जात पंचायतीच्या बहिष्कारामुळे वडिलांच्या पार्थिवाला मुलींनी दिला खांदा

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे वडिलांच्या पार्थिवाला मुलींनाही खांदा द्यावा लागण्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे.
चंद्रपूर शहरात राहाणाऱ्या प्रकाश ओगले यांनी आंतरजातीय विवाह केल्याच्या आरोपावरून त्यांच्या कुटुंबावर गेल्या 17 वर्षांपासून जात पंचायतीने कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. प्रकाश ओगलेंच्या मृत्यूनंतरही बहिष्कार कायम राहिला. रविवारी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी समाजातील कुणीही पुढे आले नाही. अखेर सात मुलींनी आणि दोन मुलांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कार पार पाडले.
प्रकाश ओगले हे गोंधळी समाजाचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरातील भंगाराम वार्डात ते वास्तव्यास होते. आंतरजातीय विवाह केल्याच्या आरोपावरून जात पंचायतीने गेल्या 17 वर्षांपासून त्यांना बहिष्कृत केले होते.

बहिष्कार परत घेण्यासाठी दंडाची रक्कम भरण्यास त्यांना पंचायतीमार्फत सांगितले होते. मात्र गरिबीमुळे ते दंड भरू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना लग्न समारंभात, समाजातील इतर कार्यक्रमात मानाचा टिळा लावला जात नव्हता.
प्रकाश यांची पत्नी गोंधळी समाजातीलच असल्याचे अनेक पुरावे दिल्यानंतरही बहिष्कार परत घेण्यात आला नाही. जात पंचायतीचा दंडावर अधिक जोर होता आणि तो भरण्यास वडील सक्षम नव्हते असं प्रकाश यांची मुलगी जयश्री म्हणाल्या. जयश्री म्हणतात "गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्या समाजात जातपंचायत सुरू आहे."

जयश्री सांगतात, "कोणत्याही कारणावरून जात पंचायतीमधून बहिष्कार आणि दंड आकारला जातो. जातपंचायतीचा बहिष्कार दंड दिला की तो परत घेतला जातो. पण जे दंड भरू शकत नाही त्यांचं काय. त्यात माझ्या वडिलांनी कोणतीही चूक नसताना त्यांना समाजातून बाहेर काढण्यात आले."
"माझ्या मोठ्या भावाला समाजात मानाचा टिळा लावायचे. मग माझ्या भावाला समाजातील मानतात तर वडिलांना का नाही असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी भावाचा टिळा मिटवला. आम्हाला पदोपदी अपमानित केले जात होते. आमच्या कुटुंबात लग्नगाठ जोडू देत नव्हते. झालेले साखरपुडेही त्यांनी मोडले. ओगले कुटुंबातील मुलींसोबत लग्न करायचे नाही असा फर्मान जातपंचायतीने काढले होते," जयश्री सांगतात.
दीर्घ आजारपणामुळे रविवारी (6 जून) ला जयश्री यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. सामाजिक बहिष्कारामुळे त्यांच्या पार्थिवाला हात लावणाऱ्यांनाही समाजातून बाहेर काढले जाईल असा जातपंचायतीने फतवा काढला होता. त्यामुळं प्रकाश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे आले नाही. अशातच त्यांच्या मुली जातपंचायतीच्या फतव्याविरोधात उभ्या राहिल्या आणि सर्व बहिणींनी मिळून वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.
"गोंधळी समाज म्हणजे व्यवसायासाठी फिरस्तीवर राहणार समाज. फिरस्तीवर राहिल्यामुळे हा समाज शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळं जात पंचायत, रूढी परंपरा आणि कर्मकांड यात गुरफटलेले आहे," असं गोंधळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय कदम यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणतात "समाजात आतापर्यंत जवळपास लाखो लोकांना अनेक कारणावरून बहिष्कृत करण्यात आले आहे. परजातीत विवाह करणे, मुलीने जर कुटुंबाच्या मर्जीविरोधात लग्न केलं तरी समाजातून बहिष्कार करण्याचा निर्णय दिला जातो. ज्यांना टिळा लावला तो समाजातला आणि टिळा न लावलेला बहिष्कृत असं समजण्यात येतो. पण ओगले कुटुंबाने जात पंचायतीविरोधात लढा दिला त्यांनाही त्रास झाला. अशी अनेक कुटुंबं आहेत ज्यांना या जात पंचायतीचा भयंकर त्रास सहन करावा लागतोय," कदम सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








