गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांत चकमक, 13 नक्षलवादी ठार

नक्षलवादी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक घडल्याची माहिती समोर येत आहे.

येथील पयडी-कोटमी जंगलात पोलिसांच्या C-60 पथकाने ही कारवाई केली. यामध्ये 13 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. तसंच मृत नक्षलवाद्यांचा आकडा 16 पर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे गडचिरोलीकडे रवाना झाले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच या कामगिरीबाबत पोलिसांचं कौतुक केलं.

गडचिरोली जिल्ह्यातील पैदीच्या जंगलांत पोलिसांनी गुरुवारी (20 मे) रात्री उशिरा शोधमोहीम सुरू केली होती. शुक्रवारी (21 मे) दुपारपर्यंत ही चकमक सुरू होती.

तत्पूर्वी, पैदी गावात काही नक्षलवादी हे गावकऱ्यांसोबत बैठक घेऊन काहीतरी करणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणेमार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावलं उचलली.

पोलिसांच्या C-60 पथकाने रात्रीच याठिकाणी दाखल होऊन संपूर्ण गावाला घेराव घातला. कमांडो आल्याचं कळताच नक्षलवादी जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान पोलीस आणि नक्षलवादी आमनेसामने येऊन चकमक सुरू झाली. त्यामध्ये आतापर्यंत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली.

पोलिसांनी काय म्हटलं?

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोलीत दाखल होऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन सर्वांना याबाबत अधिक माहिती त्यांनी दिली.

कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परिसरात नक्षलवादी दरवर्षी प्रमाणे तेंदुपत्ता हंगामाच्या पार्श्वभुमीवर खंडणी वसुल करण्याच्या उद्देशाने मोठया प्रमाणात एकत्र येतात.

गडचिरोली पोलीस

फोटो स्रोत, Gadchiroli DIO

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षकमनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा पैडी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील C-60 च्या जवानांनी ही मोहीम आखली.

त्यानुसार, शुक्रवारी गस्त घालत असताना सकाळी 6 ते साडेसातच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या 60 ते 70 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला.

पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला.

C-60 जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी दीड तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात C-60 जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळी 6 पुरुष तर 7 महिला असे एकूण 13 नक्षलवादी आढळून आले. या सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

यावेळी त्यांच्यासोबत AK 47, SLR, कारबाईन, 303, 12 बोअर रायफल तसंच स्फोटकं आढळून आले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)