कोरोना लस : आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लस नोंदणी थांबवली; केंद्राचे निर्देश

फोटो स्रोत, NurPhoto
आरोग्य आणि संलग्न क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लशीसाठी नोंदणी करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "45वयापेक्षा अधिक व्यक्तींना लशीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. को-विन पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू राहील. याआधीच लशीसाठी नोंदणी केलेल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकर लवकर लस मिळेल याची दक्षता घ्या अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत."
16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना 2 फेब्रुवारीपासून लस देणं सुरू झालं. लशीकरणाचा पुढचा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला. या टप्प्यात 60 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये 45 पेक्षा अधिक वय आणि सहव्याधी असलेल्यांनी समाविष्ट करण्यात आलं होतं.
आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी कोरोना रुग्णांना आजारातून बरं करण्याचं काम करतात. त्यांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. हे लक्षात घेऊन पहिल्या तसंच दुसऱ्या टप्प्यात आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
भूषण कुमार यांनी लिहिलं आहे की, "राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याशी समन्वय साधून या मंडळींना लस मिळेल यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या. या क्षेत्रातील अधिकाअधिक कर्मचाऱ्यांना लस मिळावी यासाठी निर्धारित तारीख वेळोवेळी पुढे ढकलण्यात आली. 25 फेब्रुवारी ही आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी 6मार्च तारीख ठरवण्यात आली."
या निर्धारित तारखांना महिनाभराचा काळ उलटून गेला आहे. साठ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या व्यक्तींना लस देण्याचा टप्पा सुरू झाल्यानंतरही आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली याकडे भूषण कुमार यांनी लक्ष वेधलं.

फोटो स्रोत, AFP
लशीकरण केंद्रांकडून मिळणाऱ्या फीडबॅकनुसार यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांसाठी आवश्यक निकष पूर्ण न केलेले लोक लशीसाठी नोंदणी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे नियमांचं उल्लंघन होत आहे असं भूषण यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसात लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भात राज्यांचे प्रतिनिधी आणि याविषयातील तज्ज्ञांशी बैठकीत चर्चा झाली. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड19ने केलेल्या शिफारशीनुसार, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लशीची नोंदणी तूर्तास थांबवण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने ही नोंदणी थांबवण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं. 45वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोविन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.
या निर्णयाची अंमलबजावणी सर्व स्तरावर व्हावी यासाठी दक्षता घेण्यात यावी असे निर्देश भूषण कुमार यांनी दिले आहेत. दरम्यान याआधीच नोंदणी झालेल्या आरोग्य तसंच अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लस मिळेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








