कोरोना काळात भारतात 40 लाख 'अतिरिक्त मृत्यू' झाल्याचा संशोधकांचा दावा

फोटो स्रोत, Reuters
संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर कोव्हिड मृतांचे खरे आकडे लपवल्याची टीका केली.
आरोग्य मंत्री म्हणतात की, आकडेवारीत काहीही लपवाछपवी नाही, राज्यांनी दिलेली आकडेवारी सगळ्यांसमोर आहे. भारतात कोव्हिड मृतांचा अधिकृत आकडा 4 लाखाच्या वर आहे. पण प्रत्यक्षात हा आकडा याच्या काही पट जास्त असू शकतो अशी शक्यता वर्तवली जातेय.
भारताच्या कोव्हिड संकटाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांनी कोव्हिड काळात भारतात जवळपास 40 लाख अतिरिक्त मृत्यू झाल्याचं म्हटलंय. अतिरिक्त मृत्यू म्हणजे काय? हे सगळे मृत्यू फक्त कोव्हिडमुळे झालेत का?
भारतात कोव्हिड रुग्ण आणि मृत्यूंची नोंद नीट ठेवली जात नाहीय हे आरोप अनेक पातळ्यांवर आणि अनेकदा झालेत.
भाजपने ठाकरे सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप केलाय, काँग्रेसने योगी सरकार आकडे दाबत असल्याचा आरोप केलाय आणि विरोधकांनी मोदी सरकार पूर्ण आकडेवारी दाखवत नसल्याची ओरड केलीये.
पण आज आपण बोलतोय ती गोष्ट याच्याही थोडी पुढची आहे. आपण बोलतोय अतिरिक्त मृत्यूंबद्दल आणि त्यातल्या कोव्हिड मृतांच्या प्रमाणाबद्दल.
'अतिरिक्त मृत्यू' आणि कोव्हिडचं संकट
एखाद्या देशातल्या वार्षिक सर्वसाधारण मृत्यूदरापेक्षा जास्तीचे मृत्यू हे अतिरिक्त मृत्यू किंवा excess deaths म्हणून ओळखले जातात.
अमेरिकेतल्या Center for Global Development या संस्थेच्या अभ्यासकांच्या मते कोव्हिडच्या काळात भारतात 21 जून पर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त मृत्यू झालेत. आता यातले कोव्हिडमुळे झालेले मृत्यू किती हे समजायला हवं.

फोटो स्रोत, Reuters
भारतात दरवर्षी झालेल्या मृत्यूंचं सर्वेक्षण प्रकाशित होत असतं. पण 2019 पासून ते झालेलं नाही. या संशोधकांचा अंदाज आहे की, भारतात कोव्हिड काळात 34 लाख ते 47 लाखांदरम्यान अतिरिक्त मृत्यू झालेले आहेत. आता हा निष्कर्ष काढायला त्यांनी काय ठोकताळे वापरले?
- भारतातील निम्मी लोकसंख्या राहत असलेल्या सात मोठ्या राज्यांच्या मृत्यूंचा अभ्यास करून वेगवेगळ्या गणितीय मॉडेल्सच्या आधारे हा अंदाज बांधला गेला.
- आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या वयोगटांमधल्या मृत्यूदराची भारतातल्या दोन राष्ट्रीय सीरो-सर्व्हेंशी तुलना केली गेली.
- भारतातील 1,77,000 कुटुंबांमधल्या 8,68,000 ग्राहकांच्या सर्व्हेचा अभ्यास करून त्यातून मृत्यूंची संख्या जाणून घेतली.
भारताचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रह्मण्यम या संशोधकांपैकी एक आहेत. या संशोधकांनी म्हटलंय की, "स्रोत आणि आडाखे बाजूला ठेवले तरी सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष हा निघतो की, भारतातील कोव्हिड मृतांचा वास्तविक आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप मोठा असू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिडच्या पहिल्या लाटेतही, म्हणजे 2020 साली भारतातल्या जवळपास 230 डॉक्टर, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी सरकारकडे 2017 पासूनच्या मृत्यूंबद्दलचा सविस्तर ताळेबंद प्रकाशित करण्याची मागणी केली होती ज्यावरून अतिरिक्त मृत्यूंचा आकडा काढता येईल.
भारतात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, सरकारने जर आकडेवारी सार्वजनिक केली तर तो आकडा वेगळा काढून उरलेल्या संख्येवरून कोव्हिडमुळे नेमकं किती नुकसान झालंय याचा अंदाज बांधता येईल असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
मृत्यूच्या आकडेवारीत गोंधळ आहे का?
जगातले अनेक देश कोव्हिडची वास्तव आकडेवारी समोर येऊ देत नसल्याचे आरोप होत आहेत. अनेकदा रुग्ण आणि मृत्यूंच्या नोंदणीसाठी जे निकष लावले जातात ते चुकीचे असल्याचीही तक्रार समोर येते.
संशयित कोरोना रुग्णांना कोव्हिड रुग्णांमध्ये न पकडणं, कोव्हिड रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अनेकदा त्या मृत्यूचं कारण त्याला असलेली दुसरी व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी असल्याची नोंद करणं यांसारख्या गोष्टींमुळे खरा आकडा समोर येऊच दिला जात नाहीय ही तक्रार अनेक अभ्यासकांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पत्रकार प्रियांका पुल्ला यांनी केलेल्या एका तपासात असं दिसून आलं होतं की गुजरातमध्ये बडोद्यात जून-जुलै 2020 मध्ये रुग्णसंख्या 329 टक्क्यांनी वाढली असताना मृत्यूदर हा फक्त 49 टक्क्यांनीच वाढलेला दाखवला गेला होता.
तुम्हाला कदाचित वाटेल की आकडेवारी अपडेट करण्याबद्दल इतकं काय कौतुक लावलंय? पण जर आपण अपुऱ्या किंवा चुकीच्या आकडेवारीच्या आधारावर पुढची तयारी करत असू तर तिचा कितपत उपयोग होईल?
तिसरी लाट येणार याबद्दल एकमत आहे, कधी येणार याबद्दल मतभेद आहेत. पण जर आपल्याला पुन्हा एकदा हॉस्पिटलबाहेर रांगा, ऑक्सिजन आणि औषधांसाठी पळापळ अशा गोष्टी टाळायच्या असतील तर त्यासाठी आपल्या हातात संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








