रामदेव बाबांचे वक्तव्य, 'डिग्रीशिवाय मी बनलो डॉक्टर' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. डिग्रीशिवाय मी बनलो डॉक्टर-रामदेव
अॅलोपॅथीवर बोलल्याबद्दल खेद व्यक्त केल्यानंतर रामदेव बाबा पुन्हा चर्चेत आले आहेत. रामदेवबाबांचा एक आणखी व्हीडिओ समोर आला आहे ज्यात ते डॉक्टरांबाबत बोलताना दिसत आहे. यामुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता दिसत आहे.
"हजारहून अधिक डॉक्टर्स कोरोना लशीचे दोन डोस घेऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. ते डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत. डॉक्टर बनायचे असेल तर रामदेव बाबासारखे बना. ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाहीये. परंतु सर्वांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री, डिग्निटी आय अॅम अ डॉक्टर", असं रामदेवबाबा व्हीडिओत म्हणताना दिसत आहेत. अॅलोपथीवरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकणाऱ्या बाबा रामदेव यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या वक्तव्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी रामदेव बाबांवर कारवाई करावी अशी मागणी आयएमएने केली आहे.
रामदेवबाबांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता आणि ते विधान मागे घेतलं होतं.
"संपूर्ण देशातील डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावना दुखावणारं आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी जाहीरपणे आपलं विधान मागे घ्यायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
2. पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा- झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची मागणी
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी करोना साथीच्या नियोजनासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या अपुऱ्या तयारीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. 'द संडे एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोरेन यांनी रोकठोकपणे आपली मतं मांडली आहे. याच मुलाखतीमध्ये सोरेन यांनी पीएम केअर्स फंडासंदर्भातील हिशोब केंद्राने देशातील नागरिकांना द्यायला हवा, असं मत नोंदवलं आहे.
कोरोना एक राष्ट्रीय स्तरावरील समस्या आहे की राज्यातील समस्या आहे? केंद्राने या परिस्थितीमध्ये जबाबदारी पूर्णपणे राज्यांनाही दिलेली नाही आणि स्वत:सुद्धा ती पूर्णपणे स्वीकारलेली नाही. आम्हाला औषधं मागवता येत नाहीत कारण केंद्राने त्यासाठी परवानगी दिलेली नाही. मात्र केंद्र सरकार त्यांना वाटेल त्या पद्धतीने औषध आयात करतं.

सगळं नियंत्रण स्वत:कडे ठेऊनही केंद्र सरकारकडून आम्हाला आवश्यक असणारा गोष्टी मिळत नसल्याची तक्रार सोरेन यांनी केलीय. राज्यांना ना योग्य प्रमाणात औषधं दिली जात ना लसी दिल्या जात, असं म्हणत सोरेन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पीएम केअर्समध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले. या फंडासंदर्भातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता हवी. केंद्र सरकारने यासंदर्भातील हिशोब देशातील जनतेला द्यायला हवा, असंही सोरेन यांनी म्हटलं आहे.
3. 'सुरेश जाधव यांच्या वक्तव्याशी सीरमचा संबंध नाही'
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या वक्तव्याचा सीरमचा काहीही संबध नाही'' असे सांगत स्पष्टीकरण दिले आहे. सुरेश जाधव यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला 22 मे ला सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी पत्र पाठवून हे स्पष्टीकरण दिले आहे. "सीरमकडून कोणत्याही प्रकारचं विधान करण्यात आलेलं नाही," असा खुलासा त्यांनी या पत्रातून केला आहे.
देशात लसीकरणाच्या तुटवड्यावरुन सुरेश जाधव यांनी भाष्य केले होतं. "लसीकरण सुरू करताना व्हॅक्सिनचा उपलब्ध स्टॉक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सकडे लक्ष दिलं गेलं नाही. स्टॉक नसल्याचं माहीत असूनही लसीकरण मोहीम राबवण्यात आली," अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका केली होती.

फोटो स्रोत, ADAR POONAWALA
"सीरमकडून असे कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. जाधव यांनी जे सांगितले ते कंपनीचे मत नाही," असे स्पष्टीकरण प्रकाश कुमार सिंह यांनी सीरमचे सीईओ आदर पुनावला यांच्यावतीने सांगितले आहे.
कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आम्ही सरकारसोबत आहोत. असे सांगत अदार पुनवाला हे सीरमचे एकमेव अधिकृत प्रवक्ते आहेत असे या पत्रात स्पष्ट केलं आहे.
4. वाझे, काझी यांच्यापाठोपाठ विनायक शिंदेही पोलीस दलातून बडतर्फ
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आणि लखन भैया बनावट चकमक प्रकरणात शिक्षा भोगत असलेला विनायक शिंदेला मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे ही पोलीस दलातून बडतर्फ झाला आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.
विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात कार्यरत होता. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना अटक केली होती. विनायक शिंदे याने सचिन वाझे सोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसचा संशय अधिक बळावला होता.

फोटो स्रोत, ANI
याआधी नोव्हेंबर 2006 मध्ये झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात देखील प्रदीप सूर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला होता. यानंतर विनायक शिंदेला सेवेतून निलंबित करण्यात आले. सचिन वाझे, सूर्यवंशी आणि विनायक शिंदे या तिघांनी एकत्र काम केले आहे. विनायक शिंदे मे 2020 पासून पॅरोलवर बाहेर होता.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याच्या कटातही विनायक शिंदेचा सहभाग होता की याबाबत तपास होत आहे.
5. अग्गंबाई सूनबाई मालिकेतील दृश्यासाठी अद्वैत दादरकरची माफी
अग्गबाई सूनबाई मालिकेतील दृश्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. मालिकेत सोहमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अद्वैत दादरकरनं शिलाई मशीनला लाथ मारली होती. हे दृश्य पाहून प्रेक्षक संतापले होते. मात्र अखेर वाढत्या टीकेमुळं अद्वैतनं सर्वांची माफी मागितली आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेमध्ये शुभ्रा ही स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याचा एक भाग म्हणून ती मशीनवर बसून कपडे शिवताना दाखवली आहे. त्याचवेळी तिचा नवरा सोहम तिथे येतो आणि तिला वाट्टेल तसे बोलत तिचा अपमान करतो. तिच्या आत्मसन्मानाला दुखवण्यासाठी सोहम तिच्या शिलाई मशीनची मोडतोड करतो आणि त्याला लाथ मारतो.
हे दृश्य पाहून प्रेक्षक संतापले अन् त्यांनी झी वाहिनीला पत्र आणि इमेल पाठवून आपली नाराजी व्यक्त केली. देशभरातील अनेक लोकांसाठी शिलाई मशीन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. ते या मशीनची अगदी देवाप्रमाणे पूजा करतात अन् मालिकेत मात्र या अन्नदेवतेचा अपमान केला जातोय. परिणामी या मालिकेवर बंदी घाला अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर अद्वैतनं या प्रकरणी सर्व प्रेक्षकांची माफी मागितली.
झी वाहिनीनं देखील या दृश्याची गांभीर्यानं नोंद घेतली. त्यांनी वाढता विरोध पाहून लगेचच ती व्हिडीओ क्लिप डिलिट केली. शिवाय प्रसारित झालेल्या भागातूनही ते दृश्य एडिट करण्यात आलं. शिवाय यापुढे असे दृश्य पुन्हा दाखवली जाणार नाही असं आश्वासन अद्वैतने संपूर्ण मालिकेतर्फे प्रेक्षकांना दिलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








