You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चिपळूण पूर: 'सीएम-बीएम गेला उडत, आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका' - नारायण राणे #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1) सीएम-बीएम गेला उडत, आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं, राणेंनी संताप व्यक्त केला. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून नारायण राणेंनी त्यांच्याकडे आपला राग व्यक्त केला. तसंच, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही राणेंनी टीका केली. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
नारायण राणे म्हणाले, "तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?"
नारायण राणे यांचं संभाषण टीव्ही 9 प्रसिद्ध केलं आहे. नारायण राणे हे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे. त्यावेळी राणे म्हणाले, "कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा."
याच दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणखी टीका केली.
"महाराष्ट्रावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगुणच कारणीभूत आहे," अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्या काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?" अशी टीकाही राणेंनी केली.
नारायण राणे यांनी रायगड-रत्नागिरीचा दौरा केला.
त्यानंतर ते म्हणाले, "या नुकसानीचा पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ."
2) पॉर्न अॅप्सची टास्क फोर्सकडून चौकशी करा, आशिष शेलारांचं अमित शाहांना पत्र
पॉर्न अॅप्स, वेबसाईट आणि ओटीटीची टास्क फोर्सकडून चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केलीय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.
पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक झालीय. या घटनेला अनुसरून शेलार यांनी पत्रात म्हटलंय की, "मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणुकीचे अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी."
चाईल्ड पॉर्न क्लिप्स महाराष्ट्रातून सर्वाधिक अपलोड करण्यात आल्याचं शेलारांनी पत्रात म्हटलंय.
"चाईल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या. 213 एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन 2017 पासून 2019 पर्यंत पॉस्को प्रकरणात 45 टक्के वाढ झाली आहे. ही अत्यंत बाब चिंताजनक आहे," असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
"सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अॅप्स आणि वेबसाईट्सची झाडाझडती घेण्यात यावी. तसेच पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशी सर्व अॅप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत," अशी मागणी शेलारांनी केलीय.
3) चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्यांवर भास्कर जाधवांची अरेरावी
पुरामुळे नुकसान झाल्यानं आपल्या भावनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाट मोकळी करून देणाऱ्या महिलेवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर भास्कर जाधव यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय. आपलं महानगरनं ही बातमी दिलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 25 जुलै रोजी गेले होते. त्यावेळी गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधवही त्यांच्यासोबत होते.
या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या व्यथा ऐकल्या. यावेळी एका महिलेनं म्हटलं, "प्रसंगी आमदारांचा दोन महिन्यांचा निधी मदतीला द्या, पण मदत करा." तर त्यावेळी भास्कर जाधव यांनी "आमदारांच्या पाच महिन्यांच्या पगारानंही काही होणार नाही," असं म्हणत त्या महिलेच्या मुलाला विनंती केली की, "आईला समजव."
पूरग्रस्तांच्या या आक्रोशाला अरेरावी पद्धतीनं उत्तर दिल्यानं भास्कर जाधव यांच्याविरोधात सोशल मीडियासह सर्वच स्तरातून टीका होताना दिसतेय.
4) पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि केरोसिन मोफत देणार - भुजबळ
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळे प्रचंड नुकसान झालं, दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले. रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना प्रामुख्यानं फटका बसला. यात झालेलं नुकसान पाहून राज्याच्या विविध मंत्रालयांकडून मदतीच्या घोषणा केल्या जात आहेत.
एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केली की, पूरग्रस्तांना मदत म्हणून सरकारकडून मोफत अन्नधान्य आणि केरोसीन वाटप केले जाईल.
महाराष्ट्रातील या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.
5) परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप या गुन्ह्यात आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन कोटींच्या खंडणीसह जमीन बळजबरीने नावावर करण्यात आल्याचाही आरोप शरद अग्रवाल यांनी केलाय.
परमबीर सिंह यांच्यासह संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे हे सुद्धा सहआरोपी आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)