You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुरेश रैना: कमेंट्रीमध्ये स्वतःच्या जातीचा उल्लेख केल्यानंतर रैनावर टीका
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना एका वक्तव्यामुळे वादात सापडला आहे.
रैनाने एका लाईव्ह क्रिकेट समालोचनादरम्यान (कमेंट्री) आपली जातीय ओळख सांगत म्हटलं, "मीसुद्धा एक ब्राह्मण आहे."
पण आता रैनाचं हेच वक्तव्य व्हायरल होताना दिसून येत आहे. यावरून रैनावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
तामिळनाडूत सुरू असलेल्या TNPL क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला सुरेश रैनाला आमंत्रित करण्यात आलं होतं. हा सामना सोमवारी (19 जुलै) चेन्नई येथे खेळवण्यात आला.
या मॅचदरम्यान कमेंट्री करताना एका सहकाऱ्याने रैनाला विचारलं, "तू दक्षिण भारतीय संस्कृती कशी स्वीकारलीस?"
सुरेश रैना चेन्नई सुपरकिंग संघात आहे. या संघात असताना त्याला लुंगी घालून डान्स करताना तसंच शिटी वाजवताना अनेक वेळा पाहण्यात आलं आहे.
याचाच संदर्भ घेत रैनाच्या सहकाऱ्यांनी त्याला वरील प्रश्न विचारला.
याचं उत्तर देताना रैना म्हणतो, "मीसुद्धा एक ब्राह्मण आहे. मी चेन्नईसोबत 2004 पासून खेळत आहे. मला इथली संस्कृती खूपच आवडते. टीममधील सहकारी मला खूप आवडतात. अनिरुद्ध श्रीकांत, बद्रीनाथ, बालाजी या सगळ्या खेळाडूंसोबत मी खेळलो आहे.
"आम्हाला इथं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. संघ प्रशासनाची साथही आम्हाला मिळते. माझं चेन्नईच्या संस्कृतीवर प्रेम आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघातून मला खेळायला मिळतं म्हणून मला खूप अभिमान वाटतो. यापुढेही आणखी काही सामने या संघाकडून खेळीन, अशी अपेक्षा आहे," असं रैना म्हणाला.
मात्र, हाच व्हीडिओ रैनावर उलटला.
काही लोकांनी सुरेश रैनाचा हा व्हीडिओ शेअर करत लिहिलं, "सुरेश रैना, अशा प्रकारचं वक्तव्य केल्याने तुला लाज वाटायला हवी. तू चेन्नईच्या संघासाठी खेळतोस, पण तुला इथली संस्कृतीच कळलेली नाही."
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला होता. 34 वर्षीय सुरेश रैनानेही अगदी त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं.
काश्मिरी कुटुंबातील सुरेश रैनाचा जन्म उत्तर प्रदेशात मुरादनगरमध्ये झाला होता.
2005 मध्ये वयाच्या केवळ 19व्या वर्षी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
2011 मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात सुरेश रैनाचाही सहभाग होता. रैनाला नंतर भारतीय संघाचा उप-कर्णधार तसंच कर्णधार म्हणूनही संधी मिळाली.
रैनाने 226 एकदिवसीय, 18 कसोटी आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं. निवृत्तीनंतर आता सुरेश रैना नव्या भूमिकेत गेला असून तो मोठ-मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)