कोरोना : बिहारमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर 40हून अधिक मृतदेह सापडले, काय आहे प्रकरण?

बिहार गंगा

फोटो स्रोत, SATYAPRAKASH/BBC

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातल्या चौसा स्मशान घाटात गंगा नदीत कमीतकमी 40 मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं न मिळाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडले असं वृत्त आहे. प्रशाससनाने हा दावा फेटाळला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेण्याचा बीबीसी हिंदीने प्रयत्न केला.

स्थानिक प्रशासनानं बीबीसीसोबत बोलताना सांगितले की गंगा नदीमध्ये सापडलेल्या मृतदेहाची संख्या अंदाजे 40 इतकी आहे. पण स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे की, त्यांनी स्मशानघाटावर याहून अधिक मृतदेह पाहिले.

या प्रकरणाचे जे फोटो समोर आले आहेत ते हृदयद्रावक आहेत. या मृतदेहांना जनावरं फाडून खाताना दिसत आहेत.

चौसाचे गटविकास अधिकारी अशोक कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, "30 ते 40 इतके मृतदेह गंगेत सापडले आहेत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत इथपर्यंत आल्याची शक्यता आहे. मी घाटाशेजारी राहणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली आहे, त्यांचं म्हणणं आहे की, हे मृतदेह इथले नाहीत."

स्थानिक काय म्हणतात?

पण स्थानिक पत्रकार सत्यप्रकाश प्रशासनाचा दावा मान्य करत नाहीत.

त्यांच्या मते, "सध्या गंगेच्या पाण्याला धार नाहीये. ही काही पुराची वेळ नाहीये. अशावेळी मृतदेह वाहून कसे काय येऊ शकतात?

"9 मेच्या सकाळी पहिल्यांदा मला याविषयी कळालं तेव्हा मी तिथं जवळपास 100 मृतदेह पाहिले. 10 मेला ही संख्या खूप कमी झाली. बक्सरच्या चरित्रवन घाटाला पौराणिक महत्त्व आहे आणि सध्या तिथं कोरोनामुळे मृतदेह जाळण्यासाठी जागा मिळत नाहीये. यामुळे लोक 8 किलोमीटर अंतरावरील चौसा स्मशान घाटात मृतदेहांना घेऊन येत आहेत.

"पण या घाटावर लाकडांची काहीच व्यवस्था नाहीये. बोटीही बंद आहेत. त्यामुळे लोक मृतदेहांना गंगा नदीत असंच टाकून देत आहे. बोट चालत असेल तर काही लोक मृतदेहाला घट्ट बांधतात आणि गंगेच्या मुख्य धारेत सोडून देतात."

घाटाशेजारी राहणारे पंडित दीन दयाल यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितलं, "या घाटावरून दररोज 2 ते 3 मृतदेह येत होते. पण गेल्या 15 दिवसांपासासून इथं दररोज 15 मृतदेह येत आहेत. गंगा नदीत जे मृतदेह तरंगत आहेत ते कोरोना संक्रमित लोकांचे आहेत. या मृतदेहांना गंगा नदीत टाकू नका, असं आम्ही संबंधितांना सांगतो, पण लोक ऐकत नाहीत. प्रशासनानं इथं सुरक्षारक्षक ठेवला आहे, पण त्यांचं कुणी ऐकत नाही."

कोरोना बिहार

फोटो स्रोत, SATYAPRAKASH/BBC

प्रशासनाचं काम सुरू

इथेच घाटावर राहणाऱ्या अंजोरिया देवी सांगतात, "आम्ही लोकांना असं करू नका म्हणू सांगतो. पण लोक म्हणतात की, तुमच्या घरच्यांनी आम्हाला लाकडं दिलीत का, जेणेकरून आम्ही त्यांचा वापर करून मृतदेहांना जाळू."

दरम्यान बक्सरचं प्रशासन या घाटावर जेसीबीच्या साहाय्यानं गड्डे खोदून मृतदेहांना पुरण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

कोरोना बिहार

फोटो स्रोत, SATYAPRAKASH/BBC

संपूर्ण बक्सर जिल्ह्याचा विचार केला तर इथं कोरोनाच्या रुग्णावर अंत्यसंस्कार करायचा म्हटला तर 15 ते 20 हजार रुपये खर्च येत आहे, असं स्थानिक पत्रकार सांगतात.

स्थानिक रहिवासी चंद्रमोहन सांगतात, "खासगी रुग्णालयात सामान्यांना लुटलं जात आहे. आता स्मशान घाटावर जाऊन ब्राह्मणाला पैसे देण्याइतपत पैसेही लोकांकडे राहिलेले नाहीत. रुग्णवाहिकेतून मृतदेह उचलण्याचे 2 हजार रुपये मागितले जात आहेत. अशात गंगा नदीची तेवढा सहारा आहे. म्हणून हे लोक गंगा नदीत मृतदेह टाकत आहेत."

बिहारमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

बिहारमध्ये 9 मेपर्यंत कोरोनाचे 1,10,804 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट 80.71 टक्के आहे. बक्सर जिल्ह्यात 1216 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारच्या आरोग्य समितीनुसार, आतापर्यंत राज्यात 80,38,525 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राजधानीचं शहर पटनामध्ये आहेत.

कोरोना बिहार

फोटो स्रोत, Getty Images

राज्य सरकारनं एचआरसीटी, रुग्णवाहिकेचे दर, हॉस्पिटल्सचे दर याविषयीच्या दरांचे नियम जारी केले आहेत, पण त्यांचं कठोरपणे पालन होत नाहीये.

बिहारमध्ये दररोज कोरोनाचे 10 हजार रुग्ण आढळत आहेत आणि 60हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. आतारपर्यंत राज्यात कोरोनामुळे 3,282 मृत्यू झाले आहेत.

रविवारी (9 मे) राज्यात कोरोनाचे 11,259 रुग्ण आढळले आणि 67 जणांचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)