You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशील कुमारला अटक, सागर राणा कोण होता, त्याची हत्या का झाली?
युवा पैलवान सागर राणाच्या अकाली मृत्यूप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री ( 22 मे) ला ही कारवाई केली.
सागर राणाच्या कुटुंबीयांची बीबीसी हिंदीने मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं याचा हा विशेष रिपोर्ट.
"आम्ही सगळं काही गमावलं आहे. काहीच शिल्लक राहिलं नाही. आम्हाला त्याच्याकडून खूप आशा होत्या. इतक्या लहान वयात माझ्या भाच्याने कुटुंबीयांना आणि देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली होती. पण आता सगळं संपलं आहे", या भावना आहेत पैलवान सागर राणाचे मामा आनंद सिंह यांच्या.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियममध्ये दोन गटांदरम्यान झालेल्या संघर्षात सागर याचा मृत्यू झाला.
बीबीसीशी बोलताना आनंद सिंह यांनी सांगितलं की, "सागर हरियाणातल्या सोनीपत गावचा. कुस्तीचं प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी 14व्या वर्षी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियम रवाना झाला".
सागरचे वडील दिल्ली पोलीस सेवेत हेड काँस्टेबल म्हणून काम करतात. सागर घरातला सगळ्यात मोठा मुलगा होता आणि त्याचा छोटा भाऊ सध्या ऑस्ट्रेलियात आहे.
सागर फक्त 23 वर्षांचा होता आणि त्याने ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली होती. सागर अनेक देशांमध्ये जाऊन खेळला होता. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक पटकावणं हे त्याचं ध्येय होतं असं त्याच्या मामांनी सांगितलं.
"त्याचा स्वभाव शांत होता. तो कुठल्या भांडणात पडेल असं वाटतच नाही", असं ते म्हणाले.
याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सागरच्या घरच्यांनी केली आहे.
दिल्लीत लॉकडाऊन लागल्याने सागर स्टेडियमच्या बाहेर एक खोली घेऊन राहत होता. रुग्णालयात पाठीच्या दुखण्यावर उपचार घेत होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र या घटनेने सागरचे कुटुंबीय मोडून पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
सागर राणा या पैलवानाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला फरार घोषित केलं असून त्याचा पत्ता सांगणाऱ्याला एक लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. 4 मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांत खडाजंगी उडाली होती. त्यात हरियाणच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू झाला होता.
दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.
पण सुशीलचा तपास लागत नसल्यानं आता त्याला पकडून देणाऱ्यास इनाम जाहीर केलं आहे. तसंच आणखी एक आरोपी अजयही फरार असून. त्याच्यावर 50 हजार रुपयांचं इनाम जाहीर झालं आहे. सागर राणा हरियाणाच्या सोनीपतचा राहणारा होता. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांमध्ये झटापट झाली आणि त्यात सागर राणाचा मृत्यू झाला. पैलवान सुशील कुमार आणि त्याच्या सोबत्यांचा यात हात असल्याचं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळल्याचं FIR मध्ये म्हटलंय.
सुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. साहजिकच त्याच्यावर झालेल्या आरोपांनी कुस्तीविश्वाला हादरे बसले आहेत.
कुस्ती फेडरेशनचं काय म्हणणं?
या घटनेनं दु:खी असल्याचं कुस्ती फेडरेशनने म्हटलं आहे. कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष दर्शन लाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "कुस्तीशी संलग्न सगळ्यांना या घटनेने धक्का पोहोचला आहे. या घटनेने कुस्ती खेळ बदनाम झाला आहे. पैलवानांमध्ये वादतंटे होत असतात. पण अशा घटना घडत नाहीत. सुशील याप्रकरणी दोषी आहे की नाही हा तपासाचा मुद्दा आहे. मात्र कुस्ती क्षेत्रातील सगळेच या घटनेने दु:खी आहेत. असं काय घडलं की एखाद्याचा जीव जावा ते देवालाच ठाऊक".
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)