कोरोना : मुंबईत लस मिळण्यासाठी अडचण, मग गावांमध्ये कशी मिळतेय लस?

मुंबई लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे लसीकरण मोफत करणार असल्याचं ठाकरे सरकारने जाहीर केलं. पण लसींचा तुटवडा असल्यामुळे सगळीकडे 100 टक्के लसीकरण सुरू होईल याची खात्री देता येणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.

मुंबईमध्ये लसीकरणाची आज फक्त 5 केंद्र सुरू आहेत. याउलट आसपासच्या ग्रामीण भागात मात्र लसीकरणाचे 'स्टॉल्टस्' उपलब्ध असल्याचं दिसतंय.

घाटकोपरला राहणारे चिन्मय भावे सांगतात, "मी कोविन अॅपवर रजिस्टर करून लस उपलब्ध असलेली केंद्र 2 मे ला ऑनलाईन शोधायला सुरुवात केली. मुंबईमध्ये मला कोणताही 'स्लॉट' दिसला नाही. मग मी इतर जिल्ह्याचे स्लॉटस् तपासून पाहीले. तर मला ठाणे, पनवेल, विरार इकडचे स्लॉट उपलब्ध दिसले."

"मला 2 तास प्रवास करून तिथे जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी माझ्या मित्रांना सांगितलं. त्यानंतर मी घाटकोपरवरून नवी मुंबईतील खारघरला गेलो आणि तिथे लस घेतली. मुंबई शहरापेक्षा आसपासच्या ग्रामीण भागात अधिक स्टॉल्टस् उपलब्ध दिसत आहेत," तन्मय पुढे सांगतात.

हा अनुभव फक्त चिन्मय भावे यांचाच नाही. चेंबूरला राहणार्‍या प्राची साठे यांना लसीकरणासाठी मुंबईत कुठेही स्लॉट उपलब्ध दिसत नव्हता. त्यांनी इतर शहरांमध्ये तपासून पाहिलं तर भिवंडीमध्ये त्यांना एका केंद्रावर स्लॉट मिळाला.

दीड तास प्रवास करून त्यांनी भिवंडीला जाऊन लस घेतली. पण मग गावांमध्ये लस मिळत असताना शहरात लस का मिळत नाहीये?

लसीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी?

मुंबई महापालिकेच्या लसीकरण विभागाच्या डॉक्टर मंगला गोमारे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "मुंबईमध्ये लसीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जर काहींना ग्रामीण भागातील स्लॉटस् उपलब्ध होत असतील तर त्यांच्याकडे तितका लसीचा साठा उपलब्ध असेल.

"मुंबई महापालिकेकडे 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी आज 20 हजार लसी राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे. पण लसीची मागणी ही यापेक्षा खूप जास्त आहे. त्यासाठी आज मुंबई महापालिकेने फक्त पाच केंद्र 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी सुरू ठेवली आहेत. यापुढे ती कशी सुरू राहणार हे लसीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे."

रोज राज्य सरकारकडून लसीचा किती साठा येतो? याबाबत बोलताना त्या पुढे म्हणतात, "हे आता सांगणं कठीण आहे. कधी दीड लाख लसीचा साठा उपलब्ध झाला आहे, तर कधी 20 हजार त्यामुळे लसीचा साठा जसा उपलब्ध होतो, तसं व्यवस्थापन त्या दिवशी असतं."

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images / NurPhoto

लसीचा हा साठा राज्य सरकारकडे येतो. त्यानंतर त्याचं महापालिका क्षेत्रात वाटप केलं जातं.

महापालिकेकडून विविध केंद्रांवर या साठ्याचं वितरण करण्यात येतं. राज्य सरकारचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे सांगतात, "ग्रामीण भागात शहरांइतकी लसीकरणाची मागणी नाही. मुंबईसारख्या शहरात रोज शेकडो लोक विविध हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी रांगेत उभे असतात.

"18 वर्षांवरील असंख्य लोकं आता लस घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लसीचा साठा राज्य सरकारकडून वितरित केला जातो. ग्रामीण भागात वितरित केलेला साठा पुरतो किंवा दिलेल्या साठ्यापेक्षा काही ठिकाणी लसीकरण कमी होतं."

कोविन लस नोंदणी

"मुंबईसारख्या शहरात वितरित केलेल्या साठ्यापेक्षा कित्येक पट जास्त मागणी आहे. त्यामुळे वितरित केलेला साठा संपतो. मग केंद्र बंद होतात. पण जर ग्रामीण भागात लसीच्या दिलेल्या साठ्यापेक्षा कमी लसीकरण झालं तर तिकडची उपलब्धता दिसते. ही तांत्रिक अडचण आहे."

काही गावांची लोकसंख्या कमी असल्यामुळे लसीचा साठा शिल्लक राहतो तर काही गावांमध्ये संपतो, असंही ते पुढे सांगतात.

लशीबाबतचे गैरसमज?

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लस उपलब्ध असूनही स्थानिक घ्यायला तयार होत नाहीत. याचं कारण लशीबाबत ग्रामीण भागात स्थानिकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत.

औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील 'जानेफळ' गावांत 100% टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलंय. पण लसीकरण पूर्ण करण्यासाठी गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.

कृष्णा गावंडे सांगतात, "525 लोकसंख्येचं आमचं गाव आहे. त्यात 85 लोकं 45 वयोगटाच्या पुढचे होते. त्यांच्या मनात लसीबाबत खूप भीती होती. लस घेतल्यावर हात निकामी होतो, लस घेतल्यामुळे अनेकांना कोरोना झाला, लसीमुळे माणसांचे मृत्यू होतायेत असे अनेक गैरसमज गावातल्या लोकांच्या मनात होते. ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला 15 दिवस लागले. मग आम्ही कोरोना चाचण्यांचा कॅम्प लावला. सगळ्याच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. सर्वांच्या मनातील भीती घालवून मग लसीकरणाला सुरुवात केली."

जानेफळ गावांसारखी अजून असंख्य गावं आहेत. ज्याठिकाणी लसीचा साठा उपलब्ध असला तरी स्थानिकांकडून ती लस घेतली जात नाहीये. पण काही गावांनी प्रबोधन करून गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्या जिल्ह्यात, किती टक्के लसीकरण?

संपूर्ण महाराष्ट्रात दीड कोटीपेक्षा अधिक जनतेचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. 2 मे पर्यंत 1,63,62,895 जनतेचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. त्यापैकी सर्वाधिक लसीकरण हे कोल्हापूर जिल्ह्यात तर सर्वांत कमी लसीकरण हे हिंगोलीमध्ये झालेलं आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, मुंबईतलं एक कोल्ड स्टोरेज

सर्वाधिक लसीकरण झालेले जिल्हे

  • कोल्हापूर - 57.84 %
  • सांगली - 47.53
  • सातारा - 46.58%
  • पुणे - 44.11%
  • नागपूर - 42.15%
  • भंडारा - 39.80%
  • मुंबई - 39.78%
  • वर्धा - 36.76%
  • सिंधुदुर्ग - 30.46%
  • वाशिम - 28.40%
  • ठाणे - 25.46%

सर्वांत कमी लसीकरण झालेले जिल्हे

  • बीड - 15.28%
  • सोलापूर -14.14%
  • जळगाव - 14.04%
  • पालघर -12.79%
  • गडचिरोली -12.02%
  • नंदुरबार - 11.02%
  • हिंगोली - 9.45%

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)