नरेंद्र मोदींचा उल्लेख करून अब्जावधींच्या गुंतवणुकीची 'ऑफर' देणारी कंपनी आहे तरी कुठे?- बीबीसी फॅक्टचेक

फोटो स्रोत, Screenshot of the Ad
- Author, किर्ती दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आर्थिक घडामोडींचं वृत्तांकन करणारं वर्तमानपत्र 'इकॉनॉमिक टाईम्स' तसंच 'टाईम्स ऑफ इंडिया' यांच्या सोमवारच्या (24 मे) अंकात एक जाहिरात प्रकाशित झाली. पहिल्याच पानावर ही जाहिरात होती. साधी वाटणारी ही जाहिरात खळबळजनक होती.
जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित करण्यात आलं होतं. कंपनीने असं म्हटलं होतं की, त्यांना भारतात पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करायची आहे. पाचशे अब्ज डॉलर म्हणजे 36 लाख कोटी रुपये.
ही रक्कम किती प्रचंड आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. गेल्या वर्षी अमेरिकेने भारतात सात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. सोप्या शब्दात सांगायचं तर एक कंपनी जिचं कोणी नावही ऐकलेलं नाही अशी कंपनी भारतात अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीपेक्षा 71 पटपेक्षा अधिक पैसे गुंतवू इच्छित आहे.
वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर लाखो रुपये खर्चून जाहिरात देणाऱ्या या कंपनीचं नाव आहे- लँडमस रिअलिटी व्हेंचर इंक. या जाहिरातीत लँडमसचे चेअरमन म्हणून प्रदीप कुमार यांचं नाव देण्यात आलं होतं.
प्रचंड मोठी रक्कम, थेट पंतप्रधानांचा उल्लेख, नोटीसवजा जाहिरातीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा प्रस्ताव सगळंच चक्रावून टाकणारं होतं. बीबीसीने या जाहिरातीची पडताळणी केली.
पडताळणीत काय आढळलं?
बीबीसीने कंपनीची वेबसाईट https://landomus.com तपासली. अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या आणि तितक्याच मोठ्या गुंतवणुकीची तयारी केलेल्या कंपनीच्या वेबसाईटवर एकच पेज माहिती होती. हीच सगळी माहिती सोमवारी (24 मे) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत होती.
साधारणत: कंपन्यांच्या वेबसाईटवर अबाऊट अस मध्ये कंपनीविषयी, संस्थापकांविषयी माहिती असते. कंपनी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी कशी आहे तेही लिहिलेलं असतं.
न्यू जर्सीच्या गगनचुंबी इमारती कंपनीच्या वेबसाईटवरच्या कव्हरपेजवर आहेत. दहा लोकांचे फोटो, नाव आणि पद लिहिलं आहे मात्र त्यांच्याविषयी अन्य कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप कुमार सत्यप्रकाश (चेअरमन सीईओ), ममता एचएन (संचालक), यशहास प्रदीप (संचालक), रक्षित गंगाधर (संचालक) आणि गुनाश्री प्रदीप कुमार
सल्लागारांमध्ये पामेला किओ, प्रवीण ऑस्कर, प्रवीण मुरलीधरन, एव्हीव्ही भास्कर आणि नवीन सज्जन.
कंपनीच्या वेबसाईटवर अमेरिकेतल्या न्यू जर्सीचा पत्ता देण्यात आला आहे मात्र फोन नंबर देण्यात आलेला नाही. कंपनीच्या वेबसाईटवर आधीच्या कोणत्याही प्रोजेक्टविषयी काहीही माहिती नाही. कंपनीचं व्हिजन यासंदर्भात सर्वसाधारणपणे माहिती दिलेली असती. तसलं काहीही वेबसाईटवर नाही.
पत्ता आहे, पण कार्यालय नाही
वेबसाईटवर एक महत्त्वाची बातमी देण्यात आली आहे. अमेरिकेतल्या न्यू जर्सी राज्यातला पत्ता देण्यात आला आहे. लँडमस रिअलिटी व्हेंचर इंक, 6453, रिव्हरसाईड स्टेशन बुलेवर्ड, सकॉकस, न्यू जर्सी 07094, अमेरिका.
बीबीसीचे सहयोगी प्रतिनिधी सलीम रिझवी या पत्त्यावर पोहोचले. दिलेल्या पत्त्यावर एक निवासी इमारत होती. लँडमस रिअलिटीचं कार्यालय वगैरे काहीच नाही.

या इमारतीचा डेटा सांभाळणाऱ्या महिलेला बीबीसीने विचारलं की, लँडमस रिअॅलिटी कंपनीचं कार्यालय या इमारतीत आहे का? आधी कधी होतं का? त्यांनी सांगितलं की, इथे असं कोणतंही कार्यालय कधीही नव्हतं.
गोपनीयतेच्या कारणास्तव त्यांनी या इमारतीत कोण राहतं आणि बाकी तपशील दिला नाही.
यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, जाहिरातीत जो पत्ता देण्यात आला आहे तिथे लँडमस रिअलिटीचं कार्यालयच नाहीये.
बीबीसीने वेबसाईटवर दिलेल्या इमेल आयडीवर प्रश्नावली पाठवली. लँडमस रिअॅलिटी व्हेंचरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार सत्यप्रकाश यांनी प्रश्नावलीला छोटंसं उत्तर दिलं.
त्यांनी लिहिलं आहे की, "आम्ही भारत सरकारला आमची माहिती कळवली आहे. त्यांच्या प्रतिसादाची आम्हाला प्रतीक्षा आहे. जसा आम्हाला प्रतिसाद मिळेल तसं संपूर्ण माहिती तुम्हाला फॉरवर्ड करू. सगळी माहिती सार्वजनिक करू."
इतक्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाबाबत भारत सरकारतर्फे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कंपनीच्या न्यू जर्सीतील कार्यालयाविषयी आम्ही विचारलं होतं. त्यासंदर्भात लिहिलं आहे की, तुमच्या माहितीसाठी मी अमेरिकेत न्यू जर्सीत भाड्याने एक घर घेतलं आहे.
अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या कंपनीचं कार्यालय नाही. निवासी इमारत असलेल्या ठिकाणचा पत्ता देण्यात आला आहे. ही एक अचंबित करणारी गोष्ट आहे.
ताळेबंद अद्ययावत नाही
कंपनीच्या वेबसाईटवरील दिलेल्या माहितीत तपशीलात गेल्यानंतर वेबसाईट सप्टेंबर 2015 मध्ये कर्नाटकात तयार करण्यात आली आहे. ऑर्गनायझेशनचं नाव म्हणून युनायटेड लँड बँकेचं नाव देण्यात आलं आहे.
लँडमस रिअलिटी व्हेंचरसंदर्भात आम्ही शोधाशोध केली. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या मार्फत माहिती मिळाली. जुलै 2015 मध्ये लँडमस रिअलिटी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची नोंदणी बंगळुरूत करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

पेडअप कॅपिटल लाखभर रुपये आहे. यावरून कंपनी किती मोठी आहे आणि किती संसाधनं आहेत याचा अंदाज येऊ शकतो.
सप्टेंबर 2018 मध्ये कंपनीची शेवटची सर्वसाधारण सभा झाली होती. कॉर्पोरेट मंत्रालयातील आकडेवारी सांगते की, 31 मार्च 2018 नंतर कंपनीने आपल्या ताळेबंदात काहीही मांडलेलं नाही.
भारतात कार्यालयच नाही
कंपनीच्या कागदपत्रांवर बंगळुरूचा एक पत्ता देण्यात आला. लँडमस रिअलिटी व्हेंचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा पत्ता देण्यात आला आहे. एस-415, चौथा मजला, मनिपाल सेंटर, डिक्सन रोड, बंगळुरू असा हा पत्ता आहे.

आमचे बंगळुरू प्रतिनिधी इम्रान कुरेशी यांनी हा पत्ता गाठला. तिथे त्यांना लँडमस कंपनीचं कार्यालय आढळलं नाही. तिथे एका टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीचं कार्यालय आहे.
चौथ्या मजल्यावर कुठेही लँडमस कंपनीचं कार्यालय नाहीये हे स्पष्ट झालं.
याचाच अर्थ अमेरिकेतील न्यू जर्सी आणि बंगळुरूतील दिलेल्या पत्त्यावर लँडमस कंपनीची कोणतीही कार्यालयं नाहीत. हे समजल्यानंतर कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माणसांबद्दल माहिती काढायला सुरुवात केली.
ज्या दहा लोकांची नावं देण्यात आली होती त्यामध्ये एक नाव बिगरभारतीय महिलेचं होतं. त्यांचं नाव पामेला किओ.
त्यांच्या नावाचा शोध घेण्यासाठी आम्ही लिंक्डन या व्यावसायिक सोशल मीडिया साईटवर पोहोचलो. अमेरिकेतल्या 'मेक अ विश फाऊंडेशन'च्या त्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या महिलेचं नाव तसंच फोटो लँडसम कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीशी तंतोतंत जुळलं.
पाम किओ यांना आम्ही इमेल केला. मात्र अजूनतरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यांच्याकडून उत्तर आलं तर ते या बातमीत अपडेट करण्यात येईल.
याव्यतिरिक्त रक्षित गंगाधर आणि गुनाश्री प्रदीप यांची लिंक्डन प्रोफाईल्स सापडली. मात्र बऱ्याच काळापासून या प्रोफाईलवर काहीही अपडेट करण्यात आलेलं नाही. असं वाटलं की या प्रोफाईल्सचा वापरच कधी झालेला नाही.
आर्थिक विषयांची माहिती देणाऱ्या लोकांनी ही थट्टा असल्याचं म्हटलं आहे. या कंपनीविरोधात कारवाई करावी अशी मागणी काहींनी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








