You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रशांत किशोर: 'तिसरी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही' #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. तिसरी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही-प्रशांत किशोर
"तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल असं विश्वासाने सांगू शकत नाही," असं प्रशांत किशोर म्हणाले. तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीबाबत आपल्याला विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल यावरही आपला विश्वास नाही, असं किशोर यांनी सांगितलं. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.
प्रशांत किशोर यांनी आठवडाभराच्या कालावधीत सोमवारी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय पातळीवर भाजप आणि काँग्रेस सोडून तिसरी आघाडी बनण्याच्या चर्चांना उधाण आलं. यापूर्वी किशोर यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती.
लोकसभा निवडणुकांना अजून 3 वर्षांचा कालावधी आहे. पण सत्ताधारी भाजपविरोधात तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची दिल्लीत चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची समोवारी दिल्लीत झालेली बैठक ही आगामी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेवून झाल्याचं बोललं जातंय.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी 'मिशन 2024' सुरू केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झाली.
2. राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन दिली आहे.
राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. डेल्टा प्लस कोरोना वेरियंट पहिल्या वेरियंट पेक्षा धोकादायक अशल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसेझ कंट्रोल, नवी दिल्लीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांनी दिली आहे.
3. मुंबै बँक घोटाळ्याचा तपास झालाच नाही- महानगर दंडाधिकाऱ्यांचे ताशेरे
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेतील 123 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्य़ाचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तपासच केलेला नाही, अशा शब्दांत महानगरदंडाधिकाऱ्यांनी पोलीस तपासाच्या कार्यपद्धतीबाबत ताशेरे ओढले आहेत.
त्यामुळे या प्रकरणाचा पुनर्तपास करून अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. मुंबै बँकेचे अध्यक्ष व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांवर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
आर्थिक गुन्हे विभागाकडून या फौजदारी गुन्ह्याचा नीट तपास झालेला नाही, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रथम निष्कर्ष अहवालातील सर्व आरोप फौजदारी स्वरूपाचे असतानाही त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक होते. परंतु तशी चौकशी करण्यात आलेली नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
172 कोटींचे रोखे 165 कोटींना विकणे, वैयक्तिक नावाने मोठी रक्कम घेणे, 74 बोगस मजूर संस्थांना कर्जे आदी गंभीर आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत. आर्थिक गुन्हे विभागाने 74 पैकी फक्त 16 मजूर संस्थांचीच तपासणी केली.
हा लोकांचा पैसा आहे. त्याचा असा गैरवापर करणे योग्य नाही, अशा शब्दात याप्रकरणी तपास होणे आवश्यक असल्याचे आपले मत बनल्याचे महानगरदंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट करीत याप्रकरणी सी-समरी अहवाल फेटाळला.
आपण कुठलाही घोटाळा केलेला नाही. सरकारविरुद्ध आपण सतत बोलत असतो. त्यामुळे आपला आवाज दाबण्यासाठीच आता पोलिसांमार्फत आपल्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, असं विधान परिषदेतील पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
4. 'मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?'-स्मृती इराणी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात वाद सुरू आहे.
"महिलांवर बलात्कार होत आहेत मात्र मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?" असा सवाल इराणी यांनी केला. तृणमूलला मत न दिल्याने हत्या केला जात असल्याचा आरोपदेखील इराणी यांनी केला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
"देशात पहिल्यांदा निवडणुकीच्या निकालानंतर लोक आपली घरं, गावं सोडून जात आहेत. महिलांना घराबाहेर काढून बलात्कार होत आहेत," असं इराणी यांनी म्हटलं आहे.
"पश्चिम बंगालमध्ये कोरोना वाढीसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. त्यातून बॅनर्जी यांचे संस्कार दिसतात. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी असा करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात," असं देखील इराणी म्हणाल्या आहेत.
5. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा इमेल, पुण्यातून एकाला अटक
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा एक ई-मेल गृहविभागात आल्याने सोमवारी मोठी खळबळ उडाली. या ई-मेलनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) मंत्रालयात दाखल झालं असून येथे कसून तपासणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी एका व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, "मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पुण्यातून आला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही म्हणून त्याने गृहविभागाला हा ई-मेल केल्याचं सांगण्यात येत आहे. शैलेश हा पुण्यातील घोरपडी भागात राहतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)