंच आहे की उद्धव यांची क्षमता आहे. अखिलेश-मायावती हेसुद्धा अशी नाव आली तर मागे जाऊ शकतात. त्यामुळे आता केवळ संसदेत फ्लोअर मॅनेजमेंट करण्यासाठी एक व्यवस्था ते तयार करतील, पण चेहरा असणार नाही," असं अभय देशपांडे म्हणतात.

फोटो स्रोत, Twitter/INCIndia
"कॉंग्रेस सध्या एवढी कमजोर झाली आहे की 'यूपीए'साठी एक जो मजबूत मध्यवर्ती खांब लागतो तोही नाही. आणि सोबतच जे इतर स्थानिक पक्ष आहे त्यांच्यात भाजपाविरोधाइतकाच कॉंग्रेसविरोधही भरला आहे. त्यामुळे तेही पुढे येण्यास वेळ लागेल. म्हणून, सध्या केवळ संसदेतल्या विरोधासाठी एक रचना तयार होईल. जर ती पुढच्या काळात एकत्र राहिली तर नवी आघाडी करुन त्याचं निमंत्रक शरद पवारांना करण्याची शक्यता असू शकेल. पुढच्या तीन वर्षांत काय होतं याकडे लक्ष असावं लागेल," असं देशपांडे पुढे म्हणतात.
'दिव्य मराठी'चे संपादक संजय आवटे यांच्या मते ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे एकत्र मिळून एक नेतृत्व देऊ शकतात, पण राष्ट्रीय पातळीवरचे 'पोस्टर बॉय' ते होऊ शकत नाहीत.
"निवडणुकांमध्ये मैदानावर मोदींना कसं हरवायचं हे ममतांनी दाखवलं आणि व्यूहरचनेत कसं हरवायचं हे शरद पवारांनी दाखवलं. त्यामुळं या दोघांनी एकत्र येणं हे महत्वाचं ठरेल. 2019 च्या प्रचंड यशानंतर भाजपाचा जो उतार सुरु झाला तो महाराष्ट्रापासून. पाया महाराष्ट्रानं रचला आणि एका प्रकारे बंगाल कळस झाला," आवटे म्हणतात.
"पण, हे लक्षात घ्यायला हवं की, प्रादेशिक नेते देशाचा चेहरा होणं हे खूप कठीण असतं. काहीही झालं तरी बंगालमध्ये वा महाराष्ट्रात जिंकलात म्हणून देशाचा चेहरा तुम्ही होणार नाहीत. त्याला मर्यादा आहेत. तुम्हाला एक पोस्टर बॉय असावा लागतो. उदाहरणार्थ राहुल गांधी. ते हरत असतील, पण ते राष्ट्रीय नेते आहेत हे सगळ्यांना मान्य आहे. किंवा त्यांच्यासारखा अजून कोणी चेहरा असू शकतो. त्यामुळे मोट बांधायला पवार ममता एकत्र असले तरी राष्ट्रीय असा एक चेहरा असायलाच हवा," आवटे पुढे म्हणतात.
या नव्या राजकीय समीकरणांची तपासणी करण्यासाठी जवळचं मैदान म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामध्ये शरद पवार असतील किंवा ममता बॅनर्जी काय भूमिका निभावतात, यावरही पुढच्या अनेक शक्यता अवलंबून आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









