You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे : 'मराठा समाजानं सरकार चालवणं कठीण होईल असं आंदोलन करावं' #5मोठ्या बातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) मराठ्यांनी सरकार चालवणं कठीण होईल असं आंदोलन करावं - राणे
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं," असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
"मराठ्यांनी आता महाविकास आघाडी सरकारला कारभार करता येणार नाही, असं तीव्र आंदोलन करावं," असं आवाहनही नारायण राणे यांनी केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.
"सुप्रीम कोर्टानं मागितलेलं स्पष्टीकरण का दिलं नाही? सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होईल यासाठी काळजी का घेतली नाही? प्रख्यात वकील का उभे केले नाही?" असे सवाल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारले आहेत.
मराठा समाजाला लवकर आरक्षण न दिल्यास उद्भवणाऱ्या स्थितीला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही राणेंनी दिलाय.
2) OBC आरक्षण : निवडणुकाच होऊ देणार नाही - पंकजा मुंडे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.
पंकजा मुंडे म्हणाल्या, "ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही."
"ओबीसींच्या आरक्षणासाठी जनगणनेची गरज नाही, इम्पेरिकल डाटा तयार करूनही ओबीसींना आरक्षण मिळेल," असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
"आमच्या जागाच गेल्याने आमचा समाज वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल? या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील," असं त्या म्हणाल्या.
तसंच, पुढील निवडणुका होण्याआधीच ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणीही पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारकडे केलीय.
3) गौतम गंभीरला क्लीन चिट देणाऱ्या ड्रग कंट्रोलरला कोर्टानं फटकारलं
कोरोना काळात अधिकची औषधं जमा करून ठेवण्याच्या प्रकरणात ड्रग कंट्रोलरने भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांना क्लीन चिट दिली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टानं या क्लीन चिटवर नाराजी व्यक्त करत, ड्रग कंट्रोलरला फटकारलं आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिलीय.
दिल्ली हायकोर्टानं ड्रग कंट्रोलरला एका आठवड्याचा अवधी नाकारत तातडीनं कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.
यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं ड्रग कंट्रोलरकडून या प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवला होता. या अहवालानुसार, "गौतम गंभीर यांनी 22 ते 27 एप्रिलदरम्यान मेडिकल कॅम्प आयोजित केला होता आणि यासाठी त्यांनी डिलर्सशी औषधांसाठी संपर्क केला होता. गंभीर यांनी रिटेल विक्रीत हस्तक्षेप केला नव्हता."
यावरून दिल्ली हायकोर्टानं ड्रग कंट्रोलरला फटकारलं. "एकीकडे औषधांच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव जात होता आणि तुम्ही अशा व्यक्तीची बाजू घेताय, ज्याने अधिकची औषधं जमा करून ठेवली होती?" असं हायकोर्ट म्हणाला.
4) CBSE बारावीच्या परीक्षा घेऊ नका, प्रियंका गांधींचं शिक्षणमंत्र्यांना पत्र
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांना पत्र पाठवून, कोरोनाचा धोका पाहता CBSE बारावीच्या परीक्षा न घेण्याची विनंती केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
कोरोनाची सद्यस्थिती पाहाता परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना धोक्यात टाकण्यासारखं होईल, असं प्रियंका गांधी यांनी पत्रात म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी यांनी काही विद्यार्थी आणि पालकांसोबत चर्चा केली. त्यातील मुद्देही त्यांनी शिक्षणमंत्र्यांसोबत शेअर केले आहेत.
"मी पुन्हा एकदा विनंती करते की, CBSE बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि विद्यार्थ्यांनी सूचवलेल्या मुद्द्यांवर गांभिर्यानं विचार करावा," असं प्रियंका गांधींनी म्हटलंय.
5) अभिनेत्री जूही चावला 5G नेटवर्कविरोधात दिल्ली हायकोर्टात
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला यांनी 5G नेटवर्कविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. या तंत्रज्ञानामुळे मानव आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचं म्हणत जूही चावला यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे केवळ मानवी जीवनावरच नाही, तर प्राणी आणि वनस्पतींवरही दुष्परिणाम होऊ शकतात, असं जूही चावला यांनी याचिकेतून म्हटलंय.
वकील दीपक खोसला हे जूही चावला यांच्या बाजूने कोर्टात भूमिका मांडतील.
जूही चावला यांची याचिका दिल्ली हायकोर्टातील न्या. सी. हरी शंकर यांच्यासमोर मांडण्यात आली होती. मात्र, आता ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्यात आली असून, उद्या (2 जून) यावर सुनावणी होणार आहे.
जूही चावला सध्या सिनेसृष्टीपासून दूर असल्या तरी पर्यावरण रक्षणाशी संबंधित गोष्टींमध्ये सातत्यानं पुढाकार घेत असतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)