You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा- सत्ता आपलाच अधिकार असल्याचा त्यांचा समज
आज ( 20 जुलै रोजी) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत गोंधळ झाला.
लोकसभेचं कामकाज 22 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात केवळ एका प्रश्नाचे उत्तर देण्यात आल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केलं होतं.
दरम्यान, पेगासस हेरगिरी प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या गोंधळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. काँग्रेसचं वर्तन बेजबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांनी आज (20 जुलै) भाजपाच्या संसदीय दलाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
बैठकीची माहिती देताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी म्हटलं, "पंतप्रधानांनी विरोधकांच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, लोकांशी संबंधित मुद्दे मांडण्याऐवजी सत्ता आणि पदांवर केवळ आपलाच अधिकार आहे, अशी काँग्रेसची मानसिकता आहे. 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहोत. पण तरी काँग्रेसचं वर्तन हे बेजबाबदारपणाचं आहे."
'...म्हणून विरोधक गोंधळ करत आहेत'
संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून म्हणजेच कालपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गदारोळ झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.
नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एनडीएने दलित, महिला आणि ओबीसींना स्थान दिले आहे. यावरून मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. या वर्गातील लोक मंत्रिपदी विराजमान झाले ही गोष्ट विरोधकांना बघवत नाही त्यामुळे ते गोंधळ करत आहेत अशी टीका मोदींनी केली.
पेगासस आणि कृषी कायद्यांवरुन काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ झाला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये कामकाज आणि चर्चा याबाबतीत काल कोणतेही एकमत नसल्याचे दिसून आले.
मोदी सरकारनं पेगाससच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर पाळत ठेवली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. याचे पुरावे असल्याचा दावासुद्धा काँग्रेसने केला आहे.
तर अमित शाह यांच्या वेबसाईटवरील प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, "भारताच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्यांचा हा भारताचा विकास थांबावा म्हणून केलेला रिपोर्ट आहे. काही जागतिक विघटनवादी संघटनांना भारताचा विकास पसंत पडत नाही.
"हा अडथळा निर्माण करणारे भारताचे ते राजकीय षड्यंत्रकारी आहेत, ज्यांना भारतानं आत्मनिर्भर बनावं असं वाटत नाही. भारतीय जनता या क्रोनोलॉजीला चांगल्या पद्धतीनं समजून घेते."
पेगाससवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत काय झालं?
लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान अश्विनी वैष्णव यांनी याबबात लोकसभेत सरकारची बाजू मांडली.
त्यांनी म्हटलं, "एका पोर्टलवर काल रात्री एक अतिसंवेदनशील रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. यात अवाजवी आरोप करण्यात आले. हा रिपोर्ट संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रकाशित झाला, यात योगायोग असू शकत नाही."
वैष्णव यांनी पुढे म्हटलं, "यापूर्वी व्हॉट्सअॅपनेही पेगाससच्या वापराविषयी असेच दावे केले होते. त्यात काहीच तथ्य नव्हतं आणि सगळ्या पक्षांनी ते फेटाळून लावले होते. 18 जुलै रोजी प्रकाशित झालेला रिपोर्टही भारतीय लोकशाही आणि त्याअंतर्गत स्थापन झालेल्या संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं."
या अधिवेशनातलं कामकाज
दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकाच वेळी होत असलं तरी या अधिवेशनात कोव्हिडसंबंधीचे सगळे नियम पाळण्याच्या सूचना आहेत.
या अधिवेशनात एकूण 23 विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांमध्ये 6 जुनी तर 17 नवी विधेयकं आहेत.
पेन्शन फंडसंदर्भात सरकारनं बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या त्यानुसार एनपीएस ट्रस्ट पेन्शन फंडापासून वेगळं करणारं विधेयक, सामान्य लोकांच्या बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणारं ठेव विमा दुरुस्ती विधेयक ही बिलं मांडली जातील.
तसेच, वीजेच्या वितरणात खासगी कंपन्यांनाही अधिक मुभा देणारं वीज वितरण दुरुस्ती विधेयक आणि डीएनए तंत्रज्ञान वापर नियमन विधेयक- डीएनए तंत्रज्ञानाचा वापर केवळ ठराविकच पद्धतीनं करता यावा विधेयक ही काही महत्त्वाची विधेयकं मांडली जातील आणि त्यावर चर्चा होईल
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)