कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांचे कसे होत आहेत हाल?

फोटो स्रोत, Getty Images / Hindustan Times
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
राज्यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याने अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीये. त्यामुळे या रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र आहे.
"मागच्या वर्षी मला मणक्याचा त्रास होऊ लागला. पण कोव्हिडच्या भीतीने मी त्रास सहन केला. तेव्हा कोव्हिड रूग्णांना बेड मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.
"मग मला कुठून बेड मिळेल? मला कोव्हिड झाला तर? अशा अनेक शंका मनात होत्या. माझं दुखणं सहन करता येईल इतकं होतं. त्यामुळे मी कोव्हिड होण्यापेक्षा ते सहन केलेलं बरं असा विचार केला," वसईला राहणारे दीपक खंडागळे सांगत होते.
त्यांनी पुढे सांगितलं, "यावेळी कौटुंबिक डॉक्टरकडून औषधं सुरू केली होती. यामध्ये 7-8 महिन्यांचा काळ लोटला. त्यानंतर माझं दुखणं अधिक वाढलं. मग डॉक्टरांनी मला शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. आता माझी शस्त्रक्रिया झाली आहेत. पण मणक्याची शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यभराचं दुखणं पदरात पडलंय."
ठाण्यात राहणार्या 78 वर्षीय शरीफ शेख सांगतात, "काही दिवसांपूर्वी माझे हात आणि पाय वाकडे होत होते. पण काही वेळाने ते स्थिर होऊन खूप दुखत होते. आम्ही डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी हा पक्षाघाताचा प्रकार असल्याचं सांगितलं. मला तातडीने रुग्णालयात भरती होऊन इंजेक्शन सुरू करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण कोव्हिड नसलेल्या रुग्णालयातही रुग्णांची खूप गर्दी होती.
"तिथल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी माझं वय आणि कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णालयात भरती करणं जोखीम असल्याची कल्पना आम्हाला दिली. मग माझ्या कुटुंबीयांनी घरीच उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली. सध्या महिनाभर माझी औषधं सुरू आहेत. पण मला लागणारी इंजेक्शन्स ही रुग्णालयात भरती करूनच द्यावी लागणार आहेत. पुढे काय करायचं याचा निर्णय माझं कुटुंब घेईल".
दीपक आणि शरीफ यांच्यासारखे असंख्य रूग्ण गरज असताना रुग्णालयात भरती होऊन उपचार घेऊ शकत नाहीत किंवा कोरोनाच्या भीतीने ते पूर्ण उपचार घेत नाहीत.
कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसर्या लाटेत संपूर्ण देश होरपळून निघतोय. कोरोना रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय.
या परिस्थितीत कोव्हिडव्यतिरिक्त अन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांचे हाल होत आहेत. त्यांच्यावर तात्पुरते उपचार करावे लागत आहेत. तर काही रूग्ण कोव्हिडला घाबरून घरीच उपचार घेत आहेत. यासंबंधीची परिस्थिती मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
अन्य रूग्णांसाठी बेड्सची कमतरता
सध्या राज्यात 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अन्य रूग्णांसाठी रूग्णालयातील बेडची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कोव्हिड व्यतिरिक्त इतर आजारांचे रूग्ण रूग्णालयात आले तर त्यांच्यासाठी बेड उपलब्ध होणं कठीण जातंय.
हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर भरत जैन सांगतात, "ओपीडीमध्ये असंख्य रुग्ण येतात. ज्यांना गंभीर आजार आहे. रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे त्यांना आम्ही 'नॉन कोव्हिड' रुग्णालयात भरती होण्यास सांगतो. पण कोरोनामुळे बर्याच रुग्णालयातील बेड हे भरले आहेत. त्यामुळे 'नॉन कोव्हिड' रुग्णालयावर ताण आहे.
"अनेकदा रुग्णांचे नातेवाईक त्यांना बेड मिळत नसल्याचं सांगतात. आम्ही आमच्या माहितीतली रुग्णालयं सुचवतो. पण बेड उपलब्ध नसेल तर काय करणार"?

फोटो स्रोत, Getty Images /NurPhoto
सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. पण नियोजित शस्त्रक्रिया अनेक रुग्णालयात पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
हृदयरोग तज्ञ डॉ. सुरासे सांगतात, "बायपास शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, मणक्याच्या शस्त्रक्रिया ज्या काहीवेळ थांबवणं शक्य आहे अशा रुग्णांना आम्ही काही काळ थांबण्याचा सल्ला देतो. पण ज्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांच्यावर आम्ही तात्काळ उपचारासाठी प्राधान्य देतो."
मुंबईसारख्या शहरात इतर सुविधा उपलब्ध आहेत. पण मुंबईबाहेरच्या 'नॉन कोव्हिड' रूग्णांना उपचारांसाठी अडचणी येत आहेत.
नानावटी हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. जयेश पवार एक घटना सांगतात.
"चिपळूणला राहणारा एक 28 वर्षांचा मुलगा उंचावरून खाली पडला. त्याला कमरेला मार लागला. चिपळूणमध्ये जी आहेत ती कोव्हिड रुग्णालयं आहेत. त्याचे उपचार त्या ठिकाणी होणं कठीण होतं. लॉकडाऊनमुळे त्यांना प्रवास करून येण्यासाठी 3 दिवस लागले. तात्काळ त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं असताना त्यासाठी 3 दिवस लागले. मग बरं होण्यासाठीही त्या रुग्णाला तितकाच वेळ गेला."
सरकारी रुग्णालयात होत आहेत उपचार?
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने सांगतात,"नॉन कोव्हिड' रुग्णालयात उपचार होत आहेत. जे. जे. हे पूर्ण नॉन कोव्हिड हॉस्पिटल आहे. के. ई. एम. आणि नायर सगळीकडे उपचार होत आहेत. फक्त काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
"रुग्णांच्या तब्येतीवर ज्यामुळे परिणाम होणार नाहीत अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाकी नॉन कोव्हिड रुग्णांना कोणताही त्रास होत नाही".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








