जितेंद्र आव्हाड : 'चार मुलं असलेले रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार' #5मोठ्याबातम्या

1. 'चार मुलं असलेले रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार' - जितेंद्र आव्हाडांची टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

ते म्हणाले, "13 टक्के मुस्लिमांना 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर 83 टक्के हिंदूंना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत. लोकसंख्या नियंत्रक विधेयक म्हणजे अब्दुलची भिती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रय करण्याचा डाव आहे."

या ट्वीटआधी त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी गोरखपूरचे भाजपचे खासदार रवी किशन यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणतात, "स्वत:ला चार मुलं असलेले गोरखपूरचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूईस म्हणतो, गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते."

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रणासाठी एक नवं धोरण आणण्यात येणार आहे. या विधेयकाचा मसुदा राज्याच्या विधी आयोगाने तयार केला आहे.

या मसुद्यानुसार, दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या व्यक्तीला सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही. तसंच अशा लोकांना विविध प्रकारच्या सरकारी योजना आणि अनुदानापासूनही वंचित ठेवलं जाणार आहे. राज्यात एकच अपत्य असलेल्या व्यक्तींना उपचार, शिक्षण, विमा संरक्षण, नोकऱ्या यामध्ये प्राधान्य देण्यात यावं, असंही या मसुद्यात म्हटलं आहे.

2. कसं आहे राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याचे इलेक्ट्रिक कार धोरण जाहीर केलं. इंधनांचे वाढते दर, वायू प्रदुषण यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक कार बाजारात आल्या. इलेक्ट्रिक कारची खरेदी-विक्री आणि त्याच्या वापरासंबंधी सूचना या धोरणात स्पष्ट करण्यात आल्या आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी 930 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याच्या अंमलबजावणी लागणारा हा निधी प्रस्तावित आहे.

या धोरणानुसार, 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10 टक्के वाटा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक शहरांमध्ये 2025 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे 25 टक्के विद्युतीकरण करणार असल्याचे आश्वासन या धोरणाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

तसंच या शहरांमध्ये सार्वजनिक चार्जिंग सुविधा सुद्धा उभारणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, पुणे ते नाशिक, मुंबई ते नागपूर या महामार्गांवर चार्जिंग सुविधा उलब्ध असणार आहे.

एप्रिल 2022 पासून मुख्य शहरांतील परिचालित होणारी सर्व नवीन सरकारी वाहनं ( मालकी किंवा भाडे तत्वावरील ) ही इलेक्ट्रिक वाहने असतील.

3. काँग्रेसचा शिवसेनेला धक्का, माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीत सातत्याने कुरबुर पहायला मिळते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत एमकत नसल्याचे वारंवार दिसून आले. त्यात आता शिवसेनेचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि युती सरकारमधील राज्यमंत्री राहिलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलीआहे. वर्ध्याच्या हिंगणघाट येथील माजी आमदार शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तसंच ठाण्याची शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांचे प्रवेश दिल्लीत होणार असल्याचीही चर्चा आहे.

शिवसेनेचे दोन नेते काँग्रेसमध्ये जाणार असल्याने दोन्ही पक्षातील तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.

या दोघांच्या काँग्रेस प्रवेशामुखे शिवसेनेला मोठा झटका बसू शकतो.

4. मुंबई विमानतळाच्या टेकओव्हरनंत काय म्हणाले गौतम अदानी?

देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टेक ओव्हर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गौतम अदानी यांनी यासंदर्भातील ट्वीट करुन माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले, "जागतिक दर्जाचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. मुंबईला अभिमान वाटावे असे काम आम्ही करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय, लक्झरी आणि मनोरंजनासाठी इकोसिस्टम उभारेल. आम्ही हजारो स्थानिकांना रोजगार देऊ."

देशातील विमानतळांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2019 मध्ये घेतला होता. त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या होत्या. यात अहमदाबाद, लखनौ, जयपूर, मंगळुरू, गुवाहटी आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळाचे व्यवस्थापन पाहण्याचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले होते.

5. 'RSS च्या शाखा आता मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार' - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा यापुढे मुस्लीम मोहल्ल्यांमध्येही सुरू करण्यात येतील अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंदूंप्रमाणे मुस्लिमांनाही सहभागी करुन घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. न्यूज18लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ हिंदूंची संघटना नसून सर्वसमावेश संघटना आहे हा संदेश देण्यासाठी संघात मुस्लीम विभाग आणि मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत असंही मोहन भागवत म्हणाले. कोलकाता येथे चित्रकुट येथे पार पडलेल्या चिंत शिबिरात ते बोलत होते.

तसंच पश्चिम बंगालमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी संघटनेची तीन भागात विभागणी करण्यात आली असून याठिकाणी पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. दक्षिण, मध्य आणि उत्तर बंगाल असे तीन भाग असून कोलकाता, सिलीगुडी आणि वर्धमान याठिकाणी संघाची मुख्यालय असतील अशीही माहिती देण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)