'कुंभमेळा आणि मरकजची तुलना करू नका' - तीरथसिंह रावत #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कुंभमेळा आणि मरकजची तुलना करू नका - तीरथसिंह रावत

गेल्या वर्षी तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना पसरल्याचा आरोप करण्यात येत होता. त्याचप्रमाणे यंदा कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पण कुंभमेळा आणि मरकज यांनी तुलना करू नये, असं मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी व्यक्त केलं.

कुंभमेळा एका विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत होत आहे. पण मरकज हे एका बंद इमारतीत झालं होतं, असं रावत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मरकजमध्ये परदेशातील लोक सहभागी झाले होते. इथं येत असलेले भक्त बाहेरील नव्हे तर आपलेच आहेत. मरकज झालं त्यावेळी कोरोनाविषयी जागरुकता नव्हती. तसंच कोणतीही नियमावली नव्हती. लोक त्यावेळी किती काळ बंद ठिकाणी राहिले, याबाबत काहीच माहिती नव्हती.

पण दुसरीकडे कुंभमेळा 12 वर्षांत एकदा येतो. लाखो भाविकांच्या आस्था याच्याशी जोडलेल्या आहेत. कोव्हिड-19 च्या निर्बंधांचं पालन करूनच हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे कुंभ आणि मरकज यांचा संबंध जोडण्यात येऊ नये."

ही बातमी NDTV ने दिली आहे.

2. कोरोनाच्या परिस्थितीवरून सोनिया गांधी यांचं नरेंद्र मोदींना पत्र

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे असल्याचं सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.

लसीकरण मोहिम परिणामकारक पद्धतीने राबवण्यासाठी योग्य धोरण गरजेचं असल्याचं मत यावेळी गांधी यांनी व्यक्त केलं.

बहुतांश राज्यांत 3 ते 5 दिवस पुरेल इतकाच लससाठा शिल्लक आहे. लसीकरण आपली सर्वात मोठी आशा आहे.

देशांतर्गत लस उत्पादन क्षमता वाढवणं आवश्यक असताना अजिबात वेळ न दवडता आवश्यक परवानग्या असलेल्या सर्व उमेदवारांना आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात यावी, असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन - नितेश राणे

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'ब्रेक द चेन' मोहीम राबवण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्यात कलम 144 लागू करून 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

कोरोनाची साखळी तोडा नव्हे तर तुमचा मेंदू तपासा अशी टीका राणे यांनी केली. हे निर्बंध जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांना चांगलं वाटत असेल, असं राणे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

4. लवकरच जॉन्सन, फाझर, मॉडर्नाच्या लशी भारतात उपलब्ध

कोणत्याही लशीला अमेरिका, जपान किंवा युरोपीय संघाच्या नियामकांकडून किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली असेल तर तिला भारतात ट्रायलची गरज नाही.

फक्त सात दिवस तिच्या परिणामांवर लक्ष ठेवलं जाईल, जॉन्सन, फायजर आणि मॉडर्ना या लस उत्पादक कंपन्यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं आहे, या लशी लवकरच भारतात उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नीति आयोगाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पॉल बोलत होते.

सध्या देशात लसीकरण उत्सव साजरा होत आहे. देशात जवळपास 71 हजार लसीकरण केंद्रांवर काम केलं जात आहे. भारतात स्पुटनिक या तिसऱ्या लशीला नुकतीच मंजुरी देण्यात आली. या लशीची चाचणी 30 हजार जणांवर झाली, असं पॉल यांनी सांगितलं.

देशात लशींची टंचाई नाही. मोठ्या राज्यांना पुरेल एवढ्या लशींचा बॅकअप देण्यात आला आहे, असंही पॉल म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.

5. केंद्र सरकारने सर्वांना समान वागणूक द्यावी - यशोमती ठाकूर

राज्यात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद झाल्याच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने सर्वांना समान वागणूक द्यावी, सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.

लस महोत्सव साजरा करा, केंद्र सरकार म्हणत आहे. पण अमरावतीत लस उपलब्ध नाही, लस महोत्सवात अमरावतीचे सेंटर बंद आहे. केवळ दोन दिवस पुरेल इतकी लस अमरावतीत उपलब्ध आहे, असं ठाकूर म्हणाल्या. ही बातमी ई टीव्ही भारतने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)