कोरोना : गंगापात्रात मृतदेह आढळल्यानंतर आता नदीकाठी वाळूतच आढळले मोठ्या प्रमाणावर पुरलेले मृतदेह

फोटो स्रोत, vishal singh
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, लखनौ, उत्तर प्रदेशहून, बीबीसी हिंदीसाठी
बिहार आणि उतर प्रदेशात गंगा नदीपात्रात मोठ्या संख्येने मृतदेह वाहून येत असल्याच्या घटना ताज्या असतानाच आता गंगेकाठी मोठ्या प्रमाणावर पार्थिव पुरले जात असल्याचं समोर आलं आहे.
कानपूर, उन्नाव आणि फतेपूरमध्ये असे शेकडो मृतदेह आढळल्याने घबराट पसरली आहे. काही जण आपल्या परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करताना पार्थिव दफन करत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, स्मशानभूमीवर होणारी गर्दी आणि महागड्या अंत्यसंस्कारामुळे लोक पार्थिव वाळूत दफन करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
बुधवारी उन्नावमध्ये गंगा किनाऱ्यावरच्या काही घाटांवर खूप मोठ्या प्रमाणावर कावळे आणि घारी उडताना दिसल्या होत्या. यावरून स्थानिकांना संशय आला. काहींनी जवळ जाऊन बघितल्यावर धडकी भरवणारं चित्रं त्यांना दिसलं.
गंगा नदीकाठी वाळूतच काही मृतदेह दफन करण्यात आले होते. काही मृतदेह वाळू वाहून गेल्याने बाहेर आले होते आणि कुत्रे त्या मृतदेहांचे लचके तोडत होते. काही मृतदेहांना वाळूत खोलवर दफन केलं नसल्याने ते अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होते.
बुधवारी उन्नावच्या शुक्लागंजमध्ये गंगाकाठी अनेक घाटांजवळ अशा वाळूत तयार केलेल्या कबरी आढळल्या.
फोटो व्हायरल झाल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून गावातले अनेकजण घरात कुणाचा मृत्यू झाल्यावर पार्थिव अशाप्रकारे वाळूत दफन करत असल्याचं उघड झालं.

फोटो स्रोत, vishal singh
गेल्या अनेक दिवसांपासून हे सुरू होतं. पण, कुणालाही त्याची कल्पना नव्हती, असं शुक्लागंजचे रहिवासी दिनकर साहू सांगतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "स्मशानभूमीत होणारी गर्दी आणि अंत्यसंस्कारासाठीचं लाकूड महागल्याने गरिबांनी दहनाऐवजी पार्थिव दफन करण्यास सुरुवात केली आहे. सामान्य परिस्थितीत असं होत नाही. मात्र, ज्यांनी हे केलंय त्यांनी नाईलाजानेच केलं असणार."
मात्र, आसपासच्या अनेक गावांमध्ये पार्थिव दफन करण्याची प्रथा असल्याचं उन्नावचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांचं म्हणणं आहे. तरीदेखील या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी रविंद्र कुमार सांगतात, "नदीपासून लांब वाळूत मृतदेह गाडल्याची माहिती मिळाली आहे. इतर भागांमध्येही मृतदेह सापडतात का, याचा तपास सुरू आहे. काही लोकांमध्ये दहन नाही तर दफन करण्याची प्रथा आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह आढळणं गंभीर आहे. तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. जी माहिती मिळेल त्यानुसार कारवाई होईल. जे लोक प्रथेनुसार दफन करतात त्यांनाही मृतदेहांना जनावरांपासून नुकसान होऊ नये, यासाठी जमिनीत खोलवर पुरावं, असं सांगितलेलं आहे. सन्मानपूर्वक पार्थिवांवर अंत्यसंस्कार व्हावेत. जे नाईलाजाने अशाप्रकारे दफन करत आहेत त्यांनाही लाकूड आणि इतर मदत मिळावी, यासाठी आम्ही काम करतोय."
उन्नावच्याच बक्सर घाटावरही शेकडोच्या संख्येने पुरलेले मृतदेह आढळले आहेत.
या जागी उन्नाव, फतेपूर आणि रायबरेलीतूनही लोक अंत्यसंस्कारासाठी येतात आणि त्यापैकी अनेकांमध्ये पार्थिव पुरण्याची परंपरा असल्याचं डीएम रविंद्र कुमार यांचं म्हणणं आहे. मात्र, अगदी मोजक्या जातींमध्ये अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्याची परंपरा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, vishal singh
गावात काही लोक लहान मुलं किंवा म्हाताऱ्या माणसांचं पार्थिव जाळण्याऐवजी पुरतात, असं स्थानिक पत्रकार विशाल प्रताप सिंह सांगतात. ते म्हणतात, "बरेचदा लोक शेतातही पार्थिव पुरतात. काही समाजांमध्ये ही परंपरा आहे. मात्र, असे लोक खूप कमी आहेत."
उन्नावव्यतिरिक्त कानपूरमध्येही गंगेवरच्या अनेक घाटांशेजारी अशा कबरी दिसल्या आहेत. कानपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मोहता यांच्या मते, "बिल्होर तहसीलच्या खेरेश्वर गंगाघाटावर वाळूत मोठ्या प्रमाणावर मृतदेह पुरले आहेत. इथेही परिस्थिती उन्नावसारखीच आहे. मोठ्या भूभागावर पुरण्यात आलेल्या मृतदेहांचे कफन स्पष्ट दिसतात. आस-पासचे रहिवासी याविषयी काहीही बोलायला तयार नाहीत. पार्थिव दफन करण्याची परंपरा असलेले कुणीच इथे आढळले नाही आणि यापूर्वी कधीही कुणी अशाप्रकारे दफनविधी केलेलाही नाही. एखाद-दुसरा अपवाद असू शकतो. मात्र, परंपरा नाही."

कानपूरमध्ये कुठलेच अधिकारी बिल्हौरच्या खेरेश्वर घाटाशेजारी आढळलेल्या मृतदेहांविषयी काहीही सांगत नाहीत. गावात गेल्या काही दिवसात इतके मृत्यू झालेत की लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठीही वेळ मिळाला नाही आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर गंगाकिनारी वाळूत पार्थिव दफन केल्याचं प्रवीण मोहता सांगतात.

फोटो स्रोत, vishal singh
उन्नावमध्ये अंत्यसंस्कार करणारे पुरोहित विजय शर्मा सांगतात, "उन्नाव आणि फतेपूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात अनेकांचा ताप आणि श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. गंगाकाठी अंत्यसंस्कारासाठीच्या घाटांवर अंत्यविधी करण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते. त्यामुळे रायबरेली, फतेपूर आणि उन्नावहून आलेल्या पार्थिवांना उन्नावमधल्या बक्सर घाटापासून थोड्याच अंतरावर गंगेच्या वाळूतच पुरलं जाऊ लागलं. इथे पूर्वी रोज 10-12 पार्थिवांवर अंत्यसंस्कार व्हायचे. मात्र, हल्ली रोज शंभराहून जास्त अंत्यसंस्कार होत आहेत."
दफन केलेल्यांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला की इतर कारणांमुळे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या सर्व घाटांवर जवळपासच्याच गावातून लोक येतात. मात्र, यावेळी मृतदेहांची ओळख पटवणंही अवघड होऊन बसलं आहे.
मृतदेह वाळूत पुरल्याचं कळल्यानंतर बुधवारी संध्याकाळीच उन्नाव आणि फतेपूर जिल्ह्यातले अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सध्या या ठिकाणी मशीनद्वारे वाळू टाकून कफन काढून टाकलेत. यापुढे अशाप्रकारे कुणीही मृतदेह दफन करू नये, यासाठी देखरेखीसाठी टीमही तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








