कोरोना : संजय गायकवाडांच्या वक्तव्यात किती तथ्य, मांसाहार केल्याने खरंच कोरोना होत नाही का?

संजय गायकवाड

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, संजय गायकवाड

"कोरोनामुळे मंदिरं बंद आहेत. देव पण 'लॉक' करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून असे उपास-तापास बंद करा. रोज चार अंडी खा. एक दिवसाआड चिकन खा. याचबरोबर प्रोटीनयुक्त पदार्थ भरपूर खा" हा सल्ला बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिला आहे.

आमदार गायकवाड यांच्या सल्ल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वारकरी संप्रदाय प्रतिनिधींनी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केलाय. या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये वायरल झाली आहे.

वारकरी आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये जरी वाद निर्माण झाला असला तरी यात तथ्य आहे का? संजय गायकवाड असं का म्हणाले खरंच मांसाहारी घेऊन कोरोनावर मात करता येते का? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा आढावा...

ऑडिओ क्लिप आणि वाद?

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या बातम्यांनंतर वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी त्यावर आक्षेप घेतला. त्यातल्या काहींनी थेट आमदार संजय गायकवाड यांना फोन केला. या संभाषणांच्या काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये वायरल झाल्या आहेत.

एका क्लिपमध्ये वारकरी गणेश महाराज शेटे म्हणतात, "साहेब तुमच्या सारख्या माणसाने असं वक्तव्य करणं योग्य नाही." त्यावर संजय गायकवाड उत्तर देतात ते म्हणतात, "हे बघा तुम्हाला जे वाटायचे ते वाटू द्या. मी रोज पंचवीस लोकांच्या अस्ती जाळतोय. जे वास्तव आहे तेच मी बोललो. तुमच्या लोकांची श्रद्धा, भक्ती हे मला सगळं समजतं. मी पण काही नास्तिक नाही. आता जी काळाची गरज आहे तेच मी बोललो."

आहार

फोटो स्रोत, Getty Images

दुसर्‍या क्लिपमध्ये वारकरी संप्रदायाचे प्रशांत महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातला संवाद आहे.

प्रशांत महाराज - राम कृष्ण हरी साहेब.. ! आम्ही तुमचे पेपरचे कात्रण पाहिले. हे बरोबर नाही. आम्ही हिंदुत्वाच्या दृष्टीने शिवसेनेकडे पाहतो.

आमदार गायकवाड - मग काय झालं यात? का हिंदुत्व सोडलं की काय?

प्रशांत महाराज - मुस्लिमांसारखं आचरण करा. ते मटण वगैरे खातात. तुम्ही खा...!

आमदार गायकवाड - महाराज आपण समोरासमोर बसून बोलूया. असं बोलता येत नाही. तुमचे बरेच गैरसमज आहेत. मी दूर करतो.

प्रशांत महाराज - पण हे बरोबर नाही साहेब..!

आमदार गायकवाड - हे बघा.. माझं हे आवाहन, माझ्या समर्थकांसाठी आहे. माझ्या चाहत्यांसाठी आहे. जो माझा चाहता समर्थक नाही, त्याला अंगावर घेण्याची काहीच गरज नाही.

प्रशांत महाराज - असं नाही ना सर... सगळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघतात. आणि तुम्ही त्या हिंदुत्ववादी पक्षाचे एक...

आमदार गायकवाड - असा आवाहन केलं म्हणजे हिंदुत्व संपतं की काय?

प्रशांत महाराज - सर तुम्ही आमदार आहात. तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला हवी. तुम्ही एका वरून सर्वांना नाव ठेवू शकत नाही. त्यातून संपूर्ण वारकरी संप्रदाय तसा बदनाम होत नाही.

आमदार गायकवाड - हे बघा तुम्ही शब्दाचा अनर्थ करू नका. माझं म्हणणं हे आहे की, मुस्लिम समाज दोन्ही वेळेला मासाहार करतो. म्हणून त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

प्रशांत महाराज - अहो पण आपला धर्म, शास्त्र...

आमदार गायकवाड - धर्म वगैरे काही नाही. जगलात तर धर्म आहे.

या वादाबाबत भाजपचे अध्यात्म आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आमदार संजय गायकवाड यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे केलेली आहे.

आचार्य तुषार भोसले म्हणतात, "हिंदू धर्मावरील आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफीमागण्या ऐवजी हा आमदार अनेक वारकरी आणि किर्तनकारांना शिवीगाळ करतो आहे. एकीकडे उद्धव ठाकरे वारकऱ्यांना साक्ष ठेवून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात.

दुसरीकडे त्यांचाच आमदार वारकऱ्यांना शिव्या देत असताना मुख्यमंत्र्यांसकट सगळी शिवसेना मूग गिळून गप्प राहते? संजय गायकवाड बौद्धिक दिवाळखोर असल्याने संवैधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून त्याला अपात्र घोषित करून तात्काळ निलंबित करावे. अन्यथा सर्व वारकरी रस्त्यावर उतरतील."

दरम्यान मी आजही माझ्या विधानावर ठाम असल्याची प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी दिली आहे. पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? असा सवाल गायकवाड यांनी वारकऱ्यांना केलाय.

फक्त मासांहार खाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते का?

चिकन, अंडी, मासे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रमाणात प्रथिनं असतात. याचा अर्थ शाहाकारी अन्नामध्ये प्रथिनं मिळत नाहीत का? तर असं नाहीये. आहारतज्ज्ञ डॉक्टर शिल्पा जोशी सांगतात, "मासाहारी अन्नामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रथिनं (प्रोटीन) असतं.

अंडे

फोटो स्रोत, Getty Images

अंड्याचा पांढरा भाग त्याचबरोबर चिकन, मासे हे शरीराला उत्तम प्रकारचं प्रथिने (प्रोटीन) देतात. पण भारतात शाहाकारी अन्न हे शेकडो वर्षांपासून खाल्लं जातं. शाहाकारी अन्नापैकी दूध, दही, पनीर, डाळ यातून अधिकाधिक प्रथिने मिळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फक्त चिकन, अंडी किंवा डाळ, दुधाचे पदार्थ आवश्यक नसतात तर त्याचबरोबर चौरस आणि योग्य आहार गरजेचा असतो.

शाहाकारी खाणारे अनेक लोक हे फक्त एकवेळ डाळ खातात. ऑफीसला जाताना ती घेऊन जाता येत नाही किंवा एकवेळ फक्त पोळी भाजी खाणं ते पसंद करतात. असं न करता दोन्ही वेळेच्या जेवणात डाळ खाणं गरजेचे आहे. मासांहारी खाणारे लोक हे जेव्हा चिकन बनवतात, तेव्हा ते कुठलीही भाजी बनवत नाहीत. चिकन करी ही डाळीचा पर्याय आहे.

पण लोक चिकनबरोबर फक्त पोळी आणि भात खातात. हे खाणं जरी चांगलं असलं तरी भाजी खाणं तितकच गरजेचं आहे. तेव्हाच हा चौरस सकस आहार पूर्ण होतो. त्यामुळे फक्त शाकाहारी किंवा मासांहारी यापेक्षा तुम्ही कशाप्रकारे तुमचा आहार घेता हे महत्त्वाचं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)