You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: लसीकरणावर शिवसेनेनी केलेल्या बॅनरबाजीवर झिशान सिद्दिकी नाराज
मुंबईतील बांद्रा पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी शिवसेनेवर चांगलेच नाराज झाले आहेत.
बांद्रा परिसरात लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेकडून केली जात असणारी गर्दी आणि बॅनरबाजी, शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण न देणे या सगळ्या गोष्टींवर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आहे.
आज म्हणजेच गुरुवारी (13 मे) संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सिद्दीकी यांनी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत.
या ट्वीटमध्ये झिशान सिद्दीकी म्हणतात, "शिवसेनेकडून बांद्रा पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत. याठिकाणी लसींपेक्षाही जास्त बॅनर्स तुम्हाला दिसून येतील. येथील बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, इथं आणल्या जाणाऱ्या लसी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून पक्षनिधीतून आणल्या जात आहेत का? लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचं गवगवा करणं कृपया थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे."
तत्पूर्वी, गुरुवारीच दुपारी 3 वाजून 56 मिनिटांनी सिद्दीकी यांनी असंच एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये सिद्दीकी यांनी म्हटलं, "महाराष्ट्रात कलम 144 लागू आहे. पण शिवसेना नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनासाठी गर्दी करू शकतात. नियम फक्त सामान्य नागरिकांना लागू आहेत. शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का? इथं एक व्यक्ती लस घेत असताना दहा-बारा जण फोटो काढत आहेत."
झिशान यांनी आज केलेल्या दोन्ही ट्वीट्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई महापालिका यांना टॅग केलेलं आहे.
आमदार झिशान सिद्दीकी यांचं ट्विटर अकाऊंट पाहिल्यास अशा प्रकारच्या ट्वीट्सची मालिकाच आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्दीकी सोशल मीडियावरून आपल्या मनातील खदखद बाहेर काढत असल्याचं दिसून येईल.
त्यातही शिवसेना नेते अनिल परब आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्दीकी यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर सिद्दीकी यांची विशेष नाराजी असल्याचं दिसून येतं.
अनिल परब यांच्यावर टीका
झिशान सिद्दीकी यांनी सर्वप्रथम 7 मे रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली होती. 7 मे रोजी सिद्दीकी यांनी परब यांचा एक फोटो ट्वीट करत लिहिलं, "माझ्या बांद्रा पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून कोव्हिड-19 लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मी स्थानिक आमदार असूनसुद्धा मला प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. मला या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. आपण लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणार आहात का?"
या ट्विटनंतर काही वेळानेच सिद्दीकी यांनी एक व्हीडिओही ट्वीट केला. या व्हीडिओमध्ये त्यांनी ही सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलं.
ते म्हणाले, "लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण नव्हतं. प्रोटोकॉलचं उल्लंघन झालं आहे. मंत्री अनिल परब हे आधीपासूनच असं करत आले आहेत. मी याठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असताना नेहमी हस्तक्षेप केला जातो. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला या दबावाची सवय आहे.
"मी आधीपासून काम करत आलो आहे आणि यापुढेही करतच राहणार. बांद्रा पूर्व मतदारसंघातील लोकांना माझ्या कामाबाबत माहिती आहे. येथील कामाच्या भ्रष्टाचाराबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना, महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिलं होतं. त्याचा तपासही सुरू झालेला नाही. याचा तपास करण्याबाबत कुणाला भीती आहे? अनिल परब यांनी समजून घेतलं पाहिजे. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. लोकांचा पाठिंबा मला आहे. मी काम करण्यासाठी आलो आहे. मला काम करू द्या."
शिवसेनेची प्रतिक्रिया
झिशान सिद्दीकी एकामागून एक टीकेचे बाण सोडत असताना शिवसेना नेत्यांनी मात्र मौन बाळगलं होतं. त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणं सुरुवातीपासूनच टाळल्याचं दिसून आलं.
मात्र आज सिद्दीकी यांनी पुन्हा अशा प्रकारे शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
"शिवसेनेचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर काम करतायेत. महापालिकेच्या काही कार्यक्रमांना प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींनी बोलवलं जातं. लोकप्रतिनिधी गेल्यानंतर त्या सुविधा लोकांपर्यंत पोहचतात.
त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक स्थानिक ठिकाणी हजेरी लावतात. पण सध्याच्या परिस्थितीत सर्वांनीच गर्दी होऊ नये याचं भान ठेवलं पाहीजे असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. त्याचं पालन सर्वांनीच केलं पाहीजे," असं कायंदे म्हणाल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)