You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या 17 वर
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या 17 वर गेली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर मोठा हिंसाचार उसळल्याचे पाहायला मिळाले.
या हिंसाचाराबाबत राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने पश्चिम बंगालच्या गृह सचिवांकडून अहवाल मागितला आहे.
बंगालमध्ये मुलांवर अत्याचार आणि हिंसाचारात त्यांचा वापर करून घेतला गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यानंतर आयोगाने अहवालाची मागणी केली आहे.
आयोगाच्या चेअरपर्सन प्रियंका कानुंगो यांनी बंगालच्या गृह सचिवांना पाठवलेल्या नोटिशीची प्रत ट्वीट केली आहे.
याआधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे.
राजकीय कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करणं, पक्ष कार्यालयाची तोडफोड तसंच लूटमार करणं करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र एवढं होऊनही जिल्हा प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी बांधील स्थानिक यंत्रणेनं यासाठी काहीही केलेलं नाही.
निर्दोष नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन झालं आहे. हे लक्षात घेऊन मानवाधिकार आयोगाने पश्चिम बंगालच्या डीआयजींकडून अहवाल मागितला आहे. दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करा असं आयोगाने म्हटलं आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ले केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
दुसरीकडे तृणमूलने याला भाजपमधील अंतर्कलह म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
रविवारी निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर हिंसाचाराच्या पोस्ट, व्हीडिओ शेअर होऊ लागले. या पोस्ट्स तसंच व्हीडिओंची संख्या एवढी आहे की स्वतंत्रपणे त्यांच्या सत्यतेबाबत पुष्टी केली जाऊ शकत नाही.
बंगालमधील ग्रामीण भागात गोंधळ आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. यासंदर्भात वादग्रस्त ट्वीट केल्याने अभिनेत्री कंगना राणावतचं ट्वीटर अकाऊंट बरखास्त करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या मते, रविवारी रात्रीपासून आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमध्ये बारा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली माणसं कोणत्या पक्षाची आहेत याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही. दुसरीकडे भाजपने आमची सहा माणसं तृणमूल कार्यकर्त्यांच्या हातून मारली गेल्याचं म्हटलं आहे.
तृणमूलनेही आमच्या चार जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. एक जण इंडियन सेक्युलर फ्रंटचा समर्थक असल्याचं सांगितलं जातंय.
26 जणांना अटक
अनेक भागांमध्ये पक्ष कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचंही समोर येतं आहे. हिंसाचाराच्या आरोपांवरून पोलिसांनी 26 लोकांना अटक केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने चिंता व्यक्त करत याप्रकरणासंदर्भात अहवाल मागितला आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी बंगालमध्ये दाखल झाले आहेत.
दुसरीकडे लोकांनी शांततेचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. शपथविधी सोहळा होईपर्यंत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपचा आंदोलनाचा इशारा
हिंसाचाराला अंकुश लावण्यात यावा याकरता भाजपने बुधवारी देशभरात आंदोलन करायचं ठरवलं आहे.
हिंसाचाराच्या बातम्यांनंतर राज्यपालांनी पोलीस महासंचालक नीरज नयन पांडे आणि कोलकाताचे पोलीस आयुक्त सौमेन मित्र यांच्यासह गृहसचिव हरिकृष्ण द्विवेदी यांच्याबरोबर बैठक घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.
भाजप आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी निवडणूक काळात खूप अत्याचार केले. पण लोकांनी शांततेचं पालन करावं असं आवाहन करते. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणं ही आपली प्राथमिकता आहे असं ममता यांनी सांगितलं.
कूचबिहारसह काही भागांमध्ये भाजप हिंसाचार करत असल्याचा ममता यांचा आरोप आहे. निवडणूक हरल्याच्या निराशेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
इतक्या मोठ्या विजयानंतरही हिंसाचार का होतो आहे? पोलिसांसमक्ष हल्ले होत आहेत. पोलीस मूकपणे पाहत आहेत. मुख्यमंत्री याची जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत, मग कोण घेणार? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)