संजय गांधी यांच्या विमानाचा अपघात कसा झाला होता?

फोटो स्रोत, KEYSTONE/HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राजीव आणि संजय गांधी या दोघांनाही वेग आणि मशीन्सचं प्रचंड आकर्षण होतं. पण राजीव उड्डाणविषयक नियमांचं पालन करत विमान चालवायचे, तर दुसरीकडे संजय गांधी कार चालवल्याप्रमाणे विमान उडवायचे.
हवेमध्ये विमानाच्या कसरती करण्याचा त्यांना शौक होता. 1976 साली संजय गांधींना छोटं विमान उडविण्याचा परवाना मिळाला होता. मात्र, इंदिरा गांधी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जनता सरकारनं त्यांचा परवाना रद्द केला होता.
इंदिरा गांधी सत्तेत परत येताच त्यांचा परवाना त्यांना परत करण्यात आला. 1977 पासून गांधी कुटुंबाच्या जवळचे धीरेंद्र ब्रह्मचारी 'पिट्स एस 2 ए' नावाचे दोन आसनी विमान आयात करण्याचा प्रयत्न करत होते, जे खास हवेत कसरती करण्यासाठीच बनवले गेले होते.
मे 1980 मध्ये भारतीय सीमा शुल्क विभागाने 'पिट्स एस 2 ए' या विमानाला भारतात आणण्यासाठी मान्यता दिली. विमान असेंबल करून तात्काळ सफदरजंग विमानतळावरील दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये नेण्यात आले.
संजय गांधी यांना पहिल्याच दिवशी विमान उडवण्याची इच्छा होती. पण ही संधी फ्लाईँग क्लबच्या प्रशिक्षकांना मिळाली. संजय गांधींनी हे विमान 21 जून 1980 रोजी पहिल्यांदा उडवले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे, 22 जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, इंदिरा गांधी यांचे विशेष सहाय्यक आर.के.धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्यासमवेत उड्डाण केले आणि 40 मिनिटं विमान दिल्लीत आकाशात भरारी घेत होते.
निवासी भागावर पिट्सचे तीन लूप आणि..
दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जून रोजी ते माधवराव सिंधिया यांच्यासोबत उड्डाण करणार होते. पण संजय गांधी सफदरजंग विमानतळाच्या शेजारी राहणारे दिल्ली फ्लाईंग क्लबचे माजी प्रशिक्षक सुभाष सक्सेना यांच्या घरी पोहोचले.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
संजय गांधी यांनी कॅप्टन सक्सेना यांना आपल्यासोबत फ्लाईटवर येण्यासाठी विचारणा केली आणि ते आपली गाडी पार्क करण्यासाठी निघून गेले. सुभाष सक्सेना आपल्या सहकाऱ्यासोबत फ्लाईंग क्लबच्या मुख्य कार्यालयात पोहोचले.
ते एवढ्या घाईत नव्हते म्हणूनच कदाचित त्यांनी एक चहा मागवला. त्यांनी चहाचा एक घोट घेतला तेवढ्यात त्यांना निरोप आला की संजय गांधी विमानात चढले आणि त्यांना लगेच बोलवलं आहे.
कॅप्टन सक्सेना यांनी आपण 10-15 मिनिटांत घरी परतणार असल्याचे सांगून सहाय्यकाला घरी पाठवले. सुभाष सक्सेना पिट्स विमानाच्या पुढच्या सीटवर बसले आणि संजय गांधी मागच्या सीटवर बसून कंट्रोल सांभाळत होते.
सात वाजून 58 मिनिटावर त्यांनी टेक ऑफ केले. संजय गांधी यांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करत रहिवासी भागात तीन लूप घेतले. ते चौथा लूप घेणारच होते तेवढ्यात कॅप्टन सक्सेना यांच्या सहकार्याच्या लक्षात आले की विमानाचे इंजिन बंद पडले आहे. पिट्स विमानाने वेगाने वळण घेतले आणि ते जमिनीवर आदळले.
जमिनीवर पडले होते मोडलेले विमान, गडद काळा धूर
पिट्स विमान अशोका हॉटेलच्या मागून अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच कंट्रोल कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांना काहीच लक्षात येत नव्हते. सक्सेना यांच्या सहकाऱ्याने विमान वेगाने खाली कोसळताना पाहिले होते.
ते सायकलवर बसले आणि तातडीने घटनास्थळी पोहोचले. नवे कोरे पिट्स विमान मोडले होते.
आणि त्यातून गडद काळा धूर बाहेर येत होता. पण आग लागली नव्हती.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
रानी सिंग 'सोनिया गांधी: एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ' या आपल्या पुस्तकात लिहितात, "सक्सेना यांच्या सहकाऱ्याने पाहिले की संजय गांधी मृत अवस्थेत आहेत आणि विमानाच्या ढिगाऱ्यापासून चार फूट अंतरावर त्यांचा मृतदेह आहे. सक्सेना यांच्या शरीराचा खालचा भाग ढिगाऱ्याखाली अडकला आहे आणि चेहरा बाहेर आहे."
"त्याच वेळी इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह अकबर रोड येथे त्यांची वाट पाहत होते. त्यांनी ऐकलं की इंदिरा गांधी यांचे सहायक आर. केय धवन यांनी मोठी दुर्घटना झाल्याचं सांगितलं. इंदिरा गांधी जशाच तशा धवन यांच्यासोबत अम्बेसिडर गाडीत बसल्या आणि घटनास्थळी रवाना झाल्या."
"त्यांच्या मागोमाग व्हीपी सिंह सुद्धा तिथे पोहचले. इंदिरा गांधी पोहचण्यापूर्वी अग्निशमन दलाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले होते आणि रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती."
दु:खातही आसामची चिंता
रानी सिंह आपल्या पुस्तकात लिहितात, "इंदिरा गांधी स्वत: रुग्णवाहिकेत बसल्या आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहचल्या. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले."

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
"सगळ्यांत आधी रुग्णालयात पोहोचणाऱ्यांपैकी होते अटल बिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर. इंदिरा गांधी यांनी आपल्या भावना लपवण्यासाठी काळा चष्मा लावला होता."
पूपुल जयकर 'इंदिरा गांधी' पुस्तकात लिहितात, त्या एकट्या उभ्या असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं, "इंदिराजी या कठीण प्रसंगी तुम्हाला धैर्याने काम घ्यावे लागेल. यावर त्या काहीही बोलल्या नाहीत. पण वाजपेयी यांच्याकडे त्यांनी असे पाहिले की जणू त्या विचारत आहेत तुम्हाला काय म्हणायचे आहे?"
"वाजपेयी थोडे विचलित झाले आणि आपण हे बोलून चूक तर केली नाही ना असा विचार करू लागले. यानंतर इंदिरा गांधी यांनी चंद्रशेखर यांच्याकडे पाहिले आणि बाजूला नेऊन त्यांना विचारले की, अनेक दिवसांपासून मी तुम्हाला आसामविषयी विचारणार होते, त्याठिकाणी परिस्थिती फार गंभीर आहे."
"चंद्रशेखर यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले याबद्दल आपण नंतर बोलू. पण इंदिरा गांधी म्हणाल्या, नाही हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे."
"चंद्रशेखर यांना कळत नव्हते की एक आई आसामबद्दल कसं विचारू शकते जेव्हा मुलाचा मृतदेह बाजूच्या खोलीत आहे."
व्ही. पी. सिंह यांना सूचना आणि मेनकांचं सांत्वन
पुपुल जयकरांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "संध्याकाळी जेव्हा अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि हेमवती नंदन बहुगुणा भेटले तेव्हा वाजपेयींनी म्हटलं की, एकतर त्यांनी दुःख पचवलंय किंवा त्या अगदीच दगड बनल्या आहेत. या कठीण प्रसंगातही आपण आसाम आणि देशाच्या समस्यांबद्दल विचार करतोय असं त्यांना दाखवून द्यायचं असेल.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पाठोपाठ पोहोचलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांना पाहूनही इंदिरा गांधींनी म्हटलं, की तुम्ही तातडीने लखनौला परत जा. तिथे अनेक गोष्टी आहेत, ज्यावर विचार होणं गरजेचं आहे.
डॉक्टर जोपर्यंत संजय गांधींचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह ठीक करण्याचा प्रयत्न करत होते, तोपर्यंत इंदिरा गांधी त्याच खोलीत थांबून राहिल्या होत्या.
दरम्यान, या अपघाताची बातमी कळल्यानंतर संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.
जिथे संजय गांधी यांचा मृतदेह ठीक केला जात होता, त्या खोलीतून इंदिरा गांधी बाहेर पडल्या. त्यांनी मेनका यांना धीर दिला आणि शेजारच्या खोलीत जाऊन बसायला सांगितलं. त्यांनी कॅप्टन सक्सेनांच्या आई आणि पत्नीलाही धीर दिला.
संजय गांधी यांचा मृतदेह ठीक करायला डॉक्टरांना तीन तास लागले. त्यांचं काम संपल्यावर इंदिरा गांधींनी डॉक्टरांना म्हटलं की, आता मला माझ्या मुलासोबत काही वेळ एकटीला थांबायचं आहे.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
सुरुवातीला डॉक्टर बिचकले, मात्र इंदिरा गांधींनी थोड्याशा कठोरपणेच त्यांना बाहेर जायला सांगितलं. चार मिनिटांनी त्या खोलीच्या बाहेर आल्या. ज्या खोलीत मेनका बसल्या होत्या त्या खोलीत गेल्या आणि संजय आपल्याला सोडून गेलाय हे सांगितलं.
विचित्र पद्धतीचा दिलासा
इंदिरा गांधी संजय यांचा मृतदेह घेऊन एक अकबर रोडवर आल्या. तिथे बर्फाच्या लादीवर संजय यांचा मृतदेह ठेवण्यात आला. संजय यांच्या एका डोळ्यावर आणि डोक्याला पट्टी बांधलेली होती आणि नाकही चेचलं गेलं होतं.
दुसऱ्या दिवशी संजय यांच्यावर अंतिम संस्कार होत असताना इंदिरा गांधींनी पूर्णवेळ मेनका यांचा हात हातात धरून ठेवला होता. राजीव गांधी चितेला अग्नी देण्यासाठी पुढे झाले, तेव्हा इंदिरा यांनी त्यांना थांबवलं.
संजय यांचा मृतदेह काँग्रेसच्या झेंड्यात लपेटला होता. तो झेंडा काढायचा राहून गेला होता. मृतदेहावरची लाकडं हटविण्यात आली आणि झेंडा काढून घेऊन संजय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
25 जूनला संजय यांच्या अस्थि एक अकबर रोडवरच्या घरी आणून तिथल्या लॉनमध्ये ठेवण्यात आल्या. त्यावेळी पहिल्यांदा इंदिरा गांधी स्वतःला सावरू शकल्या नाहीत. त्यांना रडू फुटलं. राजीव गांधींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार दिला.
पुढच्या चारच दिवसात म्हणजे 27 जूनला इंदिरा गांधी साउथ ब्लॉकमधल्या आपल्या कार्यालयात फाइलींवर सह्या करत होत्या...जणूकाही घडलंच नव्हतं.
राज थापर यांनी आपल्या 'ऑल दीज इयर्स' या पुस्तकात लिहिलं आहे, "संजय यांच्या मृत्युमुळे सगळा देश हळहळला. कारण ही दुःखद घटना होती. पण त्याचबरोबर लोकांना एका विचित्र पद्धतीचा दिलासाही वाटत होता. या सुटकेचा अनुभवही पूर्ण देशात जाणवत होता."
अनेक वर्षांनंतर इंदिरा गांधींचे चुलत भाऊ आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत बी. के. नेहरू यांनीही आपल्या 'नाइस गाइज फिनिश सेकेंड' या पुस्तकातही अशाच काहीशा भावना व्यक्त केल्या होत्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








