You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याच्या बातम्या कोणकोणत्या राज्यातून आल्या होत्या?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला अशी नोंद नसल्याचं केंद्र सरकारने सांगितल्यानंतर देशात नवा वाद निर्माण झाला आहे.
या वादानंतर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे की राज्य सरकारने जी आकडेवारी दिली आहे त्यामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोकांचा मृत्यू झाला याची नोंद नाही.
नरेंद्र मोदी सरकारने, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात, राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिलीये.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी, "ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अहवालात दिलेली नाही," असं लेखी उत्तरात म्हटलंय.
सोशल मीडियावर केंद्राच्या या वक्तव्यावरून जोरदार टीका झाली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी, "हा आकडा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या रिपोर्टवर तयार करण्यात आला," असं म्हटलं.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याची कबुली दिली होती. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं होतं.
'ऑक्सिजनअभावी मी आईला गमावलं'
दिल्लीमध्ये रहाणारे एरिक मस्से, यांच्या आईवर दिल्लीच्या जयपूर गोल्डल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 23 एप्रिलला आईचा मृत्यू झाल्याचं एरिक सांगतात.
ते पुढे म्हणतात, "आईचा मृत्यू सामान्यच वाटला. पण, दुसऱ्या दिवशी रुग्णालयात कळलं की, ऑक्सिजनचा तुटवडा आईच्या मृत्यूचं खरं कारण होतं."
"मी एकटाच नव्हतो. त्या रात्री माझ्यासारख्या अनेकांनी त्यांचे नातेवाईक गमावले होते. ऑक्सिजन उपचारांमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. पण, ही जीवनावश्यक गोष्ट आम्हाला मिळाली नाही."
सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा किंवा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप एरिक करतात.
"केंद्राची माहिती धक्कादायक आहे. रुग्णालयाने ऑक्सिजन नाही म्हणून रुग्णांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलंय. दिल्लीच्या बात्रा, सर गंगाराम रुग्णालयातही असे प्रकार घडलेत."
"केंद्राने दिलेली माहिती म्हणजे अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे. सरकार जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतंय. यावर फक्त राजकारण सुरू आहे," असं एरिक म्हणतात.
एरिक यांनी दिल्ली हायकोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे.
कोणत्या राज्यात किती मृत्यू?
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दिल्ली, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आणि हरियाणात, ऑक्सीजन तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
दिल्ली - 24 एप्रिल 2021
जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन तुटवड्यामुळे 20 रुग्णांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रुग्णालयाचे संचालक दीप बलूजा बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, "क्रिटिकल केअर युनिटमध्ये हाय प्रेशर ऑक्सिजन पुरवठा देण्यात येत असलेले सगळे पेशंट्स आम्ही गमावले."
"लिक्विड ऑक्सिजनचा साठा संपला. आम्ही मेन गॅस पाईपलाईनला जोडलेल्या ऑक्सिजन सिलेंडर्सचा आधार घेतला. पण तिथलं प्रेशर लो असल्याने रुग्णांचा मृत्यू झाला."
या रुग्णालयाने मदतीसाठी केलेल्या ट्वीटवरून दिसून येतं की, अपुऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यामुळे त्यांनी कोरोना रुग्णांना दाखल करून घेणं बंद केलं होतं.
दिल्ली - 1 मे 2021
बात्रा रुग्णालयात ऑक्सिजन तुटवड्यामुळे, कोरोनावर उपचार घेत असलेले पोटविकारज्ज्ञ डॉ. आर. के. हिमतानी यांच्यासह 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर बोलताना रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. सुधांशू बनकाटा म्हणाले होते, "रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाला. रुग्णालयाला वेळेत ऑक्सिजन मिळाला नाही."
सहा रुग्णांचा ऑक्सीजन तुटवड्यामुळे किंवा ऑक्सीजन न मिळाल्याने मृत्यू झाला. तर, चार रुग्ण ऑक्सीजन तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुतीमुळे मृत्यू पावले, असं ते द हिंदूशी बोलताना म्हणाले होते.
डॉ. गौतम सिंह दिल्लीत 50 बेड्सचं रुग्णालय चालवतात.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात, एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत होता.
"आम्ही दर तासाला ऑक्सिजन मोजत होतो. ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवून होतो. एकवेळ अशी होती की, रुग्णांना गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली होती."
डॉ. सिंह पुढे म्हणतात, "आम्ही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लोकांना ऑक्सिजनसाठी विनवण्या केल्या. पण, मला माहित आहे, इतर रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांचा मृत्यू झाला."
गोवा - मे 2021
ऑक्सिजन तुटवड्याचा फटका गोव्यातील कोरोना रुग्णांनाही बसला.
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मे 11 ते 15 या चार दिवसात 83 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
बॉम्बे हायकोर्टाच्या गोवा बेंचने कोरोनासंसर्गाबाबत दाखल याचिकांची सुनावणी करताना, "आमच्यासमोर सादर करण्यात आलेली कागदपत्र स्पष्ट दर्शवतात की, रुग्णांना खूप कष्ट सहन करावे लागत आहेत, आणि काही प्रकरणात ऑक्सीजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला," असं निरीक्षण नोंदवलं होतं.
तर, गोव्यातील डॉ. रिबेलो बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, "गोवा मेडिकल कॉलेजला ऑक्सिजन मिळू शकला नाही. दिवसा सर्व काही ठीक असतं. पण, रात्री ऑक्सिजन कमी झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो."
कर्नाटक
मे महिन्यात, कर्नाटकातील कामराजनगरच्या जिल्हा रुग्णालयात, ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाने तीन सदस्यीय समितीची नेमणूक केली.
निवृत्त न्यायमुर्ती एएन वेणुगोपाळ गौडा, या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपला रिपोर्ट हायकोर्टाला सुपूर्द केला. 4 ते 10 मे दरम्यान, रुग्णालयात 62 मृत्यू झाले होते.
"यातील 36 रुग्णांच्या मृत्यूचं कारण, 2 आणि 3 मे ला, रुग्णालयात न झालेला ऑक्सीजन पुरवठा आहे," असं निरीक्षण या समितीने नोंदवलं.
टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली होती.
आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेशातील तिरूपतीच्या, SVRR GG रुग्णालयात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे झाला.
हरियाणातही ऑक्सिजन तुटवड्यामुळे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोप करण्यात आले होते.
IMA चे डॉक्टर काय म्हणतात?
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांना ऑक्सीजन बेड्स मिळत नव्हते. तर, रुग्णालयांना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सीजन अपूरा पडत होता.
देशभरातील अनेक रुग्णालयांनी ऑक्सिजनसाठी ट्विटरवर आपात्कालीन संदेश पाठवले होते.
केंद्र सरकारच्या या उत्तराबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांना मत विचारलं.
ते सांगतात, "ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक दारोदार फिरत होते. ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासली होती. पण, सरकार हे कधीच मान्य करणार नाही, की ऑक्सीजनचा तुटवडा होता."
"आता केंद्र सरकार म्हणतंय की, राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्यांची माहिती दिली नाही. पण, ही लीपापोती करण्यापेक्षा, हे मान्य केलं तर यावर उपाय शोधता येतील."
देशात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली जात आहे. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी फंड दिला जातोय. हे कशासाठी? याचा अर्थ, देशात ऑक्सीजनचा तुटवडा आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, "केंद्र सरकारची माहिती वस्तूस्थितीला धरून नाही."
"ऑक्सिजन असो किंवा रॅमडेसिव्हिर, सरकार नेहमीच लोकांपासून खरी आकडेवारी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतं," हा त्याचाच एक भाग आहे, डॉ. भोंडवे पुढे सांगतात.
महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं नाही. पण, ऑक्सिजन बेड्सच्या अभावी लोक रुग्णालयाबाहेर बसून असल्याचं दिसून येत होतं.
विरोधकांचा आरोप
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सरकारचं उत्तर म्हणजे, संवेदनशीलता कमी आहे असं ट्विटवर म्हटलं.
"फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती. तर, संवेदनशीलता, सत्य यांची कमतरता तेव्हाही होती आणि आताही आहे."
तर, कॉंग्रेसचे वरिष्ठ खासदार के. सी. वेणुगोपाल म्हणाले, "ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. या सरकारच्या या वक्तव्यावर मला आश्चर्य वाटतंय. चुकीची माहिती देऊन त्यांनी सदनाची दिशाभूल केलीये. आम्ही त्यांच्याविरोधात विशेषाधिकार हनन केल्याचा प्रस्ताव आणू.'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)