कोरोना व्हायरस : गुजराती पत्रकारांची दिवसरात्र मृतदेह मोजण्याची कहाणी

फोटो स्रोत, Reuters
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1 एप्रिलला, गुजरातमधल्या एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकांची पत्नी आणि मुलगी आपली टेस्ट करायला राजधानी गांधीनगरच्या एका सरकारी दवाखान्यात गेल्या
तिथे रांगेत उभ्या राहून वाट पाहात असताना त्यांना स्ट्रेचरवर पडलेली दोन शवं दिसली. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांचा मृत्यू कोव्हिड-19 ने झाला होता.
मायलेकी घरी आल्यावर त्यांनी राजेश पाठक यांना सांगितलं. राजेश पाठक गुजराती वर्तमानपत्र संदेशच्या स्थानिक आवृत्तीचे संपादक आहेत.
पाठक यांनी आपल्या वार्ताहरांना फोन केला आणि ठरवलं की या गोष्टीचा पुढे तपास करायचा. "सरकारी आकडे दाखवत होते की गांधीनगरमध्ये तोवर एकही मृत्यू कोरोनामुळे झाला नाहीये," ते म्हणाले. त्या दिवशी कोरोना व्हायरसमुळे गुजरातमध्ये झालेल्या अधिकृत मृत्यूंची संख्या होती 9.
दुसऱ्या दिवशी पत्रकारांच्या एका टीमने राज्यातल्या अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, गांधीनगर, जामनगर आणि भावनगर या सात शहरांमधल्या हॉस्पिटल्सला फोन करायला आणि तिथे होणाऱ्या मृत्यूंची नोंद ठेवायला सुरुवात केली.
त्या दिवसापासून संदेश वर्तमानपत्र गुजरातमध्ये होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी रोज प्रसिद्ध करतंय. ही आकडेवारी अधिकृत आकड्यांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे.
"आमचे सोर्स आहेत हॉस्पिटल्समध्ये. बरं, सरकारने पण आमच्या बातम्या नाकारल्या नाहीयेत. पण तरीही आम्हाला अधिकृत दुजोरा हवा होता," पाठक म्हणतात.

फोटो स्रोत, SANDESH
त्यामुळे त्यांच्या टीमने ठरवलं की आता जुन्या पद्धतीने पत्रकारिता करायची. 11 एप्रिलच्या संध्याकाळी दोन रिपोर्टर आणि एक फोटोग्राफर अहमदाबादमधल्या 1200 बेड्सच्या सरकारी हॉस्पिटलच्या शवागारापाशी टेहळणी करत थांबले. पुढच्या 17 तासांत त्यांनी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले 69 मृतदेह येताना पाहिले. प्रेत यायचं आणि बाहेर उभ्या असलेल्या अँब्युलन्समध्ये ठेवलं जायचं. दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्युंचे अधिकृत आकडे होते 55 आणि यातले 20 अहमदाबादमधले होते.
16 एप्रिलच्या रात्री या पत्रकारांनी 150 किलोमीटरचा प्रवास करून अहमदाबादच्या आसपासच्या 21 स्मशानभूमींना भेट दिली. त्यांनी प्लास्टिकमध्ये गुंडळलेले मृतदेह आणि जळणाऱ्या चिता मोजल्या, रजिस्टर पाहिले, मृत्यूच्या कारणाची नोंद केलेल्या पावत्या पाहिल्या. काही फोटो काढले आणि व्हीडिओ रेकॉर्ड केले.
त्यांना आढळून आलं की मृत्यूचं कारण 'आजारीपण' असं लिहिलं होतं, पण मृतदेह हाताळताना मात्र कोव्हिडच्या नियमांचं पालन होत होतं. रात्र संपता संपता या टीमने 200 च्या वर मृतदेह मोजले, पण दुसऱ्या दिवशी अहमदाबादचा अधिकृत आकडा होता फक्त 25.
दैनिक संदेशचे निर्भिड पत्रकार संपूर्ण एप्रिल महिनाभर लक्षपूर्वक सात शहरांमधले मृत्यू मोजत होते. 21 एप्रिलला त्यांनी 753 मृत्युंची नोंद केली. कोरोना व्हायरसची दुसरी लाट आदळल्यानंतर एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू होते. इतर अनेक दिवशी त्यांनी 500 पेक्षा जास्त मृतदेह मोजले. 5 मेला दैनिक संदेशने वडोदऱ्यात 83 मृत्यू मोजले तर अधिकृत आकडेवारी होती 13. गुजरात सरकारने मृत्यूचे आकडे कमी दाखवत असल्याचं नाकारलं आहे आणि म्हटलंय की ते केंद्र सरकारची नियमावली पाळत आहेत.
पण इतर वृत्तपत्रांच्या बातम्यामध्येही आकडेवारी कमी करण्याचा उल्लेख आहे. इंग्लिश वृत्तपत्र द हिंदूने म्हटलं की 16 एप्रिलला कोव्हिड प्रोटोकॉलसह 689 मृतदेहांचं दहन केल्याच्या नोंदी त्यांच्या हाती लागल्या आहेत. त्यादिवशी गुजरात राज्याचा कोव्हिड-19 मुळे झालेल्या मृत्युंचा अधिकृत आकडा होता 94. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की गुजरातमध्ये होणाऱ्या एकूण मृत्युंच्या 10 टक्के मृत्युही सरकारी आकडेवारीत दिसत नाहीयेत.

फोटो स्रोत, HITESH RATHOD/SANDESH
कोरोनाच्या साथीमुळे लोकांना आपल्या नातेवाईकांचं उत्तरकार्य तर करता येत नाहीये, पण याच काळात वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या निधनवार्ता मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
शनिवारी, 8 मेला भरूच जिल्ह्यातल्या स्मशानभूमीत दहन झालेल्या चिता आणि सरकारी आकडेवारी यांचा ताळमेळ बसत नाही. गुजरात समाचार या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार गुजरातमध्ये आतपर्यंत 6 लाख 80 हजार लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे तर मृतांचा आकडा आहे 8500.
भारतातल्या अनेक शहरांमधून कोव्हिड-19 मुळे झालेले मृत्यू कमी भासवले जात आहेत अशा बातम्या येत आहेत. पण गुजरातमधल्या आकडेवारीमध्ये असणारी तफावत प्रचंड आहे. या भाजपशासित राज्यावर गुजरात हायकोर्टानेही ताशेरे ओढले आहेत.
"खरे आकडे लपवून सरकारच्या हातात काहीही पडणार नाहीये. उलट खरी आकडेवारी लपवली तर अजूनच समस्या निर्माण होतील, लोक सरकारवर विश्वास ठेवणार नाही आणि जनतेत भय निर्माण होईल," एप्रिलमध्ये कोर्टाने म्हटलं.
अनेकांना वाटतंय की कोव्हिड-19 मुळे होणारे मृत्यू इतर त्रास किंवा को-मॉर्बिडीटीच्या नावावर खपवले जात आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर मला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की जे रूग्ण पॉझिटीव्ह येत आहेत आणि 'व्हायरल न्युमोनिया' या आजारामुळे मरत आहेत त्यांचेच मृत्यू कोव्हिडने झाले असं गृहित धरलं जातंय.

फोटो स्रोत, TWITTER
मुख्यमंत्री विजय रूपानी म्हणतात, "प्रत्येक मृत्युचा तपास केला जातोय आणि डेथ कमिटी त्याची नोंद करतेय."
शवागारात किंवा स्मशानभूमीत मृतदेहांची नोंद करणं आणि की आकडेवारी सरकारच्या अधिकृत आकडेवारीशी पडताळून पाहाण्याची पद्धत अचूक असू शकत नाही, असं टोरांटो विद्यापीठाचे प्रभात झा म्हणतात. प्रभात झा यांनी भारतच्या महत्त्वकांक्षी मिलियन डेथ स्टडी प्रोजेक्टचं नेतृत्व केलं होतं.

फोटो स्रोत, TWITTER
यूकेसारख्या देशांनी कशाला कोव्हिड-19 मुळे झालेला मृत्यू म्हणायचं याचा आढावा घेतल्यानंतर आपली अधिकृत आकडेवारी घटवली आहे. जगभरात कोव्हिड-19 मुळे होणारे मृत्यू 30 ते 40 टक्क्यांनी कमी दाखवले जात आहेत असंही अनेक अभ्यासांतून समोर आलं आहे.
"आकडेवारी मोजणाऱ्या, त्यांची नोंद करणाऱ्या यंत्रणा सध्या प्रचंड कामाच्या ओझ्याखाली दडपल्या आहेत. अनेकदा आकडेवारी अपडेट करायला यंत्रणा वेळ लावतात. पण त्यांनी प्रत्येक मृत्युची नोंद ठेवली पाहिजे. हॉस्पिटलबाहेर आणि स्मशानभूमीत मृतदेह मोजल्याने, आणि त्याची नोंद केल्याने सरकारी यंत्रणांवर खरी आकडेवारी जाहीर करण्यासाठी दडपण येईल हे नक्की," झा म्हणतात.
पण पत्रकारांसाठी हा भयानक अनुभव आहे.
हितेश राठोड संदेशचे फोटोग्राफर आहेत. ते आपला अनुभव सांगताना म्हणतात, "लोक हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले त्यांचे मृतदेह बाहेर येतात."
एका स्मशानभूमी बाहेर त्यांनी 6 तासांची वेटिंग पाहिली होती. "तिथे लागलेली रांग पाहून मला नोटबंदीनंतर बँकांच्या बाहेर असलेल्या मोठ्याच्या मोठ्या रांगा आठवल्या."
"आता पाच वर्षांनंतर हॉस्पिटल्स, शवागारं आणि स्मशानभूमींच्या बाहेर अशाच रांगा लागल्यात. यावेळी या रांगा जिवंत राहाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांच्या आणि मेल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी वाट पाहाणाऱ्यांच्या आहेत."
रौनक शाह संदेशचे पत्रकार आहेत. ते म्हणतात एका रात्री आपल्या वडिलांच्या मृत्यूची अनाउन्समेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या तीन लहान मुलांच्या किंकाळ्यांनी हॉस्पिटल भरून गेलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
"तो अनुभव अंगावर काटा आणणारा होता," त्यांना आठवतं.
दीपक मिश्रांनी स्मशानभूमीच्या बाहेर माहिती जमा करणाऱ्या पत्रकारांच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. ते म्हणतात, ते घरी आले तेव्हा 'घाबरलेले आणि आतून हललेले' होते.
"मी आईवडिलांना आपल्या मुलांचे मृतदेह आणताना पाहिलं. तिथल्या कर्मचाऱ्यांना पैसै देऊन म्हणायचे, 'न्या माझ्या मुलाला आणि जाळा.' आपल्या मुलांच्या मृतदेहाला हात लावतानाही ते घाबरायचे."
इम्तियाज उज्जैनवाला त्याच टीमचा भाग होते. त्यांना वाटतं की फार मोठ्या प्रमाणात कोरोना मृत्युची आकडेवारी लपवली जातेय. "मी आणि माझे सहकारी फक्त एका हॉस्पिटलबाहेर उभे होतो. आम्ही तिथलेच मृतदेह मोजले. अहमदाबाद शहरात 171 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स कोव्हिड रूग्णांवर उपचार करत आहेत. तिथे कोणीच मोजत नाहीये."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








