Cristiano Ronaldo: कोका कोला, पेप्सी आणि इतर सॉफ्टड्रिंक्स आरोग्यासाठी वाईट असतात का?

फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली बाजूला केली आणि कोका कोला कंपनीला अब्जावधींचा फटका बसला. सॉफ्ट ड्रिंक्स खरंच शरीराला अपाय करतात का? हा प्रश्न त्यामुळे पुन्हा चर्चेत आला. प्रमाणाबाहेर सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने आरोग्य बिघडतं का? हे प्रमाण नेमकं कसं निश्चित करायचं?

उन्हाळ्याच्या काळात सॉफ्ट ड्रिंक्सचा खप सर्रास वाढतो. काहींना सोडा असलेली पेयं आवडतात तर काहींना सोडा नसलेली. पण तात्पुरता दिलासा मिळत असला तरी या सगळ्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतात?

पेप्सी, कोकसारखी पेयं आरोग्याला घातक असतात का?

साखरयुक्त बाटलीबंद पेयं आपल्या शरीराला इजा पोहोचवू शकतात असं तज्ज्ञ म्हणतात. पण नेमके धोके काय असतात? ज्या पेयात 5 टक्क्यापेक्षा जास्त साखर असते त्यांना साखरयुक्त पेय म्हणतात. म्हणजे बाटलीबंद ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, मिल्क शेक, सॉफ्ट ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी त्यात मोडतात.

Université Sorbonne Paris Cité या फ्रेंच विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं होतं की रोज 100 मिलीलीटर एक्स्ट्रा साखरयुक्त पेय प्यायलो तर कॅन्सरचा धोका 18 पटींनी वाढतो.

पण याचा अर्थ साखरयुक्त पेय प्यायल्याने कॅन्सर होतो असा घ्यायचा का? तर नाही. अतिरिक्त साखर आणि कॅन्सर यांचा थेट संबंध जोडता येत नाही. पण त्या अतिरिक्त साखरेमुळे शरीरावर परिणाम होतात.

लठ्ठपणा हात्यातला एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे आणि लठ्ठपणाचा अनेक प्रकारच्या कॅन्सरशी संबंध असू शकतो त्यामुळे अशी अतिरिक्त साखर असलेली पेयं पिऊ नये असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

ब्रिटिश आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात असं दिसून आलं होतं की दररोज सॉफ्ट ड्रिंक किंवा साखरयुक्त पेय पिणाऱ्या लोकांचं ब्लड प्रेशर अशी पेयं न पिणाऱ्यांपेक्षा जास्त होतं.

वजन, उंची असे फॅक्टर गृहित धरून त्यांचं गणित घातलं तरीही ही पेयं पिण्याचा आणि त्यामुळे बीपी वाढण्याचा थेट धोका दिसून आला.

अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणतं की एका आठवड्यात 335 मिली पेयाचे तीनच कॅन प्यावे.

ज्यांना उच्च रक्तदाब असतो त्यांना हॉर्ट अटॅकचाही धोका वाढतो असं दिसून आलंय. तसंच या पेयांमधून आपल्या शरीरात अतिरिक्त कॅलरी जात असतात. आपण जर त्या खर्च करत नसलो तर त्या साहजिकच शरीरात साठत जातात आणि त्याची परिणिती लठ्ठपणात होते. लठ्ठपणा इतर अनेक व्यांधींना निमंत्रण देऊ शकतो.

अनेक वेगवेगळ्या संशोधनांमधून असं दिसून आलंय की जी डाएट ड्रिंक्स असतात, ज्यांच्यात साखर नाही तर आर्टफिशियल स्वीटनर असतात त्यांचा शरीराला कमी धोका असतो. पण म्हणजे सोडा सोडायचा आणि डाएट सोडा प्यायचा का?

शीतपेयांचं व्यसन लागू शकतं का?

जेव्हा एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलंय असं आपण म्हणतो तेव्हा काय होत असतं? आपल्या मेंदूतले काही भाग असतात ज्यांच्यातून आपल्याला रिवॉर्ड सेन्सेशन येतं.

म्हणजे एखादी गोष्ट केल्याने खूप छान वाटणं. तळलेले पदार्थ, बाहेरचं खाणं, प्रोसेस्ड फूड यासारख्या गोष्टींमुळे आपल्याला छान वाटतं. पण ते सारखं सारखं करत राहिलो तर आपले रिवॉर्ड सेन्सर खूप जास्त कार्यान्वित होतात आणि आपल्या शरीराला गरज नसतानाही मेंदू ते पदार्थ आणखीन खाण्याचा संदेश देत राहतो.

प्रक्रिया केलेली साखर, कॅफिन यांसारख्या घटकपदार्थांच्या सततच्या सेवनामुळे हे घडू शकतं आणि वेळीच थांबलो नाही तर त्याचं व्यसनही लागू शकतं.

अनेक शीतपेयांमध्ये कॅफिन असतं. प्रमाणाबाहेर कॅफिनचं सेवन करत राहण्याने त्याचं व्यसन लागू शकतं.

सिलिकॉन व्हॅलीमधल्या एक यशस्वी उद्योजक कॅरा गोल्डिन यांचा स्वतःचा अनुभव होता, त्या दिवसाला डाएट सोडाचे 10 कॅन्स प्यायच्या. हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांना त्याचं एकप्रकारचं व्यसन लागतंय आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. त्या सांगतात की त्यांनी अशाप्रकारच्या पेयांचं सेवन बंद केलं आणि साधारण अडीच आठवड्यात त्यांचं वजन वजन जवळपास 9 किलोने कमी झालं.

शीतपेय कंपन्या काय म्हणतात?

कोका कोला कंपनीने म्हटलंय की "जगभरातील लठ्ठपणाची समस्या हाताळण्यात एक प्रभावी सहकारी होण्यासाठी आमचा प्रवास सुरू आहे."

"आमचा भर आमच्या पेयांमधील साखर कमी करण्यावर तसंच कमी साखर आणि साखरविरहित पेयांना प्रोत्साहन देण्यावर आहे. लोकांच्या आहारातील कॅलरींमध्ये अतिरिक्त साखरेचं प्रमाण 10 टक्क्याहून कमी असावं या WHOच्या सूचनेला यातून पाठबळ मिळेल."

शीतपेयांचा आरोग्यावर होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांबद्दलच्या ब्रिटीश आणि अमेरिकन संशोधनावर बोलताना ब्रिटीश सॉफ्ट ड्रिंक्स असोसएशनने म्हटलं होतं, "शीतपेयं सुरक्षित आहेत, पण सर्वंच अन्नपदार्थ आणि पेयांप्रमाणे त्यांचं सेवन प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून झालं पाहिजे."

आरोग्यावरच नाही निसर्गावरही परिणाम

शीतपेयं बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसलं जातं. जगभरात अनेक ठिकाणी या कंपन्यांवर अतिरिक्त पाणी उपसा करून स्थानिक पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे आरोप झालेत.

भारतात केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही काळ कोका कोला आणि पेप्सीविरोधात रान उठलं होतं. तामिळनाडूमध्ये 2017 साली यो दोन्ही शीतपेयांवर बंदी घातली गेली होती. 'नद्यांमधून भरमसाठ पाणी उपसून स्थानिक शेतकऱ्यांना दुष्काळात ढकलणाऱ्या' पेप्सी आणि कोका कोलावर बंदी घालण्याचा निर्णय तामिळनाडूच्या दोन मोठ्या व्यापारी संघटनांनी घेतला होता.

केरळ सरकारने 2011 साली कोका कोला कंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागेल अशी तरतूद करणारा कायदा संमत केला होता. पालक्काडमधल्या कोकच्या प्लँटमुळे तिथल्या निसर्गाचं मोठं नुकसान होत असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा होता ज्यानंतर केरळ सरकारने हा निर्णय घेतला होता. कोका कोलाने या निर्णयाला निराशाजनक म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)