कोरोना: महाराष्ट्राला लशी द्या, नाही तर सीरममधून एकही ट्रक बाहेर पडू देणार नाही - राजू शेट्टी #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) महाराष्ट्राला लशी द्या, नाहीतर सीरममधून एकही ट्रक बाहेर पडू देणार नाही - राजू शेट्टी

कोरोनाचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात असतानाच, लसीकरणही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. केंद्राकडून कमी प्रमाणात लस मिळत असल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील लशींचा तुटवडा लक्षात घेऊन, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. जर महाराष्ट्राला येत्या आठ दिवसात पुरेशा लशी दिल्या नाहीत, तर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून महाराष्ट्राबाहेर लशींच्या गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

राजू शेट्टी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून म्हटलंय की, "महाराष्ट्राला लवकरात लवकर लशींचा पुरवठा करण्यात यावा. जर आठ दिवसांत महाराष्ट्राला लशींचा वाढीव पुरवठा मिळाला नाही, तर आम्ही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून एकही गाडी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही."

दुसरीकडे, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातूनही केंद्र सरकारवर लशीच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आलीय.

"महाराष्ट्रात कोरोनावरील लशीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आणि यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत लशीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे," असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

2) फडणवीस चालू देतील तोपर्यंतच ठाकरे सरकार चालेल - रामदास आठवले

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचं भवितव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे सरकार चालू देतील तोपर्यंतच हे सरकार चालेल, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. ते पुण्यातील इंदापूर येथील शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

यावेळी रामदास आठवले यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सचिन वाझे प्रकरणावर बोलताना आठवले म्हणाले, "सचिन वाझे यांनी जे काही कृत्य केले आहे त्याने देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे."

"देशातील एकूण करोना रुग्णांपैकी 60 ते 65 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाही ढासळली आहे. त्यामुळे राज्यातलं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. याबाबत आपण राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं," अशीही माहिती आठवलेंनी यावेळी दिली.

3) आमदारांचा निधी 2 कोटींनी कमी करा आणि तो कामगारांना द्या - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिले. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सूचवलं की, आमदारांचा निधी 2 कोटींनी कमी करा आणि तो कामगारांना द्या.

"राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या," असं चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सूचवलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

या बैठकीत सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीवर चर्चा केली.

"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मधला मार्ग काढावा, मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त दोन ते तीन लोकांनी माहिती द्यावी, जास्त लोक बोलत राहिले तर लोकांचं कन्फ्युजन होतं," असा मुद्दा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मांडला आहे.

4) परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे गृह विभागाकडून आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप आणि सर्वोच्च, उच्च न्यायालयात राज्य सरकारला प्रतिवादी करणे, ही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची कृती अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियमांचा भंग आहे का, याबाबत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश गृहविभागाने पोलीस महासंचालकांना जारी केले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

ही चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे करणार आहेत. आवश्यक त्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे, त्यासाठी नोटीस जारी करणे आणि त्यांचे जबाब नोंदवण्याचे अधिकार गृह विभागाने पांडे यांना प्रदान केले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातील गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसंच, या पत्रामुळे महाराष्ट्राचं राजकारणही ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता गृह विभागानं सुरू केलेल्या या चौकशीतून काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

5) उत्तर प्रदेशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

उत्तर प्रदेशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ दिसून आली. काल (10 एप्रिल) एकाच दिवसात तब्बल 12 हजार 787 नवे रुग्ण आढळले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आकडेवारीवरून दिसून येतो. काल दिवसभरात एकट्या लखनौमध्ये 4 हजार 59 नवे रुग्ण आढळले.

तसंच, उत्तर प्रदेशात काल कोरोनानं झालेल्या 48 मृत्यूंपैकी एकट्या लखनऊमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशात आजच्या घडीला 58 हजार 799 कोरोनाग्रस्त आहेत. उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)