5 चित्रांमधून पाहा कसा बदलला शी जिनपिंग यांच्या काळात चीन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आंद्रेस इल्मर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात चीन अधिक श्रीमंत आणि शक्तिशाली झाला आहे. मात्र चीनमधील सर्वसामान्य माणसासाठी या विकासाचा अर्थ काय? देशाचा विकास चीनच्या सामान्य नागरिकांसाठी किती परिणामकारक आहे याचा घेतलेला वेध.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विचार चीनच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. माओत्से तुंग आणि डेंग जियाओपिंग या चीनच्या सार्वकालीन महान नेत्यांच्या मांदियाळीत जिनपिंग यांचा समावेश झाला आहे.
विविध शासकीय यंत्रणांनी तयार केलेले अहवाल, त्यांची आकडेवारी, सर्वेक्षणं यांचा आढावा घेतल्यानंतर चीनमधील सामाजिक संक्रमणाचा घेतलेला हा वेध.
2015 मध्ये चीननं एकल बालक योजना मागे घेतली. लोकसंख्या नियंत्रणात राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं हा निर्णय घेतला होता. या धोरणामुळे स्त्री-पुरुष गुणोत्तर कमालीचं बिघडलं होतं.
आता मात्र एकापेक्षा अधिक मुलं होऊ देण्याला सरकारची मान्यता मिळाली आहे, जेणेकरून कुटुंबाचा परीघ वाढणार आहे.

जागतिक स्तरावर विवाहांचं प्रमाण कमी होत आहे. आणि त्याचवेळी घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे. जगातील विकसित देशांमध्ये असलेला हा कल चीनमध्येही कायम आहे.
चीनमध्ये विवाह करण्याचं प्रमाण 16 टक्क्यांनी घटलं आहे तर घटस्फोट होण्याचं प्रमाण 16 टक्क्यांनी वाढलं आहे.
"अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये घटस्फोटांचं प्रमाण कमी आहे. आशिया खंडातील अन्य देशांच्या तुलनेत चीनमधले लोक उशिरा का होईना लग्न करतात. चीनमध्ये विभक्त होण्याचं प्रमाण वाढतं आहे यात तथ्य नाहीत," असं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी शांघायमध्ये मानसशास्त्र विभागातील प्राध्यापक झुआन ली यांनी सांगितलं.
कुटुंबामागे एक मुल ही योजना चीननं आता मागे घेतली असली तरी त्याचे परिणाम प्रदीर्घ काळासाठी समाजात दिसणार आहेत. समाजातलं स्त्री-पुरुष प्रमाण विषम झाल्यानं अविवाहित पुरुषांची संख्या वाढू लागली आहे.
15 ते 24 वयोगटातील, 100 स्त्रियांमागे अविवाहित पुरुषांची संख्या 114 असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनासारखी वधू शोधून देण्यात अयशस्वी झाल्यानं शांघाय शहरातील चाळिशीतील तरुणानं एका विवाहसंस्थेवर खटला दाखल केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
हवी तशी बायको मिळावी यासाठी या माणसानेृं त्या विवाहसंस्थेला तब्बल 7 दशलक्ष युआन एवढी प्रचंड रक्कम दिली होती.
"एका कुटुंबामागे एक मूल या योजनेमुळे लोकसंख्येची वयानुरूप गटवारी बदलली आहे. जन्मदर कमी झाला आहे आणि वयस्कर मंडळींची संख्या वाढणं अशा परस्परविरुद्ध रचनेमुळे क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे."
"कौशल्यपूर्ण कामांसाठी उपलब्ध लोकसंख्या मयार्दित झाल्यानं त्याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर झाला आहे", असं ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे ल्युईस कुईजस यांनी सांगितलं.
'आता प्रति कुटुंबामागे दोन मुलं होऊ देण्याची अनुमती सरकारनं दिली आहे. मात्र सुधारित योजनेचा परिणाम अर्थात कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी दोन दशकांचा वेळ लागेल.
"जीवनशैली अधिक सुखकर झाल्यानं लिंग गुणोत्तर बदलेल," असा विश्वास कुईजस यांनी व्यक्त केला.
"सरकारनं कुटुंबामागे एक मूल हे धोरण बदललं आहे. महिला विविधांगी क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. सामाजिक स्थैर्य वाढीस लागलं आहे. या सगळ्यामुळे लिंग गुणोत्तर बदलण्यास हातभार लागेल"
असं नॅशनल युनिर्व्हसिटीमधील 'सेंटर फॉर फॅमिली अँड पॉप्युलेशन रिसर्च'चे म्यु झेंग यांनी सांगितलं. मात्र सध्याच्या परिस्थितीत मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीणच आहे.
अनेकांकडे स्वतःच्या मालकीचे घर
चीनमधली घरमालकी आणि पर्यायानं घरबांधणी क्षेत्राचं चित्र वेगळं आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत चीनमधल्या तरुण मंडळींकडे स्वत:चं घर आहे.
जागतिक पातळीचा अभ्यास केला तर अमेरिकाच्या (31 टक्के) तुलनेत चीनमधील 70 टक्के तरुणांकडे स्वतःच्या मालकीचं घर आहे.

शहरी क्षेत्रात कामाचा परीघ असणाऱ्या एचएसबीसी या कंपनीनं हा डेटा गोळा केला आहे. बहुतांशी पालक मंडळी आपल्या पाल्याचं स्वत:चं घर हवं यासाठी प्रयत्नशील आहेत. जेणेकरून त्याला लग्नासाठी चांगली मुलगी मिळू शकेल.
नवरा घर मिळवून देईल हे गृहीतक कायम आहे. मुलाचं घर नाही किंवा विकत घेऊ शकत नाही या कारणांवरून अनेक प्रेमप्रकरणं लग्नात रुपांतिरत होऊ शकलेली नाहीत.
जेवढी माणसं तेवढे स्मार्टफोन
चीनमध्ये शहरी तसंच ग्रामीण भागात सरासरी दरडोई उत्पनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आश्चर्यकारकरीत्या खाण्यापिण्यावरचा खर्च कमी होत चालला आहे. मात्र त्याचवेळी आरोग्य, कपडे, वाहतुकीसाठी खर्च करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

मोबाइल वापराचं, खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. स्मार्टफोन्स हा चीनमधील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.
चीनमध्ये वुई चॅट अॅप प्रचंड प्रमाणावर वापरलं जातं. या अॅपची सर्वसमावेशकता हीच त्याची ताकद आहे. दैनंदिन बिलं, आर्थिक व्यवहार यांच्याबरोबरीने कम्युनिकेशनसाठी या अॅपचा वापर होतो.
परदेशात शिक्षण घेण्याकडे कल
दरडोई उत्पन्न वाढतं असल्याने मुलांच्या शिक्षणावर सढळहस्ते खर्च होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्या मुलामुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर ही मुलं मायदेशात परत येऊन काम करत आहेत.

2016 मध्ये 433,000 एवढी मुलं शिक्षण पूर्ण करून चीनमध्ये परतली असं आयएचएस मार्कीटचे मुख्य अर्थतज्ञ राजीव बिश्वास यांनी सांगितलं.
विदेशी विद्यापीठांच्या पदव्यांसह परतलेल्या या मुलांमुळे आगामी काळात चीनचा दृष्टिकोन बदललेला असेल. जगाची नस ओळखण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेल.
नवीन संस्कृती समजून घेण्याची त्यांची तयारी असेल. जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अशी बिरूदावली मिरवण्यासाठी नव्या विचारांची युवा पिढी महत्वाची आहे.
युरोपीय तसंच अमेरिकेच्या विद्यापीठातील डिग्री असेल तर नोकरी मिळण्याच्या संधी वाढतात. त्याचवेळी चांगला साथीदार मिळण्याची शक्यताही वाढते.
वृत्तांकन : आंद्रेस इल्मर
ग्राफिक्स : वेस्ले स्टीफन्सन, मार्क ब्रायसन आणि सुमी सेंथीनाथन
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








