एम. के. स्टॅलिन : तामिळनाडूच्या भावी मुख्यमंत्र्यांसमोर भाजपनं असा उभा केलाय विचारधारेचा पेच

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपनं तामिळनाडूचा पेपर तसा ऑप्शनला टाकला होता. पश्चिम बंगाल, केरळ आणि आसामच्या तुलनेत भाजपनं तामिळनाडूमध्ये फारसा जोर लावला नव्हता. अण्णा द्रमुकच्या आघाडीत सहभागी होऊन भाजपने फक्त 20 जागा लढवल्या.

निकालांच्या दिवशीसुद्धा (2 मे 2021) भाजपच्या पदरात काही पडतं की नाही, याची चर्चा सुरू असताना संध्याकाळी नागरकोईल मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आणि तामिळनाडूतला भाजपचा वनवास अखेर संपला. एम. आर. गांधी यांच्या रुपाने भाजपचा पहिला आमदार आता तामिळनाडूच्या विधानभेत असणार आहे.

तामिळनाडूच्या विधानसभेत एवढ्या वर्षांमध्ये भाजपला एकही आमदार निवडून पाठवणं शक्य झालेलं नव्हतं. पण या ऑप्शनल टाकलेल्या राज्यात आता भाजपचा अखेर प्रवेश झाला आहे आणि याबरोबरच कायम स्थानिक पक्षांचा आणि तामिळी अस्मितेचा वरचष्मा असलेल्या या राज्यात हिंदुत्वाच्या विचारसरणीचं बिजं भाजपला पेरता आली आहेत.

भाजपला या निवडणुकीत मिळालेलं हे यश अल्प असलं तरी निवडणुकीच्या माध्यमातून तामिळ समाजात हिंदुत्व, हिंदू धर्म आणि मंदिर हे मुद्दे आता चर्चेचा विषय झालेले आहेत. याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही.

म्हणूनच निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांना आपण हिंदूविरोधी नसल्याचं सांगावं लागलं. हिंदू मंदिरांसाठी निधीचं आश्वासन द्यावं लागलं, पेरियार यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांना त्यांची पत्नी किती धार्मिक आहे, ती कशी रोज मंदिरात जाते हे सांगावं लागलं. यावरूनच लक्षात येतं की आतापर्यंत पेरियार यांच्या विचारधारेचा वारसा सांगणारं तामिळनाडूचं राजकारण कूस बदलत आहे.

त्यामुळेच आता सत्तेत आलेल्या द्रमुक आणि स्टॅलिन यांच्यासमोर विचारधारेचा पेच उभा राहिला आहे. बीबीसी तामिळचे पत्रकार बाला सुब्रह्मण्यम याबाबत अधिक माहिती सांगतात.

"स्टॅलिन हे एक प्रकारे भाजपनं या निवडणुकीत त्यांच्या समोर टाकलेल्या जाळ्यात फसले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या समोर 2 पर्याय उभे राहतात. पहिला म्हणजे त्यांच्या पक्षाला पुन्हा त्यांच्या मुलभूत मुद्द्यांकडे म्हणजेच तामिळी अस्मिता आणि सामाजिक न्याय या मद्द्यांकडे वळवावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे आता आत्मसात केलेला सॉफ्ट हिंदुत्वाचा पुढेसुद्धा अंगीकार करणे. पण दुसरा पर्याय वापरणे म्हणजे पुन्हा एकदा भाजपच्या जाळ्यात फसण्यासारखंच आहे," असं बाला सुब्रह्मण्यम सांगतात.

पण तामिळनाडूच्या राजकारणासाठी हे काही नवं नसल्याचं बाला सांगतात. "करुणानिधी आणि जयललिता यांना या दोन्ही आघाड्यांवर आतापर्यंत लिलया खेळता आलेलं आहे. जशी वेळ बदलेली तसं त्यांनी त्यांचं राजकारण बदललं आहे. आता स्टॅलिन यांना ते किती आणि कसं जमतं ते पाहावं लागेल. पण एक मात्र नक्की की यावेळी मात्र भाजपनं नवं आणि मोठं आव्हान स्टॅलिन यांच्यापुढे उभं केलं आहे."

द हिंदूचे उपनिवासी संपादक डी. सुरेश कुमार हेसुद्धा या मुद्द्याशी सहमत होतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, "जसं पूर्वी ख्रिश्चन मिशनरी करत होत्या, तसं आता हिंदू उजव्या विचारांची मंडळी ग्रामीण भाग आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पाठशाळा उघडत आहेत. तिथं ते मोफत शिक्षण देत आहेत. पुस्तकं देत आहेत. हळूहळू ते त्यांची विचारधारा नव्या तरुणांमध्ये पसरवत आहेत. त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला आणि जर द्रमुकला त्यांना प्रत्युत्तर देता आलं नाही तर मात्र भाजप तामिळनाडूत नक्की पसरेल."

तामिळनाडूच्या विधानसभेत आधी एकतरी आमदार निवडून पाठवायचा हे आमचं पहिलं लक्ष्य होतं. त्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आहेत. आता पुढच्या ध्येयांवर काम करू असं चेन्नईतल्या आरएसएसच्या काही प्रचारकांनी मला सांगितलं.

तामिळनाडूचं राजकारण आणि समाज आता बदलला असल्याचा दावासुद्धा आरएसएसची ही मंडळी करतात.

आर.एस.एसचे चेन्नई महानगर प्रमुख गोपालकृष्ण के. बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "1970 च्या दशकात ते (पेरियारवादी) हिंदू देवतांना चपलांच्या माळा घालत होते, मूर्ती तोडत होते. आता ते त्याचा विचारसुद्धा करू शकणार नाहीत. तामिळनाडू आता बदललं आहे. सामाजिक बदल झालेला आहे. तो आणखी होईल, त्यासाठी वेळ लागेल, काम करावं लागेल आणि आम्ही ते करत आहोत."

गेली किमान पाच दशकं तामिळनाडूच्या राजकारणात पेरियार यांच्या विधारधारेतून पुढे आलेल्या पक्षांचा दबदबा राहिला आहे. त्यांची सत्ता राहिली आहे. पण आता पुढे तो कायम राहील का?

पेरियार यांच्या विचारांचा वारसा सागणाऱ्या लोकांना, द्रवि़ड कळघमच्या कार्यकर्त्यांना मात्र भाजप किंवा उजव्या विचारसरणीचा वाढता दबदबा महत्त्वाचा वाटतो. पेरियार विचारक अरुलमोळी यांना सुद्धा तो महत्त्वाचा वाटतो.

"जर विरोधी विचारांची मंडळी आली, त्यांनी विरोधी विचार मांडले तर आमची विचारधारा आणखी वाढणार आहे. भाजपनं तयार केलेल्या वातावरणामुळे आणखी तरूण मंडळी आमच्याकडे आकर्षित होतील. ते आणखी पेरियार यांची विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न करतील," असं अरुलमोळी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)