भारती पवार : 'मला मिळालेलं मंत्रिपद हा आदिवासी समाजाचा सन्मान, मंत्रिपदाबाबत समजताच आलं रडू'

फोटो स्रोत, @DrBharatippawar
पहिल्यांदाच खासदार झालेल्या डॉ. भारती पवार यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्रीपदाची शपथ 7 जुलै रोजी घेतली. दिंडोरीतून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांच्या रुपानं नाशिकला प्रथमच केंद्रात मंत्रिपद मिळालंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नव्या तरुण मंत्रिमंडळामध्ये डॉ. भारती पवार या राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता.
मंत्रिपदाची संधी मिळणं हा एक सुखद धक्का होता असं डॉ. भारती पवार यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं. यासंबंधी अचानकच माहिती मिळाली होती. त्यामुळं रडायला आलं होतं, असंही भारती पवार यांनी सांगितलं.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी भारती पवार यांच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेचा संपादित अंश इथं देत आहोत.
''या नव्या मंत्रिमडळात आलेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना स्थान मिळालं आहे. देशाच्या विकासासाठी कशाचाही विचार न करता, काम करण्याची संधी कोणालाही मिळू शकते, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.''
''विविध राज्यांमधील अनेक ठिकाणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळं त्या भागांचं बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे,'' असंही त्या म्हणाल्या.
मोदी मराठीत म्हणाले - 'कसं चाललंय महाराष्ट्राचं?'
शपथविधीपूर्वी सर्व नव्या मंत्र्यांबरोबर पंतप्रधानानांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केलं.
मोदी हे यावेळी अनेक मंत्र्यांशी बोलल्याचं भारती पवार यांनी सांगितलं.
''मोदी हे अनेक खासदारांशी त्यांच्या स्थानिक भाषेत बोलत होते. मलाही ते म्हणाले, 'काय कसं काय, व्यवस्थित आहे का? महाराष्ट्राचं कसं चाललंय?','' असं डॉ. पवार म्हणाल्या.

फोटो स्रोत, Office of Dr. Bharati Pawar
मोदींनी यावेळी सर्वांना मोठी आव्हानं पेलण्यासाठी जबाबदारीनं काम करण्याची सूचना केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याच्या जबाबदारीची जाणीव त्यांनी करून दिल्याचंही पवार यांनी सांगितलं.
डॉक्टरी पेशा सांभाळताना, मी या दिवसाचा कधी विचारही केला नव्हता, असं डॉ. पवार म्हणाल्या.
पण सासरे के.टी. पवार यांच्याकडून समाजसेवेचा वारसा मिळाला आणि त्यानंतर जिल्हा परिषदेपासून मिळत गेलेल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या परिनं लोकांची सेवा केल्याचं त्यांनी सांगितलं.
कृषी विभागात संधीची अपेक्षा?
कोणत्या विभागाचं काम करायचं किंवा एखादी खास अशी अपेक्षा नाही, असं त्यांनी सांगितलं. मिळेल त्या खात्याचा खात्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या.
डॉ. भारती पवार यांच्या कुटुंबीयांनी मात्र, त्यांना कृषी खात्यात काम करण्याची संधी मिळावी असं मत व्यक्त केलं होतं. त्याबाबतही भारती पवार यांनी माहिती दिली.

फोटो स्रोत, Twitter / Dr.BharatiPawar
''माझा मतदारसंघ हा कांदा हे प्रमुख पिक असलेला आहे. देशभरातच नव्हे तर जगात आम्ही कांदा पोहोचवतो. माझा जिल्हा हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. डाळिंब भाजीपाला असं बरंच काही पिकतं. गेल्या दोन वर्षांच्या काळात या शेतकऱ्यांसाठी कामाची संधी मिळाली,'' असं डॉ. भारती पवार म्हणाल्या.
डॉ. भारती पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच खासदारकी आणि मंत्रिमंडळात स्थान हे सर्व कमी वेळातच झालं. पण तसं असलं तरी, यामुळं पक्षातून फारशा विरोधाचा सामना करावा लागेल, असं वाटत नसल्याचं त्या म्हणाल्या.
'आदिवासी समाजाचा सन्मान'
मी आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळं कदाचित मला ही संधी मिळालेली असू शकते, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. हा आदिवासी समाजाचा सन्मान आहे. देशाच्या राजकारणात अशा छोट्या जातींचा विचार करून मोदींनी मोठा संदेश दिला आहेत, असंही त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषदेत असताना आणि त्यानंतर खासदार म्हणून समाजकारण म्हणूनच काम केलं आहे. मोदींना प्रचंड कामाची आवड असलेली लोकं अपेक्षित आहेत. त्यांनी लोकांसाठी प्रचंड काम करावं, अशी मोदींची अपेक्षा असल्याचं डॉ. भारती पवार यांनी सांगितलं.
बुधवारी झालेली भेट ही डॉ. भारती पवार यांची मोदींबरोबर प्रत्यक्ष झालेली पहिलीच भेट होती. यापूर्वी कामकाजाच्या निमित्तानं संसदेत त्यांची भेट झाली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








