You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेती: 'पोटच्या लेकरांसाठी मी शेतातच तंबू ठोकून मुक्काम करतोय, कारण...'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"मला एक चार वर्षांचा मुलगा आणि दुसरीत शिकणारी मुलगी आहे. त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन रात्री शेताची राखण करावी लागते. भीती तर वाटते. पण आज पिकांची राखण नाही केली, तर उद्या मुलांना काय खाऊ घालणार?"
34 वर्षांचे शेतकरी विलास पवार सवाल करतात.
ते औरंगाबाद जिल्ह्यातल्या डोणवाडा गावात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट शेतात तंबू ठोकून, मोठा बल्ब लावून तिथंच मुक्काम करण्याच निर्णय घेतला.
विलास यांच्याकडे पावणे सहा एकर शेतीत. त्यात ते टोमॅटो, भुईमूग, कपाशी, बाजरी, मेथी, कोथिंबीर अशी पिके घेतात.
पण, जंगली जनावरांच्या त्रासामुळे सध्या त्यांना संकटाला सामोरं जावं लागत आहे.
विलास सांगतात, "आम्हाला नीलगाय, रानडुक्कर या जंगली जनावरांचा खूप त्रास आहे. या जनावरांनी माझ्या अर्ध्या एकर कपाशीचे पूर्ण बोंडं खाल्ली आहेत. माझ्या मोठ्या काकांचा दीड एकरावरचा भुईमूग काहीच शिल्लक ठेवला नाही. मका पूर्ण उपटून फेकली."
ते पुढे सांगतात, "मला रात्री भाजीपाला घेऊन मंडीला यावं लागतं. त्यामुळे मग वडील शेतात पीक राखायला यायचे. एकदा ते खालच्या भूईमागाच्या वावरात थांबले तर जनावरांनी वरच्या वावरातली कपाशी खाल्ली. दुसऱ्या रात्री ते वरच्या वावरात थांबले, तर या जनावरांनी खालच्या वावरातला भूईमूग खाल्ला."
जंगली जनावरं इतक्या दिवस मका आणि भुईमूग खायचे. गावकऱ्यांना त्याचा इतका त्रास झाला की आता लोकांनी मका पीक घेणंच बंद केलं आहे. 90 टक्क्यांहून ते प्रमाण 30 टक्क्यांवर आलंय, विलास त्यांची चिंता व्यक्त करतात.
विलास इन्स्टाग्रामवर चांगले अॅक्टिव्ह असतात. शेतात तंबू ठोकून तिथं मुक्काम केल्यानंतर त्या रात्री त्यांनी तिथूनच लाईव्ह केलं. जंगली जनावरांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर त्यांनी केलेल्या एका व्हीडिओला 17 लाखांहून अधिक जणांनी पाहिलं आहे. आमच्या भागातही जनावरांचा असाच त्रास होतो, अशा अनेक कमेंट या व्हीडिओखाली आहेत.
विलास यांच्याप्रमाणेच रानडुक्कर, हरिण, माकड या वन्यप्राण्यापांसून शेतीचं, शेतपिकांचं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगत असतात.
वन्यप्राण्यांपासून पिकांचंच नाही तर पशुधनाचंही नुकसान होतं. कधीकधी तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होतो.
तुमचं जर अशाप्रकारचं नुकसान होत असेल, तर तुम्ही नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तो कसा, याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.
अर्ज कसा करायचा?
यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahaforest असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचं MAHARASHTRA FOREST DEPARTMENT या नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील Forest Portal या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर MAHARASHTRA FOREST PORTAL नावाचं एक नवीन पेज तिथं ओपन होईल.
इथं सुरुवातीला View Notification of 10 online services, यावर क्लिक केलं, की वन विभागाकडून कोणत्या सेवा ऑनलाईन पुरवल्या जात आहेत, त्याची पीडीएफ फाईल ओपन होईल.
यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची भरपाई, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य तसंच वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई, अशा सेवा पुरवल्या जातात.
त्यानंतर MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरील Checklist of required document of 10 online services यावर क्लिक केलं की कोणत्या सेवेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं लागणार याची यादी दिलेली असते.
आता पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया.
MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरील वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे या पाचव्या क्रमांकासमोरील Application Formवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर यासंबंधीच्या नुकसान भरपाईचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
इथं सुरुवातीला तुम्हाला नुकसान भरपाईचा प्रकार मनुष्य, शेतपीक, पशुधन यापैकी एक पर्याय निवडायचा आहे आणि मग संबंधित प्रकारानुसार अर्ज भरायचा आहे.
त्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. पुढे नुकसानीचा प्रकार (ऊस की इतर पीक) ते निवडायचं आहे. त्यानंतर पिकाचं नाव, शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे.
पुढे जिल्हा, तालुका आणि वनविभागाचं कार्यालय निवडायचं आहे. त्यानंतर पत्ता आणि घटनेचा दिनांक टाकायचा आहे. सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.
हे सगळं भरून झालं की तुम्हाला ADD या बटनावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्ही नुकताच भरलेला संपूर्ण अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मंजुर करणे, असं या अर्जाचं शीर्षक आहे आणि त्याखाली अर्ज क्रमांक दिलेला आहे.
या पेजवरील सगळ्यांत शेवटी असलेल्या प्रिंट या बटणावर क्लिक करून तुम्ही या अर्जाची प्रिंट काढू शकता.
त्यानंतर हा अर्ज तुमच्या भागातील वनविभागाकडे सबमिट होतो. वनविभागातील वनपाल किंवा वनरक्षक हे तुमच्याकडे नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी येतात. त्यावेळी तुम्हाला चेकलिस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे कागदपत्रं रेडी ठेवावी लागतात.
अर्जाचं स्टेटस कसं पाहायचं?
आता ऑनलाईन अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरील Public Services या रकान्यातील RTS Application Tracker या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथं तुम्हाला तुम्ही ज्या प्रकाराअंतर्गत नुकसान भरपाईसाठी अर्ज केला आहे, तो प्रकार निवडायचा आहे आणि मग Application Number (अर्ज क्रमांक) टाकायचा आहे. त्यानंतर समोरील ट्रॅक या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या अर्जाचं स्टेटस प्रक्रिया या पर्यायाखाली नमूद केलेलं असतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)