अरुणाचल प्रदेशच्या या गावात होते भारत-चीन सीमा धुसर
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
भारत आणि चीन ही जगातली दोन शक्तिशाली राष्ट्र आहेत. आणि मुख्य म्हणजे एकमेकांचे सख्खे शेजारीसुद्धा आहेत.
दोन्ही देशांच्या सीमारेषेबाबत कायम वाद होत असतात, तणाव असतो आणि डोकलाम हे त्याचं ताजं उदाहरण आहे.
पण सीमेवर अशी एक जागा आहे जी ओलांडून भारतीय चीनमध्ये जातात आणि कधीकधी चीनचे सैनिकसुद्धा भारतात येताना दिसतात.
हे सगळं काय आहे हे बघायला मी अरुणाचल प्रदेशात गेलो.

आसामची राजधानी गुवाहाटीहून रात्रभर रेल्वेने प्रवास करत दिब्रुगढमार्गे तिनसुकियाला पोहोचलो.
अरुणाचल प्रदेशपासून ही सीमा दोन तासांवरच आहे आणि तिथे जाताच खडे पहाड दिसायला सुरुवात होते. अरुणाचल प्रदेशात परवानगीशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही.

उंचीवर असलेल्या हायोलांग शहरात पोहोचण्यासाठी दहा तास लागले.
अनेकदा विनंती केल्यावर आम्हाला तिथल्या सर्किट हाऊसमध्ये राहायला जागा मिळाली, कारण इथे कोणतंही हॉटेल किंवा धर्मशाळा नाही.
दरड कोसळण्याचा धोका
तिथल्या केअरटेकरनी विचारलंच, "पहाड चढून चीनच्या सीमेवर जायचा तर विचार नाही ना तुमचा? सगळीकडे दरडी कोसळत आहेत."

मनात अनेक शंका घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी कच्च्या रस्त्यावरून चढाई सुरू केली होती.
ते उंच डोंगर भीतीदायक वाटत होते आणि वर जात होतो, तशी दरी आणखी खोल होत होती.
अनेक तासांचा प्रवास केल्यावर एखादा माणूस दिसत होता. आमच्याकडे आश्चर्यानं बघत होते.
चीनला जाणं सोपं
चीनच्या सीमेला लागून असलेल्या या शेवटच्या भारतीय गावात पोहोचणं हीच एक मोठी गोष्ट आहे.
छागलागाम इथे अंदाजे 50 कुटुंब राहतात. पैकी अलिलम टेगाचं एक कुटुंब आहे.

वेलची किंवा वेलदोड्याची शेती हे इथलं एकमेव उत्पन्नाचं साधन आहे. पण देशाच्या इतर भागाशी संपर्क ठेवणं हेच एक मोठं आव्हान आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी सगळ्यात जवळचं गावसुद्धा पाच तासांच्या अंतरावर आहे.
निम्मे नातेवाईक सीमेपार
इथल्या कुटुंबांचे अर्धे नातेवाईक चीनमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे जाणं जास्त सोपं आहे.
अलिलम टेगा यांनी सांगितलं, "आम्ही लोक मिश्मी जातीचे आहोत आणि आमच्या कुटुंबातले निम्मे लोक सीमेपार चीनमध्ये राहतात."
जेव्हा आमच्या गावातले लोक औषधी पानं शोधायला जातात तेव्हा वस्तीतलं कुणीतरी भेटतं. एक दोन तास गप्पा होतात. तेव्हा कोण जिवंत आहे आणि कोण मेलं आहे ते कळतं."
गावात भारतीय सेनेचा एक कँप आहे. त्याच्याबाहेर काही जवान धूम्रपान करताना भेटले.
जम्मूत राहणाऱ्या एका जवानानं आम्हाला सांगितलं, "तुम्हांला इथे भेटून चांगलं वाटतंय. इथे टीव्ही-मोबाईलवर काहीही दिसत नाही. पहाडावर चढून गस्त घालावी लागते. इथलं हवामान तर तुम्ही बघताच आहात."
छागलागाम आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक लोक लष्करासाठी गाईड किंवा दुभाषी म्हणून काम करतात.

आयनडेयो सोम्बेपो हा 24 वर्षीय युवक व्यवसायाने गाईड आहे. सध्या तो रोजगाराच्या शोधात आहे.
चिनी सैनिकांशी सामना
इथले लोक सीमा ओलांडण्याचा दावा करतात तसा चिनी सैनिकांना बघितल्याचंही सांगतात.
आयनडेयो सोम्बेपो यांनी सांगितलं, "त्या दिवशी मी सीमेच्या अगदी जवळ फिरत होतो. ते लोक सीमेपासून 100 मीटर आतमध्ये मला भेटले. मला बाजूला बसवलं आणि आसपास भारतीय सैनिक आहेत का, किती आहेत वगैरे विचारलं."
"मी त्यांना सांगितलं की, इथे 300 जवान आहेत. ते थोडा वेळ थांबले आणि परत गेले."

छागलागाममध्ये राहणाऱ्या अनेक लोकांनी अनेकदा चीनची सीमा ओलांडली आहे.
मापिकम टेगा यांच्या मते, "सीमेपलीकडच्या गावात बराच विकास झाला आहे. तिथे तीन-तीन मजली इमारती आहेत आणि उत्तम रस्तेसुद्धा आहेत. त्या तुलनेत भारताच्या सीमाभागातील गावांत एक तृतीयांशसुद्धा विकास झालेला नाही."
भारत आणि चीनमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. 1962 मध्ये दोन्ही देशांत युद्धसुद्धा झालं आहे.

दोन्ही देशांत उद्भवलेला डोकलाम वाद अनेक महिन्यांच्या तणावानंतर नुकताच थंडावला आहे.
आखलेली सीमारेषा नाही
भारताच्या पाच राज्यांच्या गावातल्या सीमा चीनला लागून आहेत. पण सिक्कीमशिवाय कोणत्याही राज्यात नेमकी आखलेली सीमारेषा नाही.
भारताचे माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांना वाटतं की, हा सीमावाद सकारात्मक चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो.

मलिक सांगतात, "लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात प्रत्यक्ष ताबारेषा... ज्यावर त्यांचा विश्वास आहे आणि ज्यावर आपला विश्वास आहे ती कमीतकमी नकाशावर तरी मार्क करायला हवी. कारण नकाशावर मार्क केलं की, जीपीएसने लगेच कळू शकेल की आपण आपल्याच परिसरात आहोत की दुसऱ्या भागात."
"चीनने अजून प्रत्यक्ष ताबारेषा मार्क करू दिलेली नाही. म्हणून कधी कधी चीनचे सैनिक अनेकदा भारतात दिसले आहेत", असं मलिक म्हणाले.
या दोन्ही शक्तिशाली देश अधूनमधून राजनैतिक पातळीवर एकमेकांवर दोषारोप करत असतात. तणाव वाढतात, निवळतात. पण भारतीय सीमेडवळ राहणाऱ्या या शेकडो लोकांसाठी याचं महत्त्व नाममात्र आहे.
छागलागाममध्ये आपल्या घराच्या अंगणात बसलेले अलिलम टेगा मावळत्या सूर्याकडे बघत होते.
ते फक्त इतकंच म्हणाले, "भारतात जरुर आहोत आम्ही, पण आमची आठवण कोणाला आहे काही कल्पना नाही."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









