मराठा आरक्षण : प्रकाश आंबेडकर आंदोलनात उतरून काय साध्य करू पाहताहेत?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

मराठा आरक्षणाचा प्रश्न सद्यस्थितीतल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरु पाहतोय. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने दिलेलं हे आरक्षण रद्द झाल्यानंतर आरक्षणासाठी पुढील कायदेशीर लढाईसोबतच नवी राजकीय मोर्चेबांधणी होतांना दिसते आहे.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती सध्या त्याचा चेहरा बनले आहेत. या निकालानंतर ते अनेक नेत्यांना भेटले, त्यात सर्वांत शेवटी प्रकाश आंबेडकरांना भेटले. तेव्हापासून या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर स्पष्ट आणि आग्रही भूमिका घेतांना दिसताहेत.

पुण्यात जेव्हा आंबेडकर आणि संभाजीराजे यांची भेट झाली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी 'महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला असून संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा' असं सुचवून एका नव्या चर्चेला सुरुवात करुन दिली होती.

त्यानंतरही त्यांनी आतापर्यंत चूक कुठे झाली आणि पुढे काय करायला हवं याबद्दल स्पष्ट भूमिका अनेकदा मांडली आहे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. बुधवारी जेव्हा कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी मूक आंदोलनाचं आयोजन केलं होतं, त्यालाही प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: जाऊन हजेरी लावली.

'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करून प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या निवडणुकीअगोदर अनेक वंचित घटकांची राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. यात आरक्षण असलेल्या मागास, ओबीसी वर्गांसोबतच आदिवासींहस इतर अनेक वंचित घटक यात होते.

'वंचित'मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान AIMIM सुद्धा सहभागी झाली होती. महाराष्ट्रात दोन्ही निवडणुकांमध्ये 'वंचित'नं मोठा प्रभाव पाडला. उमेदवार निवडून आले नाहीत, पण मतांची टक्केवारी लक्षणीय होती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीला त्याचा अनेक जागांवर फटका बसला होता.

वंचितांचं प्रस्थापितांविरुद्धचं राजकारण अशी मांडणी त्यावेळेस आंबेडकर यांनी केली होती. आता आरक्षणाच्या मुद्द्यावर गरीब मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून प्रस्थापित श्रीमंत मराठा समाजापेक्षा वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याची गरज आहे, असं सातत्यानं करून प्रकाश आंबेडकर काही नवी राजकीय आघाडी करु पाहताहेत का, असा प्रश्न विचारला जातो आहे.

'गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात मागास, ओबीसी, आदिवासी नाहीत'

प्रस्थापित मराठा राजकारणाबद्दलची आंबेडकर यांची भूमिका सर्वश्रुत आहे. पण आता आरक्षणाच्या मुद्द्यावर गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी विभागणी करून आरक्षणासाठी न्यायालयीन लढ्यासोबतच स्वत:ची वेगळी राजकीय ओळखही निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी गरीब मराठा समाजाला केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय आल्यानंतर 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नव्या राजकीय आयडेंटिटीची गरज मांडली होती.

"पूर्ण मराठा समाज हा काही श्रीमंत नाही. त्यांच्यापैकी 10 टक्के मराठा समाज हा श्रीमंत आहे आणि उरलेला हा गरीब आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निर्णयाला दोषी मी गरीब मराठ्यालाही धरतो आहे. याचं कारण असं आहे की, अनेक वेळा सांगूनही की इथल्या गरीब मराठ्यांच्या विरोधात ओबीसी नाही, आदिवासी नाही आणि शेड्यूल्ड कास्टही नाही.

गरीब मराठ्याच्या विरोधात श्रीमंत मराठाच आहे, हे अनेक वेळेला माझं सांगून झालेलं आहे. पण गरीब मराठा आपली वेगळी आयडेंटिटी उभी करतो आहे असं कुठेही दिसत नाही. तो श्रीमंत मराठ्यांबरोबरच राहतो आहे," असं प्रकाश आंबेडकर या मुलाखतीत म्हणाले होते.

आंबेडकर या मुद्द्यावर असंही म्हणाले होते की सगळ्याच राजकीय पक्षांमधले प्रस्थापित श्रीमंत मराठा या आरक्षणाच्या मुद्द्यावर दिशाभूल करतो आहे. "जो काही मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला, तो आयोग केंद्र शासनाच्या असणाऱ्या आयोगाशी जुळतोय का, जुळवून घेतलं आहे का, मान्यता करुन घेतली आहे का, तर अजिबात नाही.

त्यामुळे जी व्यवस्था सुप्रीम कोर्टानं निर्माण केली, तीच व्यवस्था इथल्या श्रीमंत मराठा, मग तो भाजपातला असेल, कॉंग्रेसमधला असेल, राष्ट्रवादीवाला असेल, त्या श्रीमंत मराठ्यानं तीच व्यवस्था नाकारली आणि आज आपल्याला असं दिसतं की गरीब मराठ्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे," प्रकाश आंबेडकर म्हणाले.

"ओबीसीचं ताट आणि गरीब मराठ्याचं ताट आरक्षणाच्या बाबतीत वेगळं असू द्या. पण त्यासाठी गरीब मराठ्यानं आपली आयडेंटिटी समाजकारणात आणि राजकारणात वेगळी दाखवली पाहिजे," असं म्हणतांना आंबेडकर नव्या राजकीय आघाडीचं सूतोवाच करताहेत का, अशा प्रश्न विचारला जातो आहे.

हाच त्यांचा मुद्दा संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी मांडला आणि आरक्षणासाठी राजसत्तेची गरज असल्याचं म्हटलं.

"राजसत्तेशिवाय हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला शिळेपणा आलेला आहे. तो शिळेपणा जाऊन ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी जर पुढाकार घेतला तर तो ताजेपणा येऊ शकतो." त्यांच्या याच सूचक वक्तव्यामध्ये नवी राजकीय संधी आहे अशी चर्चा सुरु झाली.

मुंबईच्या पत्रकार परिषदेत नव्या राजकीय पक्षाबद्दल संभाजीराजे यांना विचारलं असता 'बहुजनांकडनं तशी मागणी झाल्यास नक्की विचार करु' अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं.

यानंतर 'भीम-शाहू युती' अशी चर्चाही सुरु झाली. समाजमाध्यमांवरही त्याला प्रतिसाद पहायला मिळाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक संबंधही नोंद आहे. माणगावची परिषद, बाबासाहेबांना केलेली मदत हाही इतिहास आहे.

महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीच्या अग्रभागी ही दोन नावं राहिली आहेत आणि आजच्या राजकारणावरही त्यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळे या ऐतिहासिक संदर्भानंही संभाजीराजे-आंबेडकर भेटीनंतर चर्चा सुरु झाली.

एका मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी 'सायमन कमिशनसमोर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची मागणी केली होती, त्यात हा गरीब मराठाही त्यांनी अंतर्भूत केला होता' हे सांगून हे संबंध अधोरेखित केले.

'वंचित म्हणजे मराठाविरोध नाही हे अधोरेखित करत आहेत'

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते प्रकाश आंबेडकर यांच्या आजपर्यंतच्या राजकीय चालींप्रमाणेच आताचे प्रयत्न दिसत आहेत. "पूर्वीचे त्यांनी प्रत्यक्षात आणलेले जर अकोला पॅटर्न किंवा किनवट पॅटर्न आपण पाहिले तर त्यात असं दिसतं की कायम प्रस्थापित पक्षांविरुद्ध आघाडी उभारुन राजकारण हे प्रकाश आंबेडकर यांचं वैशिष्ट्य आहे.

वंचित बहुजन आघाडी मध्येही त्यांनी हाच प्रयोग केला होता आणि AIMIM ला सुद्धा त्यांनी बरोबर घेतलं ज्यांच्यासोबत अन्य पक्ष जाऊ शकत नाहीत. तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. आता वंचित सोबत आंबेडकर हा नवा प्रयोग करत आहेत. त्यांचं राजकारण कायम असं राहिलं आहे," देशपांडे म्हणतात.

दुसरीकडे देशपांडे यांचं मत असंही आहे की 'वंचित बहुजन आघाडी'ही मराठा विरोधी नाही आहे. "आंबेडकरांनी आणि 'वंचित'नंही यापूर्वी आरक्षणाची मांडणी समाजातल्या प्रत्येक दुर्बल घटकाला पाठबळ अशीच केली आहे.

सत्ता हाती एकवटलेल्या मराठा घराण्यांविरोधात त्यांनी कायमच भूमिका घेतली आहे. पण इथे जे त्या समाजातले दुर्बल वा वंचित आहेत त्यांनाही आपल्यासोबत घेता येतं आहे का असा तो प्रयत्न आहे. त्यामुळेच वंचित म्हणजे मराठाविरोध नाही हे ते अधोरेखित करत आहेत," असं मत देशपांडे व्यक्त करतात.

ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांच्या मतेही हा एका नव्या राजकीय समीकरणाच्या चाचपणीचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होतो आहे.

"ते सध्या सत्ताधारी मराठा आणि गरीब मराठा अशी सतत मांडणी करताहेत. गरीब वर्गाला आरक्षण मिळावं अशी ती भूमिका आहे. आजपर्यंत मराठा आंदोलनात आपण पाहिलं की या आंदोलनाला सामूहिक नेतृत्व होतं. आता पहिल्यांदाच संभाजीराजेंच्या निमित्तानं त्याला एक चेहरा मिळतो आहे.

त्यामुळे त्यांच्याशी भेटी करुन, सोबत राहून नवी जोडणी करता येते का असं ते पाहात असावेत. सध्या मला ही चाचपणी वाटते. ते प्रत्यक्षात कसं येईल हे आपल्याला थोड्या काळानं अथवा निवडणुका जवळ आल्या की समजेल," कांबळे म्हणतात.

मधू कांबळे यांच्या मतेही मराठा समाजातल्या या वंचित वर्गाच्या जवळ गेलं तर गेल्या काही काळातल्या भूमिकांमुळे मराठाविरोधी अशी प्रतिमा झाली आहे ती जाईल आणि आरक्षणाची गरज असलेल्या या वर्गाच्या जवळ त्यांना जाता येईल असं दिसतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)