एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, facebook

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ईडीने अटक केलीये. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना मंगळवारी चौकशीनंतर अटक करण्यात आली.

जावयाची अटक, एकनाथ खडसेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने, काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवून घेतला होता. गिरीश चौधरी यांना बुधवारी ईडी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

गिरीश चौधरी यांच्या अटकेबाबत ईडीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर, एकनाथ खडसे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. तर, खडसे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

2016 मध्ये खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना, त्यांच्यावर भोसरी भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

कोण आहेत गिरीश चौधरी?

खडसे यांचा राजकीय प्रवास जवळून पाहाणारे, जळगावचे पत्रकार शेखर पाटील सांगतात, "गिरीश चौधरी सार्वजनिक जीवनात कधीच सक्रीय राहिले नाहीत. एकनाथ खडसे यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातही ते अपवादानेच दिसायचे."

ते पुढे म्हणतात, "गिरीश चौधरी यांचा परदेशात व्यवसाय आहे. त्यांची शिक्षण संस्था आहे. त्यामुळे परदेशात त्यांचं वास्तव्य दिर्घकाळ होतं. 2014 नंतर ते भारतात येऊ लागले." याच काळात, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदही मिळालं होतं.

एकनाथ खडसेंच्या जवळचे नेते नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "खडसे समर्थकांना नेहमी वाटायचं, की मुलगी शारदा आणि गिरीश चौधरी यांनी राजकारणात सक्रीय व्हावं. पण गिरीश राजकारणापासून नेहमीच दूर राहिले."

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Twitter

खडसे यांच्या पत्नी आणि जावई गिरीश यांनी एकत्रित केलेला भूखंड खरेदी हा व्यवहार, दोन्ही कुटुंबातील पहिलाच थेट व्यवहार होता.

गिरीश चौधरी यांच्याबद्दल पुढे सांगताना शेखर पाटील म्हणतात "गिरीश अतिशय शांत आणि मितभाषी होते. तसंच, सार्वजनिक जीवनापासून लांबच रहाणं पसंत करतात." एकनाथ खडसे मंत्री झाल्यावर मुलगी शारदाला राजकारणात आणणार, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर होती.

खडसेंची ईडी चौकशी

ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर खडसे यांनी कोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर जानेवारी 2021 मध्ये भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे ईडीसमोर हजर झाले होते .

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Getty Images

ईडीने खडसे यांचा जबाब नोंदवून घेतला. "मी चौकशी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करेन," अशी प्रतिक्रिया खडसेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. "भोसरी जमीन प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. ही जमीन माझे जावई आणि पत्नीने विकत घेतली होती," असं खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

ईडीची कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोपही खडसे यांनी केला होता.

काय आहे भोसरी भूखंड घोटाळा?

एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावानं खरेदी केला होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केला होता, तर त्याची त्यावेळची बाजारभावाची किंमत 40 कोटी इतकी होती असं सांगितलं जात होतं.

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

तसंच त्यांच्या या निर्णयामुळे शासनाचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये 30 मे 2016 ला तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

एसीबीची खडसेंना क्लिनचीट

हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई न केल्यानं गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं, गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते.

एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागानं एकनाथ खडसे, त्यांची पत्नी, जावई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. चौकशीनंतर एप्रिल 2018 मध्ये लाचलुचपत विभागानं पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती.

खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कुठलंही नुकसान झालं नाही, असं लाचलुचपत विभागानं त्या अहवालात म्हटलं होतं.

"ईडी लावली तर सीडी लावेन"

ऑक्टोबर 2020 मध्ये एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. "माझ्यामागे ईडी लावली, तर मी सीडी लावेन," अशी प्रतिक्रिया देत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय जीवन उध्वस्त केल्याच्या आरोप केला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)