उज्ज्वल निकम : विशेष सरकारी वकील ते भाजपचे लोकसभेचे उमेदवार, असा आहे संपूर्ण प्रवास

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

उत्तर-मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं असून, त्यांच्या जागी उज्वल निकम यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

उज्वल निकम यांची लढत आता काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी होईल. काँग्रेसनं दोनच दिवसांपूर्वी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय.

राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासूनच जोरदार सुरू झाली होती. अखेर मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरत त्यांनी तसा प्रवेश केला आहे.

यापूर्वी जेव्हा त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा झाली, तेव्हा ते म्हणाले होते की, "मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही."

पण आता त्यांनी राजकीय प्रवेश केला आहे. बीबीसी मराठीनं यापूर्वी राजकीय प्रवेशाच्या चर्चांवेळी त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतला होता. तो इथे पुन्हा देत आहोत.

कोण आहेत उज्ज्वल निकम?

उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर-महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील. राज्यात आणि देशात त्यांची ओळख विशेष सरकारी वकील म्हणून आहे.

उज्ज्वल निकम जळगावातील उच्च-शिक्षित कुटंबातून येतात. त्यांनी एल.एल.बीचं (LLB) शिक्षण जळगावातच पूर्ण केलंय.

उज्ज्वल निकम यांना जवळून ओळखणारे ज्येष्ठ कोर्ट रिपोर्टर सुरेश वैद्य म्हणतात, "जळगाव जिल्हा न्यायालयात त्यांनी वकील म्हणून कारकिर्द सुरू केली. पुढे, याच कोर्टात सरकारी वकील म्हणून काम केलं."

"अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटलाही त्यांनी हाताळला होता." या अनुभवाचा फायदा त्यांना 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झाला.

1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला

सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दिला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली, 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे.

13 मार्च 1993 ला, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. बॉम्बब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 100 पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

सुरेश वैद्य पुढे म्हणाले, "तत्कालीन सरकारने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी, निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली."

या खटल्यामुळेच, उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला.

ज्येष्ठ कोर्ट रिपोर्टर सुनील शिवदासानी यांनी हा खटला जवळून पाहिलाय. "मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निकम 'वनमॅन आर्मी' होते. संपूर्ण खटला त्यांनीच चालवला. सीबीआयचे वकील फक्त काही गडबड होणार नाही ना हे पहाण्यासाठी कोर्टात येत."

उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांना महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं.

1993 साली सुरू झालेला, मुंबई बॉम्बस्फोट खटला 14 वर्षांनंतर 2007 मध्ये संपला. सुरक्षेच्या दृष्टीने, या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंग परिसरात कोर्ट बनवण्यात आलं.

1993 बॉम्बस्फोट खटल्याने उज्ज्वल निकम खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. "मुंबई बॉम्बस्फोट खटला दीर्घकाळ सुरू असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खटला होता," वैद्य सांगतात.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात 123 आरोपींपैकी 100 आरोपी दोषी आढळले, तर 12 दोषींना विशेष डाटा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली.

उज्ज्वल निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने, सरकारकडून Z+, झेड-प्लस सुरक्षा देण्यात आली. आर्थररोड तुरुंगात बनवण्यात आलेल्या कोर्टात येण्यासाठी, निकम यांना बूलेटप्रूफ गाडी देण्यात आली होती.

आक्रमक आणि अभ्यासू वकील

सुनिल शिवदासानी आणि सुरेश वैद्य यांनी उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून लढलेल्या अनेक खटल्यांचं रिपोर्टिंग केलंय.

"उज्ज्वल निकम यांची पर्सनॅलिटी डायनॅमिक आहे. कोर्टात ते आक्रमक असतात. बचावपक्षाला वरचढ होण्याची एकही संधी देत नाहीत," सुनील शिवदासानी सांगत होते.

ते पुढे म्हणाले, "खटल्यामध्ये ते आपला जीव ओतून देतात. कायद्याची चांगली जाण आणि प्रत्येक केसचा सखोल अभ्यास, त्यामुळेच 99 टक्के प्रकरणात त्यांना यश मिळतं."

उज्ज्वल निकम यांचा खटला सुरू करतानाची आठवण सुनिल शिवदासानी सांगतात, "सरकारी वकील म्हणून खटला सुरू करताना उज्ज्वल निकम संस्कृत श्लोकाने सुरूवात करतात."

उज्ज्वल निकम यांनी जवळपास तीन दशकं सरकारी वकील म्हणूनच काम केलंय.

निवृत्त पोलिस अधिकारी रमेश महाले यांनी अनेक हायप्रोफाईल खटल्यात उज्ज्वल निकम यांचं काम जवळून पाहिलंय.

ते सांगतात, "कोर्टात पोलीस कोणता साक्षीदार हजर करणार, याबाबत ते माहिती घेतात. साक्षीदाराने पोलिसांना दिलेला जबाब नीट वाचून, केसची तयारी करतात. आणि त्यानंतर कोर्टात साक्ष नोंदवतात."

रमेश महाले यांनी मुंबई हल्ल्यावर आधारित 'कसाब आणी मी' हे पुस्तक लिहीलंय. यात "एखादा साक्षीदार कोर्टात साक्ष देण्यासाठी येतो. तेव्हा माझ्या अंगात 250 वोल्टचा करंट धावत असतो. साक्षीदार बोलेल का? याचं भयंकर टेन्शन असतं, असं निकम म्हणाले होते," असं महाले यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय.

उज्ज्वल निकम यांनी हाताळलेले महत्त्वाचे खटले

  • 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला
  • गुलशन कुमार मर्डर केस
  • खैरलांजी हत्याकांड
  • अंजनाबाई गावित हत्याकांड
  • पोलीस कर्मचारी सुनिल मोरे बलात्कार प्रकरण
  • 2008 मुंबई हल्ला
  • शक्ती मिल बलात्कार केस
  • प्रमोद महाजन हत्या
  • कोपर्डी बलात्कार आणि हत्या

असे महत्त्वाचे खटले लढविणाऱ्या निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलंय.

कायम प्रसिद्धीच्या झोतात असल्याने टीका

उज्ज्वल निकम कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका त्यांच्यावर होते.

महाराष्ट्रातील हायप्रोफाईल खटल्यांच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम महिन्यातील वीस दिवस मुंबईत मुक्कामी असायचे.

दक्षिण मुंबईतील, सीएसटी स्टेशनजवळचं रेसिडन्सी हॉटेल त्यांचं मुंबईतील घर होतं. या हॉटेलमध्ये एक रूम कायम बुक असायची. त्यांच्या राहण्याचा सर्व खर्च, सरकारकडून केला जात होता.

मोठ्या खटल्याची सुनावणी किंवा निकालाच्या दिवशी रेसिडन्सी हॉटेलबाहेर, मीडियाच्या ओबीव्हॅन आणि पत्रकारांचा गराडा असायचा. निकम प्रत्येक टीव्ही चॅनलला मुलाखत देत असत. त्यामुळे कायम प्रसिद्धीत रहाण्यासाठी ते मीडियाशी बोलतात अशी टीका होत असे.

याबाबत सुरेश वैद्य यांनी म्हटलं, "निकम मीडियाला केस नीट समजावून सांगतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)