चीन : माओंना भारताला 'धडा' शिकवायचा होता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
माओंचा दिवस रात्री सुरू होत असे. अख्खी रात्र ते काम करत असत. सूर्य उगवला की ते झोपायला जात. त्यांचा बराचसा वेळ पलंगावरच जात असे. ते जेवतही पलंगावरच असत. ते कामा निमित्तानं बाहेर पडत तेव्हा पलंग सोबत नेला जात असे. ट्रेनमध्येही त्यांच्यासाठी हाच पलंग मांडला जात असे.
1957 मध्ये ते मॉस्कोला गेले तेव्हा जहाजानं हा पलंग पोहोचवण्यात आला, कारण या पलंगाव्यतिरिक्त अन्य कशावर माओ झोपत नसत.
घरात असताना ते साध्या गाऊनवर असत आणि अनवाणी पायांनी वावरत.
चीनमधल्या भारतीय दूतावासात कार्यरत तत्कालिन अधिकारी नटवर सिंह यांनी माओंच्या आठवणींना उजाळा दिला होता.
लोकसभा अध्यक्ष अय्यंगार यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संसदपटूंचं शिष्टमंडळ चीनला रवाना झालं होतं. माओ रात्री 12 वाजता भेटतील असं या शिष्टमंडळाला रात्री साडेदहा वाजता सांगण्यात आलं.
माओ ठरलेल्या वेळी भारतीय शिष्टमंडळाला भेटले. प्रत्येक नेत्याशी त्यांनी हस्तांदोलन केलं. मात्र त्यांचा मूड नव्हता. अय्यंगार यांनी विचारलेल्या प्रश्नांचं माओ उत्तर देत होते.
मात्र थोड्या वेळानंतर माओंची कळी खुलली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची अवस्था एका ढोलासारखी होती. अमेरिका आणि रशिया दोन्ही बाजूंनी ढोल बडवत होते, असं अय्यंगार म्हणताच माओ खळखळून हसले.
संपूर्ण बैठकीदरम्यान माओ सिगारेट पीत होते. भारतीय राजदूत आर. के. नेहरू यांनी सिगारेट शिलगावली. त्यावेळी माओ यांनी स्वत: त्यांना 'लाइट' दिला. माओंच्या प्रतिसादानं भारतीय शिष्टमंडळातले नेते चक्रावून गेले.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्याच पुढच्या वर्षी भारताचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा माओंनी स्वत:च्या निवासस्थानी त्यांची व्यवस्था करून आदरातिथ्य केलं. दोघांची भेट झाली तेव्हा राधाकृष्णन यांनी माओंच्या गालाचे गालगुच्चे घेतले.
राधाकृष्णन यांच्या कृतीनं आश्चर्यचकित होऊन माओ काही बोलणार याआधीच राधाकृष्णन यांनी आपली भूमिका मांडली.
"अध्यक्ष महोदय, चक्रावून जाऊ नका. स्टॅलिन आणि पोप यांना भेटलो तेव्हाही मी असंच अभिवादन केलं होतं," असं राधाकृष्णन यांनी सांगितलं.
जेवताना माओंनी आपल्या ताटातला एक पदार्थ उचलून चॉपस्टिकनं राधाकृष्णन यांना वाढला. राधाकृष्णन शाकाहारी असल्याचं माओ यांना ठाऊक नव्हतं.
परंतु राधाकृष्णन यांनी माओ यांना त्यांच्या हातून आगळीक घडल्याचं कळूही दिलं नाही. त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला दुखापत झाली होती.

फोटो स्रोत, Keystone
चीनला रवाना होण्यापूर्वी कंबोडिया दौऱ्यादरम्यान त्यांच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली.
गाडीत बसताना त्यांचा हात दरवाज्यात अडकला आणि त्यांच्या बोटाला लागलं. हा संदर्भ माओ यांना ठाऊक नव्हता. हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण केलं आणि राधाकृष्णन यांच्या हातावर नव्यानं उपचार करण्यास सांगितले.
कोणत्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष चीनमध्ये दाखल झाल्यानंतर माओ यांची भेट घेणं साहजिक होतं. पण ही भेट पूर्वनियोजित नसे. माओ यांची मर्जी होत असे तेव्हाच ते पाहुण्यांची भेट घेत. एखाद्यावर उपकार केल्याप्रमाणे ते विदेशी राष्ट्राध्यक्षांशी भेट घेत असत.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांनी 'इयर्स ऑफ रिनाऊंसल' या आत्मचरित्रात माओंविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. चीनचे पंतप्रधान चू एन लाई यांच्याशी बोलत होतो. अचानक ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष माओ तुमची प्रतीक्षा करत आहेत. मी माओ यांना भेटण्यासाठी तयार आहे की नाही याची त्यांना फिकीर नव्हती.
माओंशी भेट झाली तेव्हा अमेरिकेच्या सुरक्षारक्षकांना भेटीच्या ठिकाणी मज्जाव करण्यात आला. माओ यांची भेट घेतल्यावर प्रसारमाध्यमांना फक्त अशी भेट झाली एवढंच सांगण्यात येत असे.

फोटो स्रोत, AFP
किसिंजर पुढे म्हणतात, "आम्हाला थेट माओ यांच्या अभ्यासकक्षात नेण्यात आलं. या खोलीत तीन भिंती फक्त पुस्तकांनी व्यापल्या होत्या. उरलेली पुस्तकं टेबल आणि जमिनीवर विखुरलेली होती. समोर व्ही आकाराचं टेबल होतं. ज्यावर त्यांचा जास्मीन टी अर्थात चहाचा पेला ठेवला होता. त्याच्या बाजूलाच पिकदाणी होती."
"मी याआधी माओंना भेटलो तेव्हा खोलीत लाकडी पलंग पडलेला असे. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश आणि त्याच्या ताकदवान प्रशासकाच्या घरात वैभवाची किंवा वर्चस्ववादाची एकही निशाणी आढळली नाही."
"खोलीच्या मधोमध असलेल्या खुर्चीत बसलेले माओ माझं स्वागत करत असत. त्यांना साहाय्य करण्यासाठी दोन महिला सेविका तत्परतेनं हजर असत. त्यानंतर माझ्याकडे पाहून हसरा कटाक्ष टाकत असत. ते हास्य सूचित असे. मला फसवण्याची चूक करू नका या आशयाचं ते हास्य असे."

फोटो स्रोत, Getty Images
1971 मध्ये राष्ट्रपती निक्सन यांनी माओंशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. चर्चेचा विषय काढताच माओ यांनी विषयच झिडकारला. चर्चा करायची तर पंतप्रधानांना गाठा. माझ्याशी तुम्ही तात्विक मुद्यांवर बोलू शकता.
माओंचे डॉक्टर म्हणून काम केलेल्या जी शी ली यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर 'द प्रायव्हेट लाइफ ऑफ चेयरमन माओ' या पुस्तकात सविस्तरपणे लिहिलं आहे.
या पुस्तकात ते म्हणतात, "माओ यांनी आयुष्यात कधीही दात घासले नाहीत. रोज सकाळी चहा पिऊनच त्यांच्या दातांचं मंजन होत असे. एकवेळ अशी आली की त्यांचे दात हिरव्या रंगाचे झाले होते. माओंना आंघोळ करणं आवडत नसे. त्यांना पोहण्याचा शौक होता. आणि ताजंतवानं वाटण्यासाठी गरम टॉवेलनं स्पंज बाथ ते घेत असत."

फोटो स्रोत, Getty Images
ली पुढे लिहितात, "निक्सन यांच्या भेटीवेळी माओंचं वजन प्रचंड वाढ़लं होतं. म्हणून त्यांच्यासाठी नवीन कपडे शिवण्यात आले. त्यांची नर्स फ्यू मिंग यांनी त्यांची दाढी केली आणि केसही कापले. निक्सन यांच्यासह त्यांची भेट 15 मिनिटांसाठी ठरली होती. मात्र ही भेट तासाभराहून अधिक वेळ चालली. भेटीनंतर निक्सन खोलीच्या बाहेर रवाना झाले आणि तात्काळ माओंनी भेटीचा पोशाख उतरवला आणि नेहमीचे कपडे घातले."
माओ बहुतांशवेळी अनवाणी वावरत असत. पादत्राणं घालायची वेळ आली तर कपड्याचे जोडे घालत असत.
औपचारिक भेटींच्या वेळी त्यांना चामड्याची पादत्राणं घालणं अनिवार्य असे. त्यावेळी ही पादत्राणं सैल व्हावीत आणि चालताना त्रास होऊ नये यासाठी ती आधी सुरक्षारक्षकांना पायात घालायला ते सांगत.
माओंच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणाऱ्या जंग चैंग यांनी माओंची गुणवैशिष्ट्यं कथन केली आहेत.
माओंची स्मरणशक्ती विलक्षण होती. लिखाण आणि वाचण्याची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांच्या पलंगावर एक फूटापर्यंत चीनी भाषेतल्या पुस्तकांची चळत रचलेली असे.
त्यांच्या भाषणात आणि लिखाणात या पुस्तकांतल्या वचनांचा उल्लेख असे. माओ बरेचदा चुरगाळलेले कपडेच घालत असत. त्यांचे मोजेही फाटके असत.
1962च्या भारत-चीन युद्धात माओंची भूमिका निर्णायक होती. त्यांना भारताला धडा शिकवायचा होता.
चीनमध्ये भारताचं काम पाहिलेल्या लखन मेहरोत्रा यांनी त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. भारताविरुद्धच्या युद्धासाठी फॉरवर्ड नीती कारण असल्याचं चीननं सांगितलं. पण हा केवळ बहाणा होता.
माओ यांनी दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 1960 मध्येच भारताविरुद्धची रणनीती आखायला सुरुवात केली होती. एखाद्या देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यास अमेरिका तैवानमध्ये मदत करेल का, अशी विचारणा माओंनी केली होती.
अमेरिकेचं प्रत्युत्तर अनोखं होतं. चीननं देशांतर्गत किंवा देशाबाहेर काहीही केलं त्याच्याशी आमचं देणंघेणं नाही. आम्ही केवळ तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी घेतो.

लखन पुढे सांगतात, "पुढच्याच वर्षी त्यांनी ही गोष्ट निकीता ख्रुश्चेव्ह यांना विचारली. त्यावेळी तिबेटला तेलपुरवठ्याची जबाबदारी रशियाकडे होती. भारताशी युद्ध पुकारलं तर रशिया म्हणजेच तेव्हाचा सोव्हियत संघ तिबेटला खनिज तेलाचा पुरवठा बंद करेल अशी चीनला भीती होती."
"रशिया असं करणार नाही अशी हमी माओंनी ख्रुश्चेव्ह यांच्याकडून घेतली. भारताशी आमचे तीव्र मतभेद आहेत असंही सांगितलं. ख्रुश्चेव्ह यांनी माओंना वचन दिलं. मात्र बदल्यात 'जगभरात तुम्ही आम्हाला विरोध करत आहात. मात्र आम्ही क्युबावर क्षेपणास्त्र डागू तेव्हा चीन विरोध करणार नाही' अशी हमी घेतली."
चीन भारतावर आक्रमण करेल याची ख्रुश्चेव्ह यांना खात्री होती. युद्धकाळात मिग विमानं पुरवण्यासंदर्भात करारही झाला होता. प्रत्यक्षात युद्ध सुरू झालं तेव्हा रशियानं मिग विमान पुरवायला उशीार केला. मात्र त्यांनी चीनला पेट्रोल पुरवठा थांबवला नाही.
1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर चीनमध्ये राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्रालयातर्फे राजकीय स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माओ उपस्थित होता. यावेळी भाषणात भारतानं पाकिस्तानवर आक्रमण केल्याचं सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
या कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगत मेहता यांच्यासमोरच्या टेबलावर जाणीवपूर्वक भाषणाची इंग्रजी प्रत ठेवण्यात आली नाही. जेणेकरून त्यांना भाषणाचा आशय समजू नये.
त्यांनी आपल्या शेजारी बसलेल्या स्वित्झर्लंडच्या राजदूता समोरील फ्रेंच भाषेतील भाषण वाचलं आणि तात्काळ कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ही कृती आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान असल्याचं चीननं स्पष्ट केलं.
कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या जगत मेहतांच्या गाडीला त्यांच्या निवासस्थानी जाण्यापासून मज्जाव करण्यात आलं. यामुळे जगत आणि त्यांच्या पत्नी रमा यांना नॅशनल पीपल्स हॉलच्या बाहेर कडाक्याच्या थंडीत ताटकळत राहावं लागलं.
1970 मध्ये मे दिवसाच्या निमित्तानं बीजिंगमधल्या सर्व देशांच्या दूतावासांच्या प्रमुखांना तिआनानमेन स्क्वेअरमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष माओ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राजदूतांच्या रांगेत सगळ्यांत शेवटी भारताचे ब्रजेश मिश्र उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन माओ म्हणाले, राष्ट्रपती गिरी आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माझा नमस्कार सांगा. हे बोलून माओ थोडा वेळ थांबले. आणखी किती वेळ आपण असे एकमेकांशी लढणार आहोत. मग त्यांनी सूचक हास्य केलं. एक अख्खं मिनिट त्यांनी मिश्र यांच्याशी हस्तांदोलन केलं. आधी घडलेल्या गोष्टी बाजूला सारण्याकरता तयार असल्याचे संकेत चीनतर्फे माओ यांनी दिले.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या मृत्यूपूर्वी तीन महिने आधीपर्यंत माओ विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत असत. थायलंडचे पंतप्रधान माओंना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते घोरत असल्याचं त्यांनी पाहिलं.
सिंगापूरचे पंतप्रधान ली क्वान यू जेव्हा माओंना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांचं डोकं खुर्चीच्या एका बाजूनं कललं होतं आणि त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्याशी झालेल्या भेटीचे फोटो प्रसिद्ध झाले आणि माओ यांनी विदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटणं बंद केलं. यानंतर तीनच महिन्यांनी त्यांचं निधन झालं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








