MPSC : 'नुसता भात खाऊन, कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थी तयारी करत आहेत'

फोटो स्रोत, BBC/RAHUL RANSUBHE
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
'''नव्या निर्बंधांमुळे मेस 6 वाजताच बंद होतात. अनेक मेसचा डबा 6 वाजता डबा तयार होत नाही. त्यात 6 नंतर संचारबंदी असल्याने डबा घ्यायला विद्यार्थ्यांना जाता येत नाही. सर्वप्रकारची दुकाने बंद असल्याने चहा नाश्ता मिळणे देखील विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. विद्यार्थी नुसता भात खाऊन दिवस काढत आहेत,'' पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मनीषा सानप यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
11 एप्रिल रोजी पी.एस.आय, सहाय्यक विक्रीकर अधिकारी, मंत्रालय सह्ययक या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा आहे. ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी काही काही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे, तर परीक्षा वेळापत्रकानुसार व्हावी यावरही काही विद्यार्थी ठाम आहेत.
पण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुणेसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाली. यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढली.
विद्यार्थ्यांना लक्षणं असून ते कोरोना चाचणी करत नसल्याचं विद्यार्थी सांगतात. कारण रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर परीक्षा देता येणार नाही. म्हणून विद्यार्थी कोरोनाची चाचणी करून घेत नाहीत आणि संसर्ग वाढतो अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली.
एकीकडे जेवणाचे हाल तर दुसरीकडे कोरोनाचा धोका
एकीकडे सरकारने निर्बंध लावल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत तर दुसरीकडे अनेक विद्यार्थी कोरोनाबाधित होत असल्याने आपल्याला कोरोना झाला तर काय? अशी भीती देखील मुलांच्या मनात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
''परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असायला हवं. वाढत्या कोरोनामुळे मुलांच्या मनात भीती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणं आहेत परंतु रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पेपर देता येणार नाही म्हणून ही मुलं चाचणी करत नाहीत. हेच विद्यार्थी परिक्षेला गेले तर संसर्ग वाढेल. त्यात शासनाने शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला जाणार कसे? असाही प्रश्न आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आणि निर्बंधामुळे पेपर पुढे ढकलायला हवा,'' अशी मागणी मनिषा यांनी केली आहे.
नारायण पेठेत मैत्रिणीसोबत राहणारी रसिका माळमुले सध्या रुमवरच जेवण तयार करते. निर्बंधांमुळे डबा वेळेवर मिळत नाहीत तर हॉटेलमधून पार्सल घेणे परवडत नसल्याचं ती सांगते.
''अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्याने आता जर पुढे गेली तर कधी होईल हे सांगता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्याय देखील नाही त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थी पुण्यात राहतात. त्यामुळे काहीही झालं तरी ही परीक्षा व्हावी असे अनेकांना वाटतं. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या मैत्रिणीला श्वास घ्यायला त्रास झाल्याने तिची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. एकीकडे परीक्षेचं टेन्शन तर दुसरीकडे कोरोनाची भीती त्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडत आहे,'' असंही रसिका यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण का होत आहे?
एकाच खोलीत अनेक विद्यार्थी राहत असल्याने एकाला कोरोनाची लागणी झाली तर त्याचा संसर्ग इतर मुलांना होत आहे. त्यातच परीक्षा देता यावी यासाठी विद्यार्थी लक्षणं दिसत असताना चाचणी न करता काही औषधं घेऊन अभ्यास करत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे.

लॉकडाऊनच्या भीतीने गावी गेलेल्या अजित मालवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, ''मागच्या लॉकडाऊनमध्ये हाल झाल्याने आता मी गावी निघून आलो. जेवणाचे पुण्यात हाल होऊ लागले. त्यात अभ्यासिकेसाठी देखील निर्बंध वाढविण्यात आले आहेत.
पुण्यात मित्रांसोबत एकत्र राहत होतो. अनेक मुलांना कोरोनाची लक्षणं आहेत. मला देखील सर्दी झाली होती. पंधरा दिवस झाले तरी अजून चव येत नाही. अनेक विद्यार्थी परीक्षेची ही संधी आपल्य हातातून जाऊ नये म्हणून आजारपण अंगावर काढून अभ्यास करत आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आली तर क्वारंटाईन व्हावं लागेल म्हणून विद्यार्थी चाचणी करुन घेत नाहीत.''
एमपीएससीचे विद्यार्थी काय म्हणतात?
पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महेश घरबुडे यांना ही परीक्षा पुढे ढकलावी असं वाटतं आहे. कारण अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने परीक्षा देता येणार नाहीये असं ते सांगतात.
ते पुढे सांगतात, "परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. आंदोलनात आम्हीही सहभागी होतो पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती अधिक गंभीर आहे आणि रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. अनेक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचार घेत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे घेण्याची विनंती आम्ही करत आहोत."
दुसरीकडे परीक्षा झाली नाही तर विद्यार्थी पुण्यातच एकत्र राहतील आणि त्यातून पुन्हा संसर्ग वाढेल, असं नितीन मेटे या विद्यार्थ्याला वाटते. त्यामुळे परीक्षा झाली तर विद्यार्थी आपआपल्या घरी जातील आणि संसर्ग कमी होईल, असंही ते सांगतात.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी का होतेय?
MPSC समन्वय समितीने 1 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील एक पत्र त्यांनी प्रसिद्ध केलं.
समितीचे सदस्य राहुल कवठेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असून सुद्धा टेस्ट करत नाहीत. आपल्या डॉक्टर मित्र मैत्रिणींकडून पेन किलर गोळ्या घेऊन दिवस काढत आहेत. अनेकांच्या घरचे कोरोनामुळे आजारी आहे. म्हणूनच हा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहोत."
ते पुढे सांगतात, "गेल्या महिन्यात पुण्यातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे खरंतर केसेस वाढल्या असाव्यात. हे आंदोलन चुकीचं होतं. पण आता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आम्ही अनेक मंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही आमच्या आंदोलनाची आठवण करून दिली. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही."
काय काळजी घ्यावी?
कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यास केवळ परीक्षेच्या संधीला आपण मुकणार म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी चाचणी करण्यास टाळाटाळ करू नये असे आवाहन आरोग्य अधिकारीही करत आहेत.
"विद्यार्थ्यांना लक्षणं असतील तर त्यांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. एक बाधित विद्यार्थी अनेकांना संसर्ग पसरवू शकतो. त्यातच लक्षणे असताना अंगावर काढल्याने इन्फेक्शन वाढल्यास जीवही धोक्या येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेपेक्षा आरोग्याकडे अधिल लक्ष देणं गरजेचं आहे," असं नायडू हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता चंदनशिव यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








