You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींची काँग्रेसने 'टूलकिट' वापरून बदनामी केल्याचे भाजपचे आरोप खरे की खोटे?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
कोव्हिड संकट हाताळणीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये गेला बराच काळ आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होतायत. पण काँग्रेस पंतप्रधान मोदींना बदनाम करण्यासाठी अगदी पद्धतशीरपणे एका 'टूलकिट'चा वापर करतेय असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय. #CongressToolkitExposed हा हॅशटॅग ट्रेंड झाला. पण भाजप खोटं बोलतोय असं म्हणत काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली. तर दिल्ली पोलिसांनी सोमवारी (24 मे 20201) ट्विटरच्या कार्यालयांलवर छापे मारले आहेत.
काय आहे हे टूलकिट प्रकरण?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात रुग्ण आणि मृत्यूही वाढत गेले. देशात हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, औषधं, लशी अशा अनेक गोष्टींचा तुटवडा भासायला लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपापल्या सूचना, चिंता व्यक्त केल्या. या सगळ्या पत्रांना भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांनी उत्तरं दिली.
अशातच भाजप अध्यक्ष जे पी नड्डांपासून ते अनेक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे विविध राज्यांतले प्रवक्ते अशा अनेकांनी #CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून काँग्रेसवर आरोप करायला सुरुवात केली.
काँग्रेसचं कौतुक आणि मोदींची बदनामी अशी काँग्रेसची रणनीती असलेलं 'टूलकिट' एक्सपोज झाल्याचा दावा हे भाजप नेते करत होते. टूलकिट हा शब्द सोशल मीडियाच्या बाबतीत प्रकर्षाने वापरतात. त्याची सोपी व्याख्या म्हणजे एखाद्या आंदोलनाच्या/मोहिमेच्या संदर्भातली सोशल मीडियावरील रणनिती आणि प्रत्यक्षपणे करण्याच्या गोष्टींची माहिती त्यात दिलेली असते.
मोदींची बदनामी करण्याची काँग्रेसी रणनीती - भाजपचा आरोप
हे टूलकिट काँग्रेसच्या अधिकृत लेटरहेडवर होतं आणि काँग्रेस पक्षाच्या संशोधन विभागाने ते तयार केलं होतं असा दावा भाजपने केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यात आघाडीवर होते.
भारतात सापडणाऱ्या कोरोनाच्या स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणा असं काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचं, तसंच भारताची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा पात्रा यांनी केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस भारतविरोधी भूमिका का घेतंय असा प्रश्न उपस्थित केला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी हे टूलकिट हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं.
भाजप खोटारडा पक्ष - काँग्रेसचा पलटवार
काँग्रेसने हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. काँग्रेसच्या संशोधन विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांनी भाजप काँग्रेसच्या नावाने खोटे टूलकिट पसरवत असल्याचा आरोप केला.
भाजपचा दावा आहे की सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवरून मोदींवर टीका करण्याच्या सूचना देणारी कागदपत्रंही या टूलकिटचा भाग होती आणि त्याच्या लेखिका सौम्या वर्मा या राजीव गौडा यांच्या सहकारी आहेत. राजीव गौडांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं की सेंट्रल व्हिस्टाबद्दलची रिसर्च नोट त्यांच्या विभागाने तयार केली होती.
पण त्यात फक्त सेंट्रल व्हिस्टा बद्लदची तथ्यं देण्यात आली होती. सोशल मीडिया स्ट्रॅटेजीबद्दल त्यांची टीम काम करत नाही. तसंच काँग्रेसच्या खऱ्या संशोधनाच्या लेखिकेचं नाव भाजप आपल्या बनावट टूलकिटला जोडतंय.
काँग्रेसने दिल्ली पोलिसांकडे तक्रार देत FIR नोंदवण्याची मागणी केलीय. तसंच ट्विटरने पात्रांच्या सुरुवातीच्या ट्वीटवर मॅन्युप्युलेटेड मीडिया हे लेबल लावणं यातून भाजपचा खोटेपणा उघडा पडलाय असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.
काँग्रेस इतक्यावरच थांबलेलं नाही, त्यांनी टूलकिटबद्दलचे ट्वीट करणाऱ्या भाजप नेत्यांची अकाउंट्स कायमची निलंबित करावी अशीही मागणी ट्विटरकडे केलीय.
टूलकिटचे 'फॅक्ट चेक'
अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटने भाजपच्या या दाव्यांचा फॅक्ट चेक केला. भाजपने दावा केला होता की हे टूलकिट काँग्रेसच्या अधिकृत लेटरहेडवर होतं.
अल्ट न्यूजने आपल्या फॅक्ट चेकमध्ये म्हटलंय की काँग्रेस पक्षाचं लेटरहेड आणि टूलकिट ज्या कथित लेटरहेडवर होतं या दोन्हीचे फाँट वेगवेगळे आहेत, त्यांच्यातली तारीख लिहीण्याची स्टाईल वेगळी आहे, तसंच या टूलकिटमध्ये स्ट्रेटेजी म्हणून दिलेल्या घटना यापूर्वीच घडून गेलेल्या आहेत.
टूलकिट हे भविष्यात करण्याच्या गोष्टींबद्दल असतं. अल्ट न्यूजने आपल्या फॅक्ट चेकमध्ये भाजपने शेअर केलेलं टूलकिट फेक असल्याचं म्हटलंय.
तर OpIndia या मोदी सरकारची वारंवार पाठराखण करणाऱ्या वेबसाईटने अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकचा फॅक्ट चेक केलाय. अल्ट न्यूज ही काँग्रेस समर्थक वेबसाईट असून काँग्रेसला क्लीन चिट देण्यासाठी त्यांनी कोलांटउड्या मारल्याचं म्हटलंय.
अल्ट न्यूजने केलेले दावे अत्यंत कमकुवत आहेत तसंच त्यांनी काँग्रेसने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर हे दावे केलेत यातून त्यांच्यातले लागेबांधे दिसतात असा ऑपइंडियाच्या दाव्यांचा गोषवारा आहे. अल्ट न्यूजने आपल्या लेखात प्रकाशनानंतर केलेल्या बदलांबद्दलही ऑपइंडियाने आक्षेप घेतलेत.
काँग्रेस पक्षाने अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकचा हवाला देत भाजप हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष असल्याचं म्हटलंय.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "देशपातळीवर मोदी सरकार कोरोना हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय, मोदीजींना आणि मोदी सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. अशावेळी काँग्रेसच्या माध्यमातून हे टूलकिट आलं आणि त्यातून काँग्रेसची अपप्रचार करण्याची मानसिकता होती असा कांगावा भाजपने केलाय आणि तो खोटा ठरलेला आहे. संबित पात्रा, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."
भाजपचे अतुल भातखळकर मात्र काँग्रेसला चौकशीचं आव्हान देतात. त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "नरेंद्र मोदींच्या बदनामीचं टूलकिट खोटं आहे या काँग्रेसच्या म्हणण्याइतका खोटा आरोप कुठला नाही. जर हे टूलकिट खोटं असेल आणि काँग्रेसच्या विरोधकांनीच बनवलं असेल तर काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये त्यांनी याची चौकशी करावी. पण खोटारडेपणा आणि देशविरोधी कामं करणं हा काँग्रेसचा आत्मा आहे."
देशात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आत्ता कुठे कमी होत असताना आणि तिसऱ्या लाटेचे इशारे गंभीर होत असताना देशातले दोन प्रमुख पक्ष एकमेकांवर या संकटाचा सामना करण्याऐवजी घाणेरडं राजकारण केल्याचा आरोप करताना दिसत आहेत.
केंद्र सरकारची कोव्हिड नीती, राज्य सरकारांची जबाबदारी, सेंट्रल व्हिस्टाची प्रकल्प कोव्हिड काळात सुरू ठेवण्याची आवश्यकता अशा अनेक वादांच्या नाट्यातला हा पुढचा आणि अधिक चिंताजनक अंक आहे का असा आणखीन एक प्रश्न यातून उपस्थित होतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)