SSC-HSC बोर्ड: कोरोनाकाळात करिअरच्या चिंतेवर विद्यार्थ्यांनी कशी मात करावी?

फोटो स्रोत, BBC/shahid sheikh
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
'मी अभ्यास करतो पण मन एकाग्रच होत नाही, एकीकडे कोरोना होण्याची भीती आहे तर दुसरीकडे कमी मार्क्स पडण्याची भीती.'
मुंबईतील एका विद्यार्थीने सद्यपरिस्थितीबाबत दिलेली ही प्रतिक्रिया आहे. या विद्यार्थ्याप्रमाणेच राज्यातील हजारो विद्यार्थी याच द्विधा मनस्थितीत आहेत.
"मला डॉक्टर बनायचं आहे. त्यासाठी बारावी परीक्षेसोबत नीटची एन्ट्रान्स परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण परीक्षा कधी आणि कशी होईल? त्यात कोरोनासारखा जीवघेणा आजार या सगळ्याचा विचार करून आम्ही विद्यार्थी अस्वस्थ झालो आहोत," असं बारावीची विद्यार्थिनी सुजाता अंगारखे हीने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ती पुढे सांगते, "मला खूप टेन्शन आलंय. आता आमचं काय होईल? कमी मार्क्स मिळाले तर पालक आम्हालाच ओरडतील याची भीती वाटते. त्यांची निराशा होईल असंही वाटतं. हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का याचंही टेन्शन आहे. तसं नाही झालं तर डोनेशनसाठी पैसेही नाहीत."
बारा महिने उलटले तरी राज्यातील शाळा आजही बंद आहेत. अकरावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पण दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेची काळजी वाटत आहे.
कोरोना आरोग्य संकट, बोर्डाची परीक्षा, ऑनलाईन शिक्षण, अभ्यासक्रम, एन्ट्रान्स परीक्षा अशा अनेक आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे? ते मानसिक तणावातून जात आहेत का? त्यावर उपाय म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी काय केले पाहिजे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीत पाहणार आहोत.
'आम्हाला काहीच कळत नाही'
परीक्षा जवळ आली की परीक्षेसंदर्भात एक सामान्य भीतीची भावना मनात घर करते असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. पण यावर्षीची परिस्थिती अपवादात्मक आणि आव्हानात्मक आहे.
मुंबईत राहणाऱ्या जॉनसन जेकब याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मला कळतच नाही मी काय करू? पूर्वीसारखा अभ्यास करता येत नाही. उजळणी करतो पण एकाग्रता नाही. एकीकडे कोरोना होण्याची भीती आणि दुसरीकडे मार्क्स कमी मिळण्याची. पुन्हा एन्ट्रान्स परीक्षांची तयारी करायची आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ही भावना केवळ मोजक्या काही विद्यार्थ्यांची नाही. तर अनेक विद्यार्थी सध्या तणावात असल्याचे दिसून येते.
करिअरची चिंता, शाखा कोणती निवडावी, एन्ट्रान्स परीक्षा, निकाल, पालकांच्या अपेक्षा, मार्क्स कशाच्या आधारे मिळणार? अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांना घेरले आहे.
सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थी रवीश नारंग याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सीबीएसई बोर्डाने सांगितलं आहे की परीक्षा केंद्र 50-60 टक्क्यांनी वाढवणार आहेत. पण तुम्ही पाहा डॉक्टर्स पीपीई किट वापरत आहेत तरीही त्यांना कोरोनाची लागण होत आहे. मग तुम्हाला काय वाटतं की सुरक्षित अंतर ठेऊन आम्ही कोरोनापासून दूर राहू? असं होणार नाही."
"आम्ही लहान मुलं आहोत. परीक्षा केंद्रावर गर्दी असते. मुलं एकत्र येतात. एकमेकांना भेटतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. आम्ही विनंती करत आहोत. आम्ही अत्यंत तणावात आहोत. आम्हाला आमचा जीव प्रिय आहे," असंही तो म्हणाला.
विद्यार्थ्यांचा तणाव वाढण्याची कारणं कोणती आहेत?
दहावी आणि बारावीचे वर्ष म्हणजे या मुलांसाठी टर्निंग पॉईंट समजला जातो. ते आता जे विषय, शाखा किंवा क्षेत्र निवडतील त्यावर त्यांचे करिअर अवलंबून आहे असंच त्यांना लहानपणापासून शिकवले जाते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या मनात आधीपासूनच बोर्डाच्या परीक्षांची एक भीती दिसून येते.

फोटो स्रोत, Getty Images
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "विद्यार्थी एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करत आहेत. परीक्षा होणार का, कशी होईल, निकाल कसा लागेल, आई-वडील खूष होतील का, प्रवेश मिळेल का, डोनेशन भरावे लागेल का, कोरोनाची लागण झाली तर असे असंख्य प्रश्न त्यांना विचलित करत आहेत कारण विद्यार्थी एकाच वेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत."
"जरी या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एकमेकांशी संबंधित असल्या तरीही मी विद्यार्थ्यांना सांगतो की या सगळ्या गोष्टी एकत्र करू नका. एक-एक गोष्ट सोडवा. आताच्या घडीला हातात काय आहे? सर्वप्रथम त्याचा विचार करा," असा सल्लाही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढतोय याची अनेक कारणं आहेत असं मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. तेजस्विनी कुलकर्णी सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "या काळात स्थैर्य असणं गरजेचं आहे. पण सध्या आजूबाजूला सगळीकडेच अनिश्चितता आहे आणि हीच अनिश्चितता तणावाचा कारण बनत असते."

फोटो स्रोत, BBC/shahid sheikh
त्या पुढे सांगतात, "आपल्या हातात काहीच नाही आणि आपण हतबल आहोत अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होण्याची दाट शक्यता असते. मी कितीही अभ्यास केला तरी काही उपयोग नाही असंही मुलांना वाटू शकतं आणि त्यामुळे त्यांना याचा मानसिक त्रास जास्त होऊ शकतो."
शाळा बंद असल्याने नाईलाजाने विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरसमोर बसून शिकावं लागलं. शिक्षणाची पद्धत अचानक बदलल्याने मुलांना त्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांच्या संकल्पना स्पष्ट न झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
"यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावलेला असू शकतो." असंही डॉ. तेजस्विनी कुलकर्णी सांगतात.
'भविष्याचा विचार करून आताचा वेळ वाया घालवू नका'
दरवर्षी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे लागते कारण बोर्डाची परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना त्याचे टेन्शन असतेच असं केईएम हॉस्पिटलच्या माजी अधिष्ठाता, वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पालकर सांगतात.
आम्ही पालकांना सांगतोय की मुलांना या परिस्थितीशी सामना करू द्या, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या अपवादात्मक काळातून जात आहे असंही डॉ. शुभांगी पालकर सांगतात.

फोटो स्रोत, Sunil Ghosh/Hindustan Times via Getty Images
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी विद्यार्थी आणि पालकांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
1. भविष्यात काय होईल याचा विचार या क्षणी करू नका. तुमच्या हातात या घडीला जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करा. आहे त्या वेळेत अभ्यास करा. पुढे काय होणार आहे ते कोणालाही माहिती नाही.
2. मार्क्स कमी मिळतील किंवा किती मार्क्स मिळतील हा नंतरचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या.
3. या क्षणी तुमची निष्ठा अभ्यासवर असायला हवी.
4. कोरोना काळातील हे वातावरण तुमच्यासाठी कठीण आहे याची सर्वांना कल्पना आहे. पण यातून केवळ तुम्ही एकटे जात नाहीयेत. तर जगभरातील माणसं याचा धीराने सामना करत आहेत. त्यामुळे तुम्हालाही परिस्थितीला सामोरं जावं लागेल याचं भान ठेवा.

फोटो स्रोत, Getty Images
5. पालकांनी मात्र आपल्या मुलांशी संवाद साधायला हवा. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करा.
6. विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या विषयाबद्दल भीती असेल तर ती दूर करा.
7. अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, सिनेमा, गाणी, खेळ यातही वेळ घालवा.
8. प्रत्येक वयातला माणूस या अपवादात्मक परिस्थितीतून जात आहे हे लक्षात घ्या.
9. ही परिस्थिती कोणीही कृत्रिमरीत्या तयार केलेली नाही. यापूर्वीही लोकांनी युद्ध, साथीचे आजार याचा सामना केलेला आहे.
10. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा. स्वत: ला सकारात्मक प्रश्न विचारत राहा.

फोटो स्रोत, Hindustan Times
11. तुमचा कल ज्या क्षेत्रात आहे. त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांशी बोला. ही एक चांगली सुरुवात असू शकते. भविष्याची पूर्व तयारी म्हणून तुम्हाला मदत मिळू शकते.
किशोरवयीन मुलं आणि सोशल मीडियाचा वापर
दहावी आणि बारावीचे विद्यार्थी साधारण पंधरा ते एकोणीस वयोगटातील असतात. या वयात मुलं आणि मुली दोघांमध्येही हार्मोनल बदल होत असतात. तेव्हा त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारिरिक जडण-घडणीवर होताना दिसतो असंही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. तेजस्विनी कुलकर्णी सांगतात, "आताच्या मुलांची जीवनशैली पूर्ण वेगळी आहे. त्यांच्यापर्यंत असंख्य गोष्टी वेगाने पोहचत आहेत. ही मुलं सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यात कोणती गोष्ट गांभीर्य़ाने घ्यायची आणि कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही ही समज या मुलांमध्ये नसते."
सोशल मीडियाचा वापर केवळ सकारात्मक कारणासाठीच वापरायचा आहे असा निश्चय करा असंही त्या सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
लॉकडॉऊन लागू असल्याने तसंच बाहेर कुठेही कार्यक्रमांना जाता येत नसल्याने मुलं आपला बहुतांश वेळ सोशल मीडिया किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर घालवतात. पण सतत नकारात्मक पाहिल्याने तणाव वाढू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
"सोशल मीडियावर सतत दु:खद बातमी किंवा माहिती वाचल्याने, पाहिल्याने मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. समाजातून येणारी हतबलता त्यांना दिसते. यामुळे मानसिक थकवा, एकाग्रता न राहणे, मन विचलित होणे असा त्रास मुलांना होऊ शकतो."
"एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे झोपेवरही त्याचा परिणाम होत असतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रिनसमोर राहिल्याने त्याचा झोपेवरही विपरित परिणाम होत असतो,"
यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी किमान दहा मिनिटं मेडिटेशन आणि किमान पंधरा मिनिटं व्यायाम केला तर त्यांना उत्साही वाटेल असा सल्ला त्या देतात.
'हे एक वर्ष म्हणजे आयुष्य नव्हे'
केवळ दहावी-बारावीचे विद्यार्थी नव्हे तर एकूणच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक अनिश्चितता आहे. जसं कोरोना काळात प्रत्येकाचं आयुष्य बदललं आहे, कामाची पद्धत बदलली आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीही अनेक छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या विद्यार्थ्यांना घरातून शिकत असताना वेळ मिळतोय त्यांनी या संकटातही संधी शोधली पाहिजे असं डॉ.राजेंद्र बर्वे सांगतात.
"या संकटातून आपण संधी शोधली पाहिजे. पुढचे दोन ते तीन महिने शैक्षणिक अभ्यासक्रम सोडून आणखी काय करू शकतो ते शोधा. एखादी नवीन भाषा शिका. अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. संगीत, नृत्य, चित्रकला अशा कलांचेही प्रशिक्षण घ्या किंवा यात तुमचा वेळ घालवा. घरकाम शिका त्यात पालकांना मदत करा."
"हे एक वर्ष म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे हे लक्षात घ्या. करिअर हे साधारण 30 ते 40 वर्षांचे असते. त्यामुळे एक वर्ष म्हणजे तुमचे करिअर नाही." असंही डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








