You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Mumbai rain: मुंबईसह कोकण परिसरात हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार
मुंबई शहर आणि उपनगरात आज (9 जून) सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
पुढील 3 ते 4 तासांत या भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून मिठी नदीनेही पूररेषा ओलांडल्याची माहिती मिळत आहे. तसंच मुंबई परिसरात लोकल वाहतूकही ठप्प झाली आहे. शिवाय रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही संथगतीने होत असल्याचं दिसून येत आहे.
सकाळच्या तुलनेत दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून आलं. तरी वेधशाळेने पुढील काही तास सतत पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सायंकाळी साडेपाचपर्यंत मुंबईत 220 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. पुढील 2-3 दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
नदीने आपली पूररेषा ओलांडल्याने आसपासच्या परिसरात पाणी शिरू लागलं आहे. कुर्ला परिसरातील काही ठिकाणी तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे. हे या भागात दरवर्षी घडतं, अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने ANI वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
दादर (हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, गांधी मर्केट, अंधेरी, मालाड अशा काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर शीव ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सध्या ठप्प आहे.
चुनाभट्टी रेल्वे ट्रॅकजवळ पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी मार्गावरील हार्बर रेल्वे सेवा सुद्धा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मध्य आणि हार्बल रेल्वे सेवा ठप्प असल्याने काही रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर प्रवाशांची गर्दी आहे.
कुलाबा वेधशाळेने मुंबई महानगर क्षेत्रात 10 ते 13 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबईत आजपासून मान्सून दाखल झाल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला मात्र अजून दोन दिवस लागतील, असा अंदाजही मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडचा आढावा घेतला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्यासंदर्भात आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं, "9 जूनपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू होईल. 11 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा प्रभाव सर्वाधिक उत्तर कोकणात असेल.
मुंबई, ठाणे, रायगड या भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यासाठी नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे."
नुकतंच तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान कोकणात बघायला मिळालं. त्यामुळे या अतिवृष्टीसाठी सरकारकडून पूर्वनियोजन करण्यात आले आहे. यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांची वॉर रुमला भेट, सतर्कतेची सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील वॉर रुमला भेट दिली.
आजच्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलं आहे.
दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे आणि आयुक्त चहल मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. तसंच त्याबाबत संबंधितांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.
हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली.
मुंबई तसंच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य व्यवस्थित सुरू राहील, याची काळजी घ्यावी.
कोव्हिडसह इतर कोणत्याही रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईत पम्पिंग स्टेशन्स कार्यरत ठेवावीत, साचलेल्या पाण्याचा तातडीने उपसा करावा, तसंच पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्यास पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित योग्य ती कार्यवाही करून अडथळे दूर करावेत, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.
पावसाळा पूर्वतयारी झाल्याचा पालिकेचा दावा
पावसाळा सुरू झाला की, मुंबई पाण्याखाली जाते हे चित्र प्रत्येकवर्षी दिसतं. नुकतंच मुंबईत तिसऱ्या टप्यानुसार 'अनलॉक' झाल्यामुळे लोकं घराबाहेर पडू लागले आहेत.
बसेसमध्ये 100% प्रवासाला परवानगी असली तरी लोकल ट्रेन सध्या सामान्यांसाठी बंद आहेत. त्यामुळे दरवर्षीसारखे या पावसामुळे लोकल ट्रेन ठप्प होऊन सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. पण बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या पावसाचा फटका बसू शकतो.
मुंबईत पाणी साचणार नाही किंवा साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेने काय तयारी केली आहे? मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, "या वर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी 774 पंप बसवण्यात आले आहेत. या पंपाद्वारे पाण्याचा निचरा होऊ शकेल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंते पाणी साचण्याच्या ठिकाणी उपस्थित राहून पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्याचे काम करतील. मुंबईचा सखल भाग असलेला हिंदमाता परिसरात दोन मोठे टॅंक उभे करण्यात आले आहे. या टँकरद्वारे साचलेले पाणी वळते करून ते साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन 'स्कॉड' तयार करण्यात आले आहेत. हे 'स्कॉड' अतिवृष्टीमुळे झाडे पडली, त्यामुळे हायटाईडमध्ये अडथळे निर्माण झाले तर त्याच्या निवारणाचं काम करतील."
इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं, "वाहतूकीसाठी रस्ते मोकळे राहतील याची काळजी घेतील. काही नागरिकांचे स्थलांतर करण्याची गरज पडली तर त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात 5 महापालिकेच्या शाळा तयार ठेवल्या आहेत. लसीकरण केंद्र, रूग्णालये, लसीचे साठे असलेले शीतगृह याठिकाणी 'पॉवर बॅकअप' देण्यात आले आहेत."
रेल्वेकडून सहकार्य नाही, महापौरांचा आरोप
पावसाळी कामादरम्यान रेल्वेकडून सहकार्य नसल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
'पहिल्याच पावसात मुंबई तुंबली'
मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि पहिल्याच पावसात मुंबई तुंबली अशी टीका विरोधकांनी केलीय. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबई महानगरपालिकेचा 104 % नालेसफाई झाल्याचा दावा फोल ठरला असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबते असा आरोपही केला.
ते म्हणाले, "पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. 104 टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा 1 सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई."
मुंबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही टीका केली.
ट्वीट करून त्यांनी म्हटलं, "पुन्हा एकदा 'मुंबईची तुंबई झाली', मुंबईत पाणी भरवून दाखवलं! मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं यापूर्वी अनिल परब म्हणाले होते. परंतु आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की महापालिका जबाबदार?' असा प्रश्न दरेकर यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत काय ठरले?
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बैठक घेतली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यात आला.
या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यांनी पुढे याबाबत प्रशासनाला आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सूचना दिल्या.
- रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना, धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
- अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात. ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे.
- या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना देण्यात यावी.
- किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.
- जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा.
- मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
- अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन चा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणाऱ्या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्सची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी.
- दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी.
- सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाबरोबर पावसाळी आजार पसरले तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)