एकनाथ खडसे यांचं पक्षांतर, पंकजा मुंडे नाराज, आता भाजपमध्ये ओबीसी चेहरा कोण?

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 23 ऑक्टोबर रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

तर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष येऊ शकत नाही. पण शेतकऱ्यांसाठी मदत मागताना त्यांना भाऊ म्हणून नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मदत मागणार आहे, असं वक्तव्य माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान केलं आहे.

भाजपमधील इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख होती. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र भाजपमधील ओबीसी चेहरा म्हटल्यावर खडसेंचं नाव पुढे येई.

भाजपच्या संघटनात्मक वाढीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात OBC समाजातून काही नेते पुढे आणले. माळी-धनगर-वंजारी (माधव) हा फॉर्म्युलाही भागवतांनीच आणला. यामुळे भाजपची ओबीसी समाजात वाढ झाल्याचं पुढे दिसून आलं.

एकनाथ खडसे हे सुद्धा भाजपच्या याच ओबीसी मोहिमेतील नेते मानले जात. खडसेंनी पक्षाला राम राम ठोकल्यानं आता भाजपमधील ओबीसी चेहरा कोण, असा सहाजिक प्रश्न सगळ्यांसमोर येतो.

या प्रश्नाला आणखी एक आधार आहे, तो म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जाते.

पण त्याही पक्षात नाराज आहेत. गोपीनाथ गडावरील दसरा मेळावा असो वा इतरवेळीही त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष ही नाराजी व्यक्त सुद्धा केली आहे.

मग आता भाजपमध्ये OBC चेहरा कोण आहे, हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण या बातमीतून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

त्याचसोबत, खडसे-मुंडे यांच्यामुळे भाजपसोबत ओबीसी समाज आहे का, त्यांना पर्याय म्हणून भाजपने नवीन नेते उभे केले का, अशा सर्वच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया.

भाजप आणि ओबीसी समाज

सुरुवातीच्या काळात भाजपची ओळख 'शेटजी-भटजीं'चा पक्ष अशीच होती. म्हणजे, ब्राह्मण आणि मारवाडी समाज भाजपसोबत असायचा. मात्र, सत्तर-ऐंशीच्या दशकात वसंतराव भागवत यांच्यासारख्या जनसंघाच्या नेत्यांनी भाजपला इतर मागासवर्गीयांमध्ये पोहोचवलं. त्यासाठी महाराष्ट्रात भागवतांनी माळी-धनगर-वंजारी (माधव) फॉर्म्युला आणला.

'लोकमत'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने सांगतात, "वसंतराव भागवत यांनी शेटजी-भटजींचा अशी ओळख झालेल्या भाजपला बहुजनांमध्ये पोहोचवला. गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, माधवराव शिवणकर यांसारखे नेते पुढे आले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजात मुख्यत्वे त्यावेळी काम केलं. पश्चिम महाराष्ट्रात हा फॉर्म्युला तितकासा चालणार नाही हे त्यांना लक्षात आलं होतं."

भागवतांनी केलेली ही रचना पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत सुरूच होती. कधी गोपीनाथ मुंडे प्रदेशाध्यक्ष, तर कधी मुनगंटीवार, तर कधी फुंडकर प्रदेशाध्यक्ष झाले. हे सर्व त्याच फॉर्म्युल्यानुसार सुरू होतं. मात्र, 2014 नंतर यात बदल दिसून येतो.

गोपीनाथ मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातीच्या अंगानं अभ्यास केलेले राजकीय विश्लेषक नितीन बिरमल म्हणतात, "भाजपची पूर्वी ओळख विशिष्ट जातींपुरते मर्यादित होता. त्यामुळे त्यांनी ओबीसींमध्ये पक्ष पसरवण्यास सुरुवात केली. मंडल आयोगानंतर तर या मोहिमेला अधिक वेग देण्यात आला."

एकूणच वसंतराव भागवत किंवा भाजपनं ओबीसी समाजाला जवळ आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाला यश म्हणजे गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते पुढे आले. मात्र, भागवतांच्या 'माधव' फॉर्म्युल्यातील कुणीच भाजपला आधार देणारं आता राहिलं नाही.

याबाबत श्रीमंत माने सांगतात, "माधव फॉर्म्युल्यातील कुणीच भाजपकडे उरले नाहीत. मुंडे कुटुंब आहे, पण ते नाराज आहेत. खडसे सोडून गेले. माळी समाजाचा नेता भाजपकडे नाही. धनगर समाजाचे महादेव जानकर आहेत, पण तेही पंकजा मुंडेंच्या बाजूचे आहेत. त्यात आरक्षण न दिल्याने धनगर समाज नाराज आहे. एकूणच ओबीसींचे सर्व दुवे भाजपपासून तुटले आहेत."

मग सहाजिक प्रश्न उभा राहतो, एकीकडे भाजपमध्ये ओबीसींचा नेता असं म्हणण्यासारखे चेहरे समोर दिसत नाहीत, अशावेळी ओबीसी नेता अशी ओळख निर्माण केलेल्या एकनाथ खडसेंच्या पक्षांतरामुळे भाजपला काही फटका बसू शकतो का, हा प्रश्न उपस्थित होतो.

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरामुळे भाजपला फटका बसेल?

वरिष्ठ पत्रकार संजय जोग सांगतात, "काँग्रेसच्या सुरेश जैन यांना धक्का देऊन एकनाथ खडसे पहिल्यांदा विधानसभेत दाखल झाले होते. त्यात विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी हेही उत्तर महाराष्ट्रातील होते. त्यामुळे ते खडसेंना बोलायला देत. अशावेळी केवळ ओबीसी म्हणून नव्हे, तर डॅशिंग नेता म्हणून खडसे पुढे आले. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना बळही मिळालं आणि ओबीसी नेता म्हणून ओळखही."

"अशावेळी एकनाथ खडसे यांचं राजकीय चढाओढीतून खच्चीकरण करण्यात आल्यानं बाहेर त्यातून संदेश ओबीसींचं खच्चीकरण असाच गेला. या संदेशाचा फटका भाजपला बसताना दिसेल," असं संजय जोग म्हणतात.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Getty Images

याच मुद्द्याला धरून प्राध्यापक जयदेव डोळे म्हणतात, "केवळ ओबीसी नेत्यांच्या खच्चीकरणामुळेच भाजपला फटका बसेल असं नव्हे, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाजप ज्या आक्रमतेने वागतेय, त्यामुळेही ओबीसी समाज दूर जातोय. म्हणजे, सर्व बाजूंनी भाजपला ओबीसींची नाराजी ओढवून घ्यावी लागतेय."

ओबीसी नाराज असं म्हणत असताना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. मग ते कसं शक्य झालं, असाही प्रश्न विचरला जातो.

याच अनुषंगाने श्रीमंत माने म्हणतात, "मोदी लाटेनंतर भाजप सोशल इंजिनिअरिंगबाबत प्रचंड बेफिकीर झाली. मोदींनाच ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणत होते. पण लाट ओसरू लागली आणि त्याचे परिणाम दिसू लागले. आता खडसेंच्या पक्षांतरानंतर हे भाजपला अधिक जणावेल," असं श्रीमंत माने म्हणतात.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, खडसेंच्या पक्षांतरामुळे भाजपला ओबीसी मतांच्या अनुषंगाने फारसा फरक पडणार नाही, असं नितीन बिरमल यांना वाटतं.

याचं कारण सांगताना बिरमल म्हणतात, "एकनाथ खडसे हे लेवा पाटील या समाजापुरते मर्यादित नेते आहेत. ओबीसीमधील एकेका जातीचा एक-एक नेते आहेत. खडसे ओबीसीमधील सर्व जातींचे नेते नाहीत. पण जुना-जाणता नेता पक्षातून गेल्याचा भाजपला निश्चितच फटका बसेल."

एकनाथ खडसे असो वा पंकजा मुंडे यांच्या नाराजी हेरून किंवा त्यांना आव्हान म्हणून भाजपनं आधीच पर्याय उभे केलेत का, हाही प्रश्न उभा राहतो.

कारण एकनाथ खडसे यांच्या भागात गिरीश महाजन यांच्यासारखा नेता, तर पंकजा मुंडेंच्या भागात भागवत कराड यांच्यासारखा नेता भाजपने पुढे आणला. पण यांना पर्याय म्हणून पाहता येईल का?

भाजपनं काय पर्याय उभे केले?

जयदेव डोळे म्हणतात, "भागवत कराड हे ओबीसी नेतेच काय, ते मुंडे कुटुंबीयांनाही पर्याय ठरू शकत नाहीत. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांना ती ओळख मिळाली. त्यात गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकारण केलं. भागवत कराड यांनी राज्यसभेत जाण्यापूर्वी औरंगाबादच्या महापौरपदाच्या पलिकडे काही फारशी उडी मारली नाही."

गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस

दुसरीकडे खडसेंना सुद्धा पर्याय म्हणून गिरीश महाजन कायम पुढे येताना दिसतात. मात्र श्रीमंत माने म्हणतात, "गिरीश महाजन हे डॅशिंग आमदार वगैरे इथवर ठीक आहे, पण ते एकनाथ खडसेंना पर्याय होऊ शकत नाहीत. कारण संघटन कौशल्य आणि राज्यभरातील चेहरा म्हणून ओळख ही खडसेंसारखी गिरीश महाजनांकडे नाही."

"जरी आपण महाजन किंवा भागवत कराडांकडे पर्याय म्हणून पाहिले तरी ते सकारात्मकदृष्ट्या पर्याय दिले नाहीत, तर पक्षातल्याच नेत्यांना आव्हान देण्यासाठी यांना मोठं केलं गेलं. त्यामुळे यांना आपण पर्याय तरी कसं म्हणणार?" असं श्रीमंत माने म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)