कोरोना : लोकांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी 'या' मुंबईकर तरुणानं गाडी आणि दागिने विकले

फोटो स्रोत, shahnawaz Sheikh
- Author, इक्बाल परवेज
- Role, बीबीसीसाठी मुंबईहून
देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेत सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. बेड न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक लोकांचा जीव जात आहे.
अशात मुंबईतल्या मालाडमधल्या मालवणीचे 32 वर्षांचे शाहनवाज शेख शक्य होतील तितक्या लोकांचं आयुष्य वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.
पैसे कमी पडले तेव्हा त्यांनी स्वतःची महागडी SUV कार विकली आणि त्या पैशातून ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन लोकांना मोफत ऑक्सिजन द्यायला सुरुवात केली. सिलेंडर कमी पडले तेव्हा त्यांनी आपली सोन्याची चेन आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी विकल्या.
शाहनवाज यांनी बीबीसीला सांगितलं, "ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव जातोय. अशात माझ्याकडून जे शक्य आहे ते सगळं मी करतोय. उद्देश हाच आहे की शक्य तितक्या लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवावा आणि त्यांचा जीव वाचवावा. यासाठी मी माझ्या SUV कारसह काही मौल्यवान वस्तू विकल्या."
शाहनवाज यांच्याकडून सिलेंडर घेतलेले गणेश त्रिवेदी म्हणतात, "या महामारीच्या काळात शाहनवाज भाई जे करत आहेत त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनेक संस्था फक्त नावापुरत्या आहेत, पण लोकांची खरी सेवा तर शाहनवाज भाई करत आहेत. कोणतीही कागदपत्रं किंवा सिक्युरिटी डिपॉझिटशिवाय ते सिलेंडर देत आहेत."
शाहनवाज यांनी मागच्या वर्षांपासूनच कोरोनाग्रस्तांची मदत करायला सुरूवात केली. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सगळं बंद झाल्यानंतर रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांचे दोन वेळेच्या जेवणाचे हाल सुरू झाले. मुंबईच्या मालाडमधल्या मालवणीमध्ये बहुतांश गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहातात.

फोटो स्रोत, shahnawaz Sheikh
घरांची दुरुस्ती आणि इंटीरियर डिझायनिंगचं काम करणाऱ्या शाहनावाज यांना जेव्हा मालवणीतले लोक त्रस्त दिसले तेव्हा त्यांनी आपल्या स्वकमाईचे पैसै खर्चून गरीबांना अन्नधान्य द्यायला सुरुवात केली.
शाहनवाज म्हणतात, "जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लागला तेव्हा मालवणीतल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचा कमाईचा मार्ग बंद झाला. माझ्याकडे जे पैसे होते त्यातून मी लोकांना मदत करायला सुरुवात केली. याच दरम्यान मालवणीच्या एका मैदानावर मी स्थलांतरित मजुरांना बसलेलं पाहिलं. त्या दिवसांत लोक आपल्या गावी जाण्यासाठी संघर्ष करत होते. त्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. हे करताना त्यांना उन्हातान्हात आपल्या मुलाबाळांसह उपाशी राहावं लागत होतं. ते पाहून मला फार त्रास झाला आणि मी त्या मजुरांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली."
त्याच काळात शाहनवाजचे मित्र अब्बास रिझवी यांची बहीण आसमां आई बनणार होत्या. पण मुंबईला लागून असलेल्या मुंब्र्यात त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हॉस्पिटल शोधता शोधता मुंब्र्याच्याच कळसेकर हॉस्पिटलबाहेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

फोटो स्रोत, shahnawaz Sheikh
अब्बास यांनी आपली कहाणी शाहनवाज यांना सांगितली तेव्हा त्यांनी ठरवलं की ते गरजू लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवतील कारण ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांचा जीव जात होता.
शाहनवाज म्हणतात, "परिस्थिती गंभीर होती आणि मला आसमांबदद्ल कळलं तेव्हा वाटलं की अनेकदा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नसतो, तेव्हा जर लोकांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला तर त्यांचा जीव वाचू शकतो. आम्ही काही लोकांशी आणि डॉक्टरांशी बोललो आणि जाणून घेतलं की ऑक्सिजन सिलेंडर कसा मिळू शकतो. आम्ही ठरवलं की आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणू आणि लोकांना तोपर्यंत देत राहू जोवर त्यांना हॉस्पिटलकडून मिळत नाही.
"माझ्याकडे जितके पैसै होते त्यातून मी 30-40 सिलेंडर विकत घेतले. सोशल मीडियावर याविषयी माहिती देली. लोकांना मला संपर्क करायला सुरुवात केली. ऑक्सिजनची गरज इतकी वाढली की 30-40 सिलेंडरही कमी पडायला लागले. तेव्हा मग गाडी आणि इतर वस्तू विकून पैसै उभे केले. त्यातून 225 सिलेंडर विकत घेतले. रोज रात्री आमची एक टीम सिलेंडर भरून आणायची म्हणजे ऑक्सिजन कमी पडायला नको."

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

शाहनवाजचे मित्र सय्यद अब्बास रिझवी यांनी सांगितलं की, "आम्ही दोघं मिळून गरजूंची मदत करत होतो. काही कारणांस्तव नंतर मी शाहनवाज यांच्याबरोबर सतत काम करू शकलो नाही, पण ते अजूनही गरजवंतांची मदत करत आहेत. त्यांचं काम बघून खूप आनंद होतो. माझ्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर लोकांना ऑक्सिजन पुरवण्याची योजना त्यांनी बनवली. आताही ते लोकांना प्राणवायू मिळवून द्यायला मदत करत आहेत."
लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम
लॉकडाऊनमुळे शाहनवाजच्या कामावरही परिणाम झाला. त्यांचं ऑफिस बंद झालं. सध्या ते घरून थोडंफार काम करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट लोकांचं जगणं अस्ताव्यस्त करतेय तेव्हाही शाहनवाज गरजू लोकांची मदत करत आहेत, त्यांना मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत.

फोटो स्रोत, shahnawaz Sheikh
गेल्या वर्षी शेकडो लोकांचा जीव वाचवणारे शाहनवाज कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्याकडे 4000 रुपये किंमतीचे 225 सिलेंडर आहेत. हे सिलेंडर ते सतत भरून आणतात आणि गरजवंतांना देतात. एक सिलेंडर भरायला साधारण 300 रुपये खर्च होतात. ही मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी अशी शाहनवाज यांची इच्छा आहे.
ते म्हणतात "ऑक्सिजनच्या कमरतेमुळे आम्ही कितीही प्रयत्न केले तरी दिवसाला 40-50 सिलेंडरच भरून मिळतात. जर सगळे सिलेंडर भरून मिळाले तर आम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करू शकू. कधी कधी सिलेंडर भरायला 80-90 किलोमीटर लांब जावं लागतं. वाढत्या मागणीमुळे सिलेंडर भरण्याची किंमतही वाढली आहे. गेल्यावर्षी एक सिलेंडर भरायला 150 ते 180 रुपये लागायचे, आता त्याची किंमत 400 ते 600 रुपये झाली आहे. पण मला 300 रुपयात भरून मिळतो कारण त्यांना माहितेय की मी लोकांची सेवा करतोय."
मुंबईतल्या वांद्रेमधल्या हिल रोडवर राहाणाऱ्या एजाज फारूक पटेल यांचे 67 वर्षांचे वडील फारूख अहमद यांची तब्येत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बिघडली. त्यांना कोणत्याही दवाखान्यात बेड मिळत नव्हता. फारूख पटेल यांना आधीच मधुमेह आणि हृदयविकार होता.
एजाज पटेल हॉस्पिटलला चकरा मारत होते पण काही हाती लागत नव्हतं. ऑक्सिजनची अत्यंत गरज होती तेव्हाच एजाजला कोणीतरी शाहनवाज यांच्याविषयी सांगितलं, एजाज यांनी तातडीने शाहनवाज यांना संपर्क केला आणि तासाभरात त्यांना ऑक्सिजन मिळाला. त्यांचे वडील आता बरे झाले आहेत.
अनेकांना मिळतेय मदत
एजाज फारूक पटेल यांनी सांगितलं, "वडिलांची तब्येत 8 एप्रिल 2021 बिघडली तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल 80-81 इतकी होती. हॉस्पिटलमध्ये ना बेड मिळत होता ना ऑक्सिजन. बेड मिळाला नाही तेव्हा त्यांना अलगीकरणात घरीच ठेवलं. मी ऑक्सिजन विकत घ्यायला तयार होतो पण मिळत नव्हता. मग मला शाहनवाज भाईंविषयी कळलं आणि त्यांनी लगेच ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. 3 दिवस मला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नव्हता. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत. ते माझ्याकडून पैसैही घेत नव्हते, पण मी जबरदस्तीने त्यांना पैसै घ्यायला लावले, म्हणजे सिलेंडर पुन्हा भरून ज्याला गरज आहे त्या माणसाकडे सिलेंडर पोहचू शकेल."

फोटो स्रोत, shahnawaz Sheikh
मुंबईतल्या मालाड इस्ट भागातल्या काठियावाडी चौकीचे गणेश त्रिवेदी म्हणतात त्यांनी अर्ध्या रात्री शाहनवाज यांचं दार ठोठावलं आणि त्यांना ऑक्सिजन मिळाला. गणेश आपल्या 75 वर्षांची आजी कंचन बेन डेडिया यांच्या उपचारासाठी वणवण फिरत होते. अनेक संस्थांकडेही फेऱ्या मारल्या पण ऑक्सिजन शाहनवाज यांनी मिळवून दिला.
ते म्हणतात, "माझी आजी आजारी होती. तिला कोणत्याही दवाखान्यात जागा मिळत नव्हती. ज्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला तिथले पैसै आम्ही भरू शकत नव्हतो. आम्ही अनेक स्वयंसेवी संस्थांकडे गेलो. पण त्या सगळ्या नावापुरत्याच आहेत. तिथे सगळ्या प्रकारची कागदपत्रं मागत होते. मग मी 21 एप्रिलला शाहनवाज भाईंकडे गेलो. त्यांनी मला कोणतीही कागदपत्रं न मागता, फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेऊन रात्री साडे बारा वाजता ऑक्सिजन सिलेंडर दिला."
इतकंच नाही, स्थानिक नेतेही कोरोनाग्रस्तांची मदत करायला शाहनवाज यांची मदत घेत आहेत. काँग्रेसचे उत्तर मुंबई जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू शिरसाठ यांनी सांगितलं, "आम्ही पॅन्डेमिक टास्क फोर्ससाठी हेल्पलाईन नंबर दिला होता. त्यानंतर आमच्याकडे मदतीसाठी फोन येतात. जर कोणाला ऑक्सिजनची गरज असेल तर आम्ही शाहनवाज यांच्याकडून मिळवून देतो. गेल्या काही दिवसात मी अनेक लोकांना ऑक्सिजन मिळवून दिला आहे. रात्री 1 वाजताही फोन केला तरी शाहनवाज भाऊंनी आमचा फोन उचलला आहे आणि आमची मदत केली आहे."
दिनेश अन्नप्पा देवाडिगा यांच्या 63 वर्षांच्या वडिलांना जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हाही शाहनवाज यांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली. मालाडच्या करवाडी भागात राहाणारे दिनेश म्हणतात की, "माझे वडील आजारी होते, कुठे मदत मिळत नव्हती ना हॉस्पिटलमध्ये जागा होती. तेव्हा मला माझ्या शेजारच्यांनी शाहनवाज यांच्याविषयी सांगितलं. 16 एप्रिलला मी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी काहीही मोबदला न मागता माझी मदत केली. आता माझ्या वडिलांना दवाखान्यात बेड मिळाला आहे. आमच्या अडचणीच्या काळात शाहनवाज भाईंनी आमची खूप मोठी मदत केली."
हारिश शेख म्हणतात की, "खूप सारे लोक सोशल मीडियावर मदतीचं आश्वासन देत असतात. पण त्यातल्या बहुतांश लोकांचे फोन बंद असतात. आम्ही जेव्हा शाहनवाज यांच्या मोबाईलवर मेसेज केला तेव्हा मला 15 मिनिटात रिप्लाय आला. ऑक्सिजनची गरज आहे असं सांगितल्यावर मला 15 मिनिटात ऑक्सिजन मिळाला."
शाहनवाज यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातल्या आजमगढमधलं असलं तरी त्यांचा जन्म मुंबईतच झाला आहे. मुंबईत ते आपली पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणीसोबत राहातात. त्यांनी कोरोना महामारीच्या आधीच युनिटी अँड डिग्निटी नावाने संस्था बनवली होती, पण या साथीच्या काळात ते गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








