राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमेगॅलो व्हायरस नेमका काय आहे?

फोटो स्रोत, FACEBOOK/RAJEEV SATAV
काँग्रेस चे खासदार राजीव सातव यांचं रविवारी (16 मे) पहाटे निधन झालं.
त्यांच्या शरीरात सायटोमेगॅलो हा नवीन व्हायरस आढळला होता. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले असून या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजीव टोपे यांनी शनिवारी (15 मे) दिली होती.
सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते.
सायटोमेगॅलो व्हायरस नेमका आहे तरी काय?
संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॅा इश्वर गिलाडा यांनी सायटोमेगॅलो व्हायरसबद्दल सविस्तर माहिती दिली.
"सायटोमेगॅलो व्हायरस हा एक संधीसाधू रोग म्हणून ओळखला जातो. गरोदर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे महिलांची TORCH टेस्ट केली जाते.
यातील C म्हणजे हा व्हायरस आहे. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या व्हायरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येतं", असं डॉ. गिलाडा यांनी सांगितलं.
या व्हायरसची लागण झाल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात यावर डॉ. गिलाडा म्हणाले, "या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकतात. रॅटिनावर याचा परिणाम होतो. काही लोकांमध्ये याचं इन्फेक्शन फुफ्फुसात होतं. याला सीएमई न्यूमोनिया म्हणतात
काही रुग्णांना यामुळे डायरियाचा त्रास होण्याची शक्यता असते. मेंदूमध्ये देखील या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते".
या व्हायसवर कोणते उपचार उपलब्ध आहेत याबाबत डॉ. गिलाडा म्हणाले, "या आजारावर आता काही औषधं नियंत्रण आणि प्रतिबंध यासाठी आहेत. याचे उपचार सहा ते आठ आठवडे करावे लागतात".
काही लोकांमध्ये कोरोना संसर्गात या व्हायरसमुळे आजार होतो. रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं.
हा व्हायरस कसा पसरतो?
हा व्हायरस संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पसरतो. संक्रमित रुग्णाची लाळ, रक्त आणि लघवीतून पसरतो. स्तनपान करणार्या आईपासून बाळाला याचा संसर्ग होण्याची शक्यता असते असं केईएम रूग्णालयात नाक-कान घसा तज्ज्ञ डॅा नीलम साठे यांनी सांगितलं.
"सायटोमेगॅलो व्हायरस हा नवजातबाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. प्रौढांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. खासकरून ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे", असं त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "ताप, डोकेदुखी, विकनेस यांसारखी लक्षणं दिसून येतात. काही रुग्णांच्या रक्तदाबावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते. ज्यामुळे फुफ्फुसांवर आघात झाल्याने रेस्पिरेटरी फेल्युअर होण्याची शक्यताही असते".
"प्रौढांमध्ये या व्हायरसच्या संसर्गाची काही लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र कोव्हिडमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने याचा मेंदू, डोळे आणि फुफ्फुसांवर परिणाम होण्याची शक्यता असते", असं डॉ. साठे म्हणाल्या.
कोरोना संसर्ग
राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून बरं वाटत नव्हतं. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी करोना चाचणी करून घेतली. 22 एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल आला होता. त्यात सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 23 एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले.
उपचारानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, 25 एप्रिलला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होतं.
त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला होता.
कोण आहेत राजीव सातव?
45 वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.
राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.

फोटो स्रोत, Hindustan Times
राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं.
पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.
कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








