पंकजा मुंडे आणि भागवत कराड यांची भेट, सुमारे एक तास चर्चा

फोटो स्रोत, Twitter/Pankajamunde
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी
प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होत असतानाच आज सकाळी भागवत कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याची माहिती हाती लागली आहे.
पंकजा मुंडे आणि भागवत कराड यांची दिल्लीमध्ये भेट झाली. त्यावेळी दोघांनी एक तास चर्चा केली अशी माहिती डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.
'पंकजाताईंना भेटल्यावर मुंडे साहेबांची आठवण आली, ते माझे नेते होते,' असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
प्रीतम मुंडे यांना डावलल्यामुळे बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. या पार्श्वभूमीवर ही बातमी येत आहे.
याआधी, केंद्रीय मंत्रिमंडळात पंकजा यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आल्याने त्या नाराज आहेत, असं म्हटलं जात होतं. पण पंकजा मुंडेंनी अखेर आपलं मौन सोडलं.
"प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती," असं त्या म्हणाल्या आहेत.
त्यानंतर पुढच्याच दिवशी त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी उघडपणे स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली नसली तरी बीडमधील भाजप कार्यकर्ते चांगलेच नाराज झाल्याचं दिसून येत आहे.
या प्रकरणावरून आता बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांचं सत्र सुरू झाल्याचं दिसून येतं. सध्या जिल्ह्यातील सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचाही समावेश आहे.
मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना डावलून कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं.
पक्षाकडून आपल्यावर अन्याय होत असल्यानेच आपण राजीनामे देत आहोत, असं म्हणत बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पदाधिकारी नेमकं काय म्हणतात?
स्वतः पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. पण तरीही कार्यकर्त्यांनी या विषयावर राजीनामे देणं ही मोठी गोष्ट मानली जात आहे.
कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी बीबीसीने बीडच्या भाजप जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे अॅड. सर्जेराव तांदळे यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, facebook
ते म्हणतात, "मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं, हे नाराजीचं शंभरावं कारण आहे. नाराज होण्यासारखी अनेक छोटी-मोठी कारणं आहेत. पण आता आम्ही अन्याय सहन करणार नाही.
"गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी कठीण काळात पक्षाला मोठं केलं. पण आता पक्षात निष्ठावंतांना डावलणारी एक टोळी तयार झाली आहे.
"वाघांसारखं पुढे होऊन काम करणाऱ्या नेत्यांऐवजी शेळीसारख्या व्यक्तींना संधी दिली जाते. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देण्याची प्रथा पक्षात सुरू झाली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. हा एका व्यक्तीपुरता मर्यादित कधीच नव्हता.
"शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून असलेली भाजपची प्रतिमा गोपीनाथ मुंडे यांनी बदलली होती. त्यांनी भाजपला बहुजन चेहरा मिळून दिला. त्याच्या बळावरच भाजपने महाराष्ट्रात हातपाय पसरले.
"पण आता मुंडे-महाजन यांनी पेरलेले विचार संपवण्याचं काम पक्षातील नेत्यांकडूनच सुरू आहे. हे सर्व काम कुणाच्या इशाऱ्यावर चालतं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे," असं तांदळे म्हणतात.
"आम्ही मोदींना आमचे नेते मानतो, फडणवीसांनाही आम्ही नेते मानायला तयार आहोत. पण त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे मायेची वागणूक द्यावी, इतकीच आमची अपेक्षा आहे.
"आम्हाला कोणत्याही मंत्रिपदाची किंवा पदाची अपेक्षा नाही. आई मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, ही म्हण याठिकाणी लागू होते," असं तांदळे बीबीसीशी बोलताना म्हणाले.
सर्जेराव यांनी बीड जिल्ह्यात सरपंचपदापासून अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. सध्या त्यांच्याकडे बीडचं जिल्हा सरचिटणीस हे पद आहे. त्याशिवाय, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकही आहेत.
तांदळे यांनी राजीनामा देताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना लिहिलेलं पत्रही बीबीसीला पाठवलं.

फोटो स्रोत, Sarjerao tandle
या पत्रात ते म्हणतात, "प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने बीडमधील जनता नाराज झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा वटवृक्ष वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले असून त्यांचं पक्षाच्या वैभवात मोठं योगदान आहे.
"पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या त्यांचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पण प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची आशा असताना तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे," असं अॅड. तांदळे यांनी पत्रात म्हटलं.
'आम्ही ठरवू ते आमचे नेते'
केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड यांचा समावेश होता. कराड हेसुद्धा वंजारी समाजाचे नेते म्हणूनच ओळखले जातात. डॉ. कराड यांना गोपीनाथ मुंडे यांनीच राजकारणात आणलं होतं.
पण, असं असूनही प्रीतम यांना डावलून कराड यांना संधी देणं बीडमधील भाजप कार्यकर्त्यांना रुचलेलं नाही.

फोटो स्रोत, facebook
औरंगाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने याविषयी सांगतात, "पंकजा मुंडे दर्शवत नसल्या तरी कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच नाराजी आहे. भागवत कराडांना वर्षभरापूर्वीच राज्यसभेवर घेण्यात आलं होतं. दरम्यान, रमेश कराड यांनाही विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं. हे दोन्ही नेते वंजारी समाजातून येतात.
"त्यामुळे समाजात मुंडे भगिनींचं महत्त्व कमी करण्याचे हे डावपेच आहेत का अशी शंका निर्माण होते.
"वंजारी समाजावर मुंडे कुटुंबीयांचा अजूनही खूप प्रभाव आहे. त्यांच्या एका शब्दाने भगवानगडावर जनसमुदाय लोटतो. त्या तुलनेत भागवत कराड यांची समाजावर कितपत पकड आहे, असा प्रश्न उपस्थित होतो," असं माने यांना वाटतं.
भागवत कराड यांची गेल्या वर्षी राज्यसभेवर निवड झाली होती. तेव्हा भागवत कराड पंकजा मुंडे यांना पर्याय ठरू शकतात का असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांना बीबीसी मराठीने विचारला होता.
तेव्हा डोळे म्हणाले होते, "भागवत कराड हे ओबीसी नेतेच काय, ते मुंडे कुटुंबीयांनाही पर्याय ठरू शकत नाहीत. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांना ओबीसी नेते ही ओळख मिळाली. त्यात गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकारण केलं. भागवत कराड यांनी राज्यसभेत जाण्यापूर्वी औरंगाबादच्या महापौरपदाच्या पलीकडे काही फारशी उडी मारली नाही."
प्रमोद माने यांच्या मते, "कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने हे नेते आमच्यावर लादले जात आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. म्हणूनच आम्ही ठरवू ते आमचे नेते असा संदेश वरीष्ठांकडे पाठवण्यासाठीच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं शस्त्र उपसलं आहे."
'प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज नाहीये'
डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी नियुक्ती हा पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेनं मुखपत्र सामनामध्ये केला होता.
यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज नाहीये. भाजप मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मला वाटत नाही. सामनात काय लिहिलंय ते मी वाचलं नाही. पंतप्रधान मला संपवण्याचा प्रयत्न करतील, इतकी मी मोठी आहे, असं मला वाटत नाही."

फोटो स्रोत, facebook
"पक्षानं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पंकजा आणि प्रीतम यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही," असंही पंकजा यांनी यावेळी म्हटलं होतं.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणी सांगितलं पंकजा मुंडे नाराज आहेत? अफवा पसरवून त्यांना बदनाम करू नका,' अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.
कार्यकर्ते पक्षासोबतच संलग्न राहतील
बीडमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राजीनामा नाट्यानंतर पक्षाची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसीने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशीही संवाद साधला.
या मुद्यावर प्रतिक्रिया देताना उपाध्ये म्हणाले, "बीडमध्ये राजीनामा देणारे कार्यकर्ते हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. पक्ष त्यांच्या भावनांचा आदर करतो. त्यांचं म्हणणं सन्मानाने विचारात घेतलं जाईल. ते पुढेही पक्षासोबतच संलग्न राहतील. त्यांची मनधरणी केली जाईल."
हे कार्यकर्ते प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात बोलत आहेत, याविषयी पक्षाची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपाध्ये यांना विचारला असता त्यांनी पंकजा मुंडेंच्याच पत्रकार परिषदेकडे बोट दाखवलं.
"पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे या पक्षावर बिलकुल नाराज नाहीत. त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत याविषयी आधीच स्पष्टीकरण दिलेलं असल्याने हा विषय इथेच संपला आहे," असं उपाध्ये म्हणाले.
या सर्व घडामोडींमुळे, पंकजा मुंडे यांनी नाराज नसल्याचं सांगूनही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचं कारण काय, हा प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत आपलं मत मांडताना प्रमोद माने म्हणतात, "पंकजांनी स्पष्टीकरण देऊनही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यामुळे दोन-तीन शक्यता निर्माण होतात. एकतर कार्यकर्ते भावनिक झाले आहेत, हे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललेलं असू शकतं."
पण दुसरीकडे पंकजा मुंडेच्या बाजूने विचार केल्यास त्यांनी कार्यकर्त्यांच्या मार्फत आपला संदेश पक्षाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ते आपल्या कार्यकर्त्यांपर्यंतच आपण नाराज नसल्याचा निरोप पोहोचवू शकले नाहीत का, असंही म्हटलं जाऊ शकतं.
एकूणच हे घटनाक्रम पक्षाच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही. या वादातून पक्ष अडचणीत येण्याची शक्यताच जास्त असते, असं माने यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








