स्टिंगर मिसाईल : अमेरिकेच्या या घातक शस्त्राने अफणागिस्तानातल्या रशियन सैन्याला उद्धवस्त केलं होतं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, उमर फारूख
- Role, संरक्षण तज्ज्ञ, बीबीसी उर्दूसाठी
गफ्फारने आपल्या हल्लेखोरांच्या तीन टीम एकमेकांपासून काही अंतरावर त्रिकोणी रचनेत उभं केलं होतं. त्यांना प्रशिक्षणच असंच दिलं होतं. बराच वेळापासून ते घातपात करण्याची वाट पाहात होते.
थोड्याच वेळात त्यांना रशियन MI-24 हेलिकॉप्टर्स येताना दिसली. गफ्फारच्या टीमच्या एका सदस्याने हेलिकॉप्टरवर नेम धरून ट्रिगर दाबला. पण मिसाईल हेलिकॉप्टरवर आदळण्याऐवजी फक्त 300 मीटर लांब जाऊन जमिनीवर पडलं. गफ्फरची टीम चक्रावून गेली.
मुजाहिदीनांना प्रशिक्षण देणाऱ्या पाकिस्तानचे सेवानिवृत्त कर्नल महमूद गाजी यांच्यामते हे ऑपरेशन फसलं होतं पण या क्षेपणास्त्राचे प्रतिध्वनी अफगाणिस्तानातल्या सैन्य तळांवरच नाही तर पूर्ण जगात ऐकायला आले.
अफगाणिस्तानातल्या युद्धग्रस्त भागात सोव्हियत वायूसेनेच्या विरोधात 'स्टिंगर मिसाईल' वापरलं गेल्याचं हे पहिलं उदाहरण होतं. यानंतर जलालाबाद आणि काबूल शहरात आणि आसपासच्या भागात हवाई वाहतूक थांबवली गेली होती.
अमेरिकेने बनवलेल्या स्टिंगर मिसाईल्स संचलित आणि सांभाळण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने सगळ्यात आधी दोन मुजाहिदीन कमांडरांना प्रशिक्षित केलं होतं. यापैकी एक होते नंगरहारचे गफ्फार आणि दुसरे काबुलचे दरवेश. हे दोघं गुलाबुद्दीन हिकमतयारच्या हिज्ब-ए-इस्लामी गटाशी संबंधित होते.
दोघांना रशियन भाषा येत होती. याशिवाय ते उर्दू आणि पश्तू भाषा अस्खलित बोलू शकत. या दोन्ही बंडखोर नेत्यांना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडी या दोन शहरांना जोडणाऱ्या फैजाबादच्या कँपमध्ये दोन आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं होतं. प्रशिक्षणानंतर दोघांनाही जलालाबाद विमानतळाच्या दिशेने पाठवलं होतं.
आयएसआयच्या स्टिंगर ट्रेनिंग स्कूलचे तत्कालीन प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षिक निवृत्त कर्नल महमूद अहमद गाजी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "तो सप्टेंबर 1986 चा दिवस होता. गफ्फार आपल्या टीमसोबत जलालाबाद विमानतळाच्या उत्तर पूर्व दिशेला टेकडीवरच्या झाडांमध्ये आणि खडकांमध्ये दबा धरून बसले होते.
काय होतं हे स्टिंगर क्षेपणास्त्र?
अमेरिकेतल्या शस्त्रास्त्र उद्योगाचं हे एक उत्पादन होतं. अफगाणिस्तान युद्धात या क्षेपणास्त्राच्या वापराने रशियन वायूसेनेला हवालदिल केलं होतं. स्टिंगर येण्याआधी मुजाहिदीन सैन्याला फार कमी वेळा यश मिळत होतं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अफगाणिस्तानात रशियन सैन्याच्या पराभवाचं मूळ कारण स्टिंगर्सच होते.
निवृत्त कर्नल महमूद अहमद गाजी अफगाणिस्तानातल्या मुजाहिदीनांना ट्रेनिंग देण्यासाठी स्थापन केलेल्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख होते. ते पाकिस्तातल्या वायूसेना रेजिमेंटमधले एक अधिकारी होते. त्यांना स्टिंगर मिसाईलच्या ट्रेनिंगसाठी वॉशिंग्टन डीसीला पाठवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानात लढणाऱ्या मुजाहिदीन गटांना स्टिंगर चालवण्यासाठी प्रशिक्षित करून त्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या वायूसेनेची शक्ती संपवून टाकणं हा त्यांना अमेरिकेत पाठवण्याचा मुख्य उद्देश होता.
अफगाणिस्तानमध्ये रशियन वायूसेनेच्या विरोधात स्टिंगर मिसाईल्स प्रभावी ठरले. हे क्षेपणास्त्र अफगाणिस्तानात आल्यानंतर रशियन सैन्याने आपली लढाऊ विमान या लढाईत वापरायला सुरुवात केली.
स्टिंगर्स यायच्या आधी अफगाणिस्तानात रशियन आणि अफगाणी फौजांना विरोधातल्या वायूसेनेचा सामना करावा लागत नव्हता. म्हणूनच बहुतांश रशियन हेलिकॉप्टर्सचा वापर ग्रामीण भागात अफगाण मुजाहिदीनांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी केला जायचा.
अहमद गाजी यांनी आपलं पुस्तक 'अफगाण वॉर अँड स्टिंगर सागा' मध्ये लिहिलं आहे की, "1986 मध्ये 36 लॉन्चर आणि 154 स्टिंगर क्षेपणास्त्र अफगाणिस्तानात पाठवले होते. यातले 37 स्टिंगर डागले गेले ज्यामुळे 26 रशियन विमानं पाडण्यात आली."
1989 पर्यंत अफगाणिस्तान युद्धात स्टिंगर क्षेपणास्त्रांचा वापर वाढत गेला. आपल्या लक्ष्यावर हल्ला करायची त्यांची क्षमता अधिक अचूक होत गेली आणि शेवटी रशियन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी गेलं.
आयएसआयचं स्टिंगर प्रशिक्षण केंद्र 1993 पर्यंत सक्रिय होतं. त्या दरम्यान पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांचं लक्षही या केंद्राकडे होतं. तत्कालीन दोन पंतप्रधानांनी, मोहम्मद खान जुनेजो आणि नंतर बेनझीर भुत्तो यांनी या केंद्राचा दौरा केला होता.
कर्नल गाजी आपल्या पुस्तकात लिहितात की मुख्य अमेरिकन राजकीय नेते आणि सीआयएचे अधिकारी या केंद्राला नेहमीच भेट द्यायचे.
ओजडी शिबीर अपघात
कर्नल गाजी एका सहकारी अधिकाऱ्याबरोबर फैजाबादच्या ओजडी शिबिरात गेले असताना त्यांनी एक सहकाऱ्याला चिंताग्रस्त मनस्थितीत कोणाला तरी फोन लावताना पाहिलं.
हा दिवस होता 10 एप्रिल 1988 आणि सकाळचे 10 वाजले होते. ओजडी शिबिर म्हणजे पाकिस्तानाची गुप्तहेर आयएसआयचं सुनसान भागातलं ऑफिस होतं. यातच अफगाण डेस्कचं फिल्ड ऑफिस होतं. या भलमोठ्या परिसरात शस्त्रांस्त्रांचं गोदमही होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कर्नल महमूद गाजींनी नंतर आपल्या पुस्तकात लिहिलं की, "फिल्डफोनचा वापर करणारे अधिकारी चिंताग्रस्त दिसत होते. कारण त्यांना शस्त्रास्त्रांच्या गोदामातून काही उत्तर मिळत नव्हतं. तिथून प्रतिसाद न येणं म्हणजे काहीतरी मोठी गडबड होती. फोन करणाऱ्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की त्यांनी दारूगोळ्यांच्या गोदामात झालेल्या मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकला होता. अफगाण डेस्कचे प्रमुख ब्रिगेडियर अफजल जंजुआ आणि कर्नल इमाम (अफगाण मुजाहिदीनचे प्रशिक्षक) यांच्यासोबत अनेक अधिकारी गोदामाकडे धावले.
"हे गोदाम अफगाण डेस्कपासून फक्त 200 मीटर अंतरावर होतं. ओजडी कँपातले काही अधिकारी दारूगोळ्याने भरलेले ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या लक्षात आलं की कोणत्याही क्षणी आता प्रचंड मोठा स्फोट होऊ शकतो.
"हे ट्रक चालवणाऱ्या ड्रायव्हर्सनी गेटवर गाड्या आणल्या खऱ्या, पण गेट बंद असल्याचं पाहून घाबरून गेले. गेटवरच्या सुरक्षारक्षकांना कळलं होतं की काहीतरी गडबड झालीये, त्यामुळे खबरदारीच्या नियमांप्रमाणे सगळी फाटकं बंद करून टाकली होती. पण दुसरे एक अधिकारी रफाकत त्या दारूगोळ्याच्या दहा ट्रकला सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात यशस्वी ठरले."
त्या प्रसंगाचं वर्णन करताना कर्नल गाजींनी म्हटलं आहे की तिथे फार भयानक दृश्य दिसत होतं. दारूगोळ्याचं गोदाम, ज्यात ठासून ठासून दारूगोळा भरला होता, आगीच्या ज्वाळांनी वेढलं होतं. गोदामात कोणताही माणूस नव्हता त्यामुळे साहजिक आहे कोणी आग विझवण्याचा प्रयत्न करत नव्हतं. "असं वाटलं की जी माणसं तिथे आधी होती त्यांनी चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिलं होतं. आगीला नियंत्रणात आणण्याऐवजी ते लोक प्रथमोपचार आणि जखमी लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. प्रशिक्षण आणि अनुभव कमी असल्याचं हे एक उदाहरण होतं."
ते लिहितात, "आम्ही मुश्किलीने 'जागा रिकामी करा' ओरडतच होतो की एक मोठा स्फोट झाला."
33 वर्षांपूर्वी रावळपिंडी आणि इस्लामाबादच्या मध्यात असलेल्या आयएसआयच्या फील्ड ऑफिसपैकी एक असणाऱ्या ओजडी कँपात झालेल्या या स्फोटामुळे रॉकेट, क्षेपणास्त्र आणि इतर अनेक प्रकारच्या दारूगोळ्याचा पाऊस आसपासच्या रहिवाशी आणि व्यापारी क्षेत्रावर बरसला. या स्फोटाच्या भयावह आठवणी अजूनही इथल्या लोकांच्या मनात ताज्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानतलं युद्ध भरात होतं. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएच्या मदतीने अफगाणिस्तानमधल्या बंडखोरांना शस्त्रास्त्र, दारू-गोळा, प्रशिक्षण आणि पैसा पुरवत होती. ओजडी शिबीरात हा दारूगोळा साठवलेला होता.
कर्नल गाजींच्या पुस्तकात उल्लेख आहे की, या इस्लामबाद आणि रावळपिंडी या दोन शहरांच्या संगमावार नागरी भागात मधोमध दारूगोळ्याचं भांडार उभं करण्याचा निर्णय आयएसआयचे तत्कालीन महानिदेशक लेफ्टनंट जनरल अख्तर अब्दुल रहमान यांचा होता.
गाजींच्या मते जनरल रहमान यांनी आयएसआयमध्ये हा समज पसरवायचा प्रयत्न केला की ओजडी कँपमध्ये झालेला स्फोट जाणूनबुजून आयएसआयचं खच्चीकरण करण्यासाठी केला होता म्हणजे दोन शहरांच्या मधोमध असा कँप का बनवला यावरून त्यांच्यावर होणारी टीका थांबेल आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे जाईल.
ते लिहितात, "सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र मिळून जवळपास 10 हजार टन दारूगोळा हवेत उडत होता. स्टिंगर उडत होते, हजारो रॉकेट्स, अँटी-माईन्स, रिकॉइल्स, रायफल्स, लहान तोफगोळे, हलक्या हत्यारांच्या लाखो गोळ्या कहर करत होते. वेड्यांचं इस्पितळ झालं होतं ते."
कर्नल गाजींनुसार या स्फोटात अनेक आयएसआय अधिकारी, एक डझनाहून अधिक मुजाहिदीन प्रशिक्षणार्थी मारले गेले होते.
त्यावेळेस असा समज होता की या कँपमध्ये झालेल्या स्फोटात रशियाचा हात होता. अफगाणिस्तानला स्टिंगर मिसाईल एकतर उशिरा मिळावेत किंवा मिळूच नये असा हा त्यांचा हेतू होता. पण कर्नल गाजी एक वेगळीच कहाणी सांगतात.
अफवा, षड्यंत्राच्या कथा आणि सत्य
कर्नल गाजी म्हणतात की ते या परिसरात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी बोलले. ते लिहितात, "जनरल रहमान यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की ही कारवाई जाणूनबुजून केली गेली आहे कारण आपल्याकडे जितका दारूगोळा होता तेवढा सगळा कामाचा होता आणि गेल्या 7 वर्षांत कधी अशी घटना घडली नव्हती. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर दारूगोळा साठवावा हा जनरल अख्तर यांचा निर्णय होता."
"कम्युनिकेश विभाग सांभळणाऱ्या आमच्या कितीतरी माणसांनी या दारूगोळ्याच्या गोदामाला हरकत घेतली होती. पण जनरल अख्तर यांनी सगळ्या हरकती फेटाळून लावल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांच्या प्राथमिकता फार वेगळ्या होत्या.
आयएसआय आणि सैन्यात थोडासा तणाव होता. काही लोक या स्फोटाला मुद्दाम केलेला हल्ला म्हणत होते आणि काही लोक याला अपघात म्हणत होते. पण जनरल अख्तर टीकेचा रोख दुसरीकडे वळवू इच्छित होते कारण शहरात एवढं मोठं गोदाम उभं करण्याचा निर्णय त्यांचा होता. त्यांच्यावर सतत टीका होत होती. जनरल झिया यांनी त्या संध्याकाळी अपघातग्रस्त भागाचा दौरा केला तेव्हा त्यांचंही तेच म्हणण होतं."

फोटो स्रोत, Getty Images
षड्यंत्राच्या वावड्या उठत होत्या. त्यातली एक वावडी अशी होती की कदाचित कोणत्या अफगाण मुजाहिदीनने काही स्टिंगर क्षेपणास्त्र चोरून इराणला विकले होते. पण काही लोकांचं म्हणणं होतं की पाकिस्तानच्या सैन्यातल्याच लोकांचं हे काम होतं कारण अमेरिकच्या सैन्य तज्ज्ञांची टीम स्टिंगर क्षेपणास्त्रांची तपासणी करायला या कँपला भेट देणार होती.
कर्नल गाजी या वावड्यांविषयी तर आपल्या पुस्तकात काही लिहित नाहीत पण ते या अपघातबद्दल सांगतात.
सगळ्यात आधी तर ते आयएसआयच्या अफगाण डेस्कमध्ये स्टिंगर क्षेपणास्त्र किती होती याचा हिशोब देतात. ते लिहितात, "पाकिस्तानला अमेरिकेकडून एकूण 487 लॉन्चर्स आणि 2288 स्टिंगर क्षेपणास्त्र मिळाले होते. यातले ओजडी अपघातात 122 लॉन्चर आणि 281 क्षेपणास्त्र नष्ट झाले. यानंतर आमच्याकडे फक्त 365 लॉन्चर आणि 2007 क्षेपणास्त्र राहिले. यातल्या 336 लॉन्चर आणि 1969 क्षेपणास्त्रांचा वापर मुजाहिजीनांनी केला आणि उरलेले आम्ही अमेरिकेला परत दिले."
कदाचित या स्पष्टीकरणाने कर्नल गाझी त्या अफवेचं खंडन करू पाहातात ज्यात म्हटलं होतं की आयएसआयमधल्या कोणीतरी स्टिंगर इराणला विकलं होते.
गाजींच्या पुस्तकात इराणचाही उल्लेख आहे. 1987 साली घडलेल्या एका घटनेबद्दल त्यांनी सांगितलं आहे. मुजाहिदीनचे कमांडर यूनुस खालिस हेलमंद नदीच्या काठावरून प्रवास करताना रस्ता चुकले आणि चुकून इराणच्या हद्दीत गेले. यानंतर इराणी सैन्याने त्यांना पकडलं होतं आणि त्यांच्याकडचे स्टिंगर मिसाईल जप्त केले होते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यावर दबाव टाकला पण असं असतानाही इराणी सरकारने मिसाईल परत द्यायला नकार दिला.
"त्याच वर्षी (1987) पुन्हा एकदा खालिसचा एक कमांडर (ज्याला 4 लॉन्चर आणि 16 स्टिंगर दिले होते) हेलमंद प्रांतातून वाहाणाऱ्या हेलमंद नदीचा प्रवाह तीव्र असल्याने इराणमार्गे गेला. खरंतर त्यांना असं करायला सक्त मनाई होती. इराणमार्गे जाताना सगळ्या गार्ड्सला इराणने पकडलं. ती शेवटीची वेळ होती जेव्हा आम्ही स्टिंगर आणि लॉन्चर्स पाहिले. इराणने मुजाहिदीन परत पाठवले पण स्टिंगर आणि लॉन्चर्स परत दिले नाहीत."
मुजाहिदीन कमांडर्स आणि त्यांच्या साथीदारांना पाकिस्तानात आणलं गेलं. आयएसआय आणि सीआयए दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. त्यांची लाय डिटेक्टर टेस्टही केली. पण कर्नल गाजी लिहितात की सीआयएने आपल्या निष्कर्षांविषयी आयएसआयला सांगितलं नाही.
अफगाणिस्तान युद्धातलं निर्णायक शस्त्र
5 जुलै 1989 ला वॉशिंग्टन पोस्टने अमेरिकन सैन्याबद्दल झालेल्या एका विशेष अभ्यासाबद्दल एक रिपोर्ट प्रकाशित केला. यात असं म्हटलं होतं की अमेरिकेच्या स्टिंगर क्षेपणास्त्रांमुळे अफगाण युद्धाचं चित्र बदलायला मदत झाली होती.
या अभ्यासानुसार अफगाणिस्तानात रशियाच्या विरोधात लढणाऱ्या अफगाण मुजाहिदीनांनी या शस्त्राच्या मदतीने 'युद्धाची दिशा बदलली आणि ही क्षेपणास्त्र अफगाण युद्धातली निर्णायक हत्यारं ठरली.'
या रिपोर्टनुसार मुजाहिदीनांनी 340 क्षेपणास्त्र डागली, ज्यांनी 269 रशियन विमान पाडली. अमेरिकन मानकांच्या तुलनेत ही कामगिरी कितीतरी पट अधिक उजवी होती. आपल्या लक्ष्यावर बरोबर नेम साधण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता 79 टक्के इतकी होती.
या अभ्यासात अफगाण युद्धाच्या शेवटच्या तीन वर्षांचं विश्लेषण केलं होतं. सप्टेंबर 1986 मध्ये सुरू झालेल्या या युद्धात स्टिंगरमुळे रशिया आणि अफगाणिस्तानच्या युद्धनीतीत काय बदल झाले आणि याचे काय परिणाम झाले हे अभ्यासणं या संशोधनाचं उदिष्ट होतं. विमानाच्या इंधनाचा वास घेत त्याचा माग काढून त्यावर हल्ला करणाऱ्या या शस्त्राने युद्धाची दिशा तर बदललीच पण पहिलं क्षेपणास्त्र डागल्यानंतर महिनाभराच्या आत रशियाचे हवाई हल्ले बंद झाले.
'वॉशिंग्टन पोस्ट'ला मिळालेल्या कागदपत्रांच्या सारांशानुसार, "स्टिंगर येण्याआधी फक्त रशियाचे स्थिर आणि गतीमान पंख्यांची लढाऊ विमानंच रोज जिंकायची. सोव्हियत-अफगाण हवाई लढाई प्रभावी ठरायची नाही. सैन्याला रसद पुरवणाऱ्या विमानांच्या येण्याजाण्यातही कोणताही अडथळ नव्हता. पण सप्टेंबर 1986 नंतर युद्धाची दिशा बदलली."
या रिपोर्टमधल्या एका संदर्भानुसार, "संरक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी युद्धाचे आकडे खात्रीलायक असण्यावर संशय व्यक्त केला होता. कारण ज्या मुजाहिदीनांचा इंटरव्ह्यू केला होता त्यांनी आपल्या क्षमतेविषयी वाढवून-चढवून दावे केले असण्याची शक्यता होती. त्यामुळे कदाचित त्यांना क्षेपणास्त्र डागून पाडलेल्या रशियन विमानांची संख्या खरी सांगितलेली नसावी."
"या व्यतिरिक्त डागलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या 340 सांगितली गेली होती जी सप्टेंबर 1986 ते फेब्रुवारी 1988 या युद्धकाळात पाठवलेल्या जवळपास 1000 क्षेपणास्त्रांच्या तुलनेत कमी होती."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








