पंकजा मुंडे : 'नरेंद्र मोदी मला संपवण्याचा प्रयत्न करतील, इतकी मी मोठी नाहीये'

फोटो स्रोत, @PankajaGopinathMunde
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी नियुक्ती हा पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेने मुखपत्र सामनामध्ये केलाय.
यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं, "प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज नाहीये. भाजप मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मला वाटत नाही. सामनात काय लिहिलंय ते मी वाचलं नाही. पंतप्रधान मला संपवण्याचा प्रयत्न करतील, इतकी मी मोठी आहे, असं मला वाटत नाही."
"पक्षानं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पंकजा आणि प्रीतम यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही," असंही पंकजा यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, डॉ. कराड यांना मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणी सांगितलं त्या नाराज आहेत? अफवा पसरवून त्यांना बदनाम करू नका,' अशी प्रतिक्रिया नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
डॉ. कराड गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे होते. त्यामुळे कराड यांची मंत्रीपदी निवड म्हणजे पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव आहे का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
शिवसेनेचा आरोप
नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. सामनातील अग्रलेखात नरेंद्र मोदींच्या नव्या टीमचा उहापोह करण्यात आलाय.
"डॉ. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केलं काय, अशी शंका घ्यायला जागा आहे," अशी टीका शिवसेनेने केलीये.

फोटो स्रोत, Twitter
"कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
तर, "दोन राज्यमंत्री म्हणजे, महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे," असा आरोपही शिवसेनेने केला आहे.
'कोणी सांगितलं त्या नाराज आहेत?'
डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी आज ही बाब फेटाळून लावली असली तरी, त्या नाराज आहेत, असं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कारण नसताना त्यांना बदमान करण्याचा प्रयत्न करू नका."

फोटो स्रोत, @PankajaGopinathMunde
"भाजपमध्ये सर्वोच्च नेते निर्णय घेत असतात. योग्यवेळी सर्व निर्णय होत असतात. त्यामुळे विनाकारण नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका."
शिवसेनेच्या आरोपात तथ्य आहे का?
डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी म्हणजे पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव, या शिवसेनेच्या आरोपात तथ्य आहे का? हे आही मुंडे-कराड यांचं राजकारण जवळून पाहाणाऱ्या, राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबादचे वरिष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सांगतात, "कराड यांना केंद्रीय मंत्रीपद म्हणजे पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव, या शिवसेनेच्या आरोपात 100 टक्के तथ्य आहे.
"पंकजा यांची मुख्यमंत्रीपदाबाबतची वक्तव्य आणि मंत्री म्हणून असमाधानकारक कामगिरी पाहता, त्यांची पिछेहाट करण्याचा डाव पक्षाने आखल्याचं दिसून येतंय."
औरंगाबादचे भागवत कराड, मुंडे यांच्याप्रमाणेच वंजारी समाजाचे असून पेशाने डॉक्टर आहेत. राजकारण हा त्यांचा पिंड कधीच नव्हता. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना राजकारणात आणलं आणि मुंडेंमुळेच ते औरंगाबाद महापालिकेत दोन वेळा महापौर बनले होते.

फोटो स्रोत, FACEBOOK/ DR.BHAGWAT KARAD
2019 मध्ये पराभवानंतर विधानपरिषदेवर आपली वर्णी लागेल, असं पंकजा यांना वाटत होतं. पण, "विधानपरिषदेवर पंकजा मुंडे यांना डावलून रमेश कराड यांना संधी दिली गेली," असं संजीव उन्हाळे पुढे म्हणतात.
तर, पंकजा मुंडे यांनी बीबीसीच्या मुलाखतीत, रमेश कराड आणि भागवत कराड मलाच नेतृत्व मानून पुढे जात आहेत, असं वक्तव्य केलं होतं.
संजीव उन्हाळे सांगतात, "तुमच्या चेल्यांना आम्ही मंत्री करू, पण तुम्हाला काहीच देणार नाही," असं भाजपने पंकजा यांना दाखवून दिलंय.
तर, दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे सांगतात, "कराड यांना मंत्री बनवल्यामुळे पंकजा आणि प्रीतम मुंडे यांचे पंख छाटले जातील हे निश्चित. त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडेंना संधी मिळण्याची आता शक्यता नाही."
राजकीय विश्लेषक म्हणतात, आजही वंजारी समाजाला पंकजा मुंडेंबाबत आत्मीयता आहे. पण, त्या सत्तेपासून सातत्याने दूर आहेत. पंकजा आमदार नाहीत. प्रीतम खासदार आहेत पण, त्यांच्याकडे राज्यात सत्ता नाही.
"याउलट, धनंजय मुंडे राज्यात मंत्री आहेत आणि भागवत कराड केंद्रात. त्यामुळे सत्ताकेंद्र बदलू शकतं," असं संजय आवटे पुढे म्हणतात.
ओबीसींच्या नव्या नेतृत्वाला बळ देण्याचा प्रयत्न?
भागवत कराड यांची नियुक्ती, वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजांना धडा शिकवण्यासाठी आहे, अशी शंका शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आली आहे. मग, कराड यांच्या नियुक्तीमागे खरंच जातीय समीकरण असू शकेल का?
याबाबत बोलताना लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील सांगतात, "वरवर पाहता, हा मुंडे बहिणींना शह देण्याचा प्रकार वाटू शकतो. कराड हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यानेही तसं वाटू शकतं."
गोपीनाथ मुंडे राज्यातील ओबीसींचे निर्विवाद नेते होते. वंजारी समाजाचा चेहरा असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या मागे ओबीसी समाज मोठ्या संख्येने होता. मुंडेंच्या निधनानंतर वंजारी समाज पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहिला, असं राजकीय जाणकार सांगतात.
संजीव उन्हाळे सांगतात, "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजाच्या कराड यांना बळ देत मराठवाड्यात ओबीसींचं नवं नेतृत्व उभं करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असू शकतो."

फोटो स्रोत, @PankajaGopinathMunde
राज्यात गाजत असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मोठा आणि वंजारी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा हेतू यातून साध्य होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
संजय आवटे पुढे सांगतात, "भागवत कराड यांच्या रूपाने, मुंडेंना पर्यायी नेतृत्व देण्याचा आणि वंजारी समाजाचा नवीन नेता उभा करण्याचा हा प्रयत्न आहे."
साम टीव्हीचे स्थानिक पत्रकार माधव सावरगावे म्हणतात, "कराड यांना मंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. आपल्या मर्जीतील नेत्याला त्यांनी पद दिलं. दुसरीकडे ओबीसी समाजात एक मेसेज पोहोचवलाय. ओबीसींना आता एक नवा नेता मिळालाय आणि इतर जणही ओबीसींचं नेतृत्व करू शकतात, असा हा मेसेज."
हे वाचलंत का?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








