नरेंद्र मोदी यांचा फोटो तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमधून गायब का आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू प्रचार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

निवडणुका म्हटलं की शहरांमध्ये होर्डिंग्ज आणि पोस्टर्स ढिगानं दिसतात. पण सध्या तामिळनाडू निवडणुकांमध्ये चेन्नई शहर मात्र त्याला अपवाद ठरतंय.

असं नाहीये की इथले पक्ष बॅनरबाजी करतच नाहीत. खरंतर इथं अशी एकवेळ होती की बॅनरबाजीत इथल्या पक्षांचा हात भारतातले इतर कुठलेही पक्ष धरू शकत नव्हते. पण कोर्टाच्या एका ऑर्डरनंतर मात्र इथली स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता चेन्नईत कुठेही अनधिकृत होर्डिंगबाजी दिसत नाही.

पण एवढंच कशाला कमर्शिल होर्डिंग्जवरूनही पक्षांच्या जाहिराती गायब आहेत. त्या गायब का आहेत याची चर्चा आपण करूच. पण त्याआधी देशातल्या सर्व निवडणुकांच्या केंद्रस्थानी दिसणारा एक चेहरासुद्धा इथं बऱ्यापैकी गायब आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

देशभरात कुठेही निवडणुका असल्या तरी भाजपचा मुख्य चेहरा असतो तो नरेंद्र मोदींचाच. त्याला जोड असते ती आक्रमक प्रचाराची. मग उपलब्ध सर्व प्रचार माध्यमांचा वापर भाजप करताना दिसते. बऱ्याचदा निवडणुका असलेल्या शहरांमधले होर्डिंग आणि वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांच्या जाहिरातींचं बुकिंग भाजपकडून अगोदरच केलं जातं.

अगदी तामिळनाडूच्या शेजारच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्येसुद्धा भाजपनं मोदींच्या नावाचा आणि फोटोचा पूर्णपणे वापर केला होता. पण इथं मात्र तो टाळला जात आहे किंवा फारसा केला जात नाहीये.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजप प्रचार

फोटो स्रोत, BBC/Nilesh dhotre

खरंतर तामिळनाडूत भाजप 20 जागाच लढवत आहे आणि तेही अण्णा द्रमुकशी युती करून. पण राजकीय जाहिरातीतही भाजप इथं मागे आहे. ज्या काही जाहिराती केल्या जात आहेत, त्यात मोदींऐवजी भाजपचं चिन्ह कमळाला जास्त प्राधान्य दिलं जात आहे.

नाही म्हणायला 31 मार्चला मोदींच्या रॅलीआधी चेन्नईत एकदोन तामिळी वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या फोटोसह जाहिरात देण्यात आली होती. पण तीही फार छोटी होती.

एवढंच कशाला काही गावांमध्ये रंगवण्यात आलेल्या भींतींवर भाजपच्या उमेदवारांचा उल्लेख 'अम्मांचे उमेदवार' म्हणजेच जयललिता यांचे उमेदवार असा करण्यात आला आहे. त्याचा ट्विटरवर व्हायरल झालेला फोटो सध्या इथं चर्चेचा विषय आहे.

भाजपच्या स्टार उमेदवार खुशबू यांच्या प्रचार मोहिमेवरसुद्धा मोदींचा फोटो न वापरल्यामुळे ट्विटरवरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्यांनी मोदींचा फोटो वापरायला सुरूवात केली आहे, असं एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं.

पण भाजपच्या उमेदवारांना असं का करावं लगतंय?

याबाबत द हिंदूचे वरिष्ठ पत्रकार डी. सुरेश कुमार सांगतात, "नरेंद्र मोदींची प्रतिमा बाहेरचे नेते आणि तामिळविरोधी तयार करण्यात इथल्या स्थानिक पक्षांना यश आलंय. त्यामुळे लोक त्यांच्याकडे बाहेरचे नेते म्हणूनच पाहतात. त्यांची तामिनाडूत अजून म्हणावं तेवढी स्वीकार्हता नाही."

तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजप प्रचार

फोटो स्रोत, BBC/Nilesh dhotre

डीएमके आघाडीनं हाच धागा पकडत नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यांच्या जाहिरातीतून आघात सुरू केला आहे.

'जात आणि धर्मापेक्षा आपली तामिळी ओळख महत्त्वाची आहे. त्यासाठीच डीएमकेला मतदान करा,' असं आवाहन त्यांनी त्यांच्या जाहिरातीतून सुरू केलं आहे.

'मोदी नाही तामिळी अस्मिता महत्त्वाची'

डीएमकेच्या या आघातावर पलटवार करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्यांची तयार झालेली तामिळीविरोधी प्रतिमा बदलण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपनं सुरू केला आहे.

भाजप त्यांच्या जाहिरातींमध्ये 'जतन जतन तामिळी संस्कृतीचं जतन' असं म्हणत आम्ही तामिळी संस्कृती आणि तामिळनाडूचं जतन करू असं आश्वासन देत आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, BBC/Nilesh dhotre

शिवाय तामिळनाडूची मूळ संस्कृती जपण्यासाठी जल्लीकट्टूला परवाना देण्याचं आश्वासन भाजप देत आहे. सर्व शाळांमध्ये 100 टक्के तामिळ शिकवणार असं म्हणत भाजप त्यांच्या जाहिरातीमध्ये तामिळ साहित्य आणि भाषेच्या संवर्धनाचंसुद्धा वचन देत आहे.

कमर्शियल होर्डिंग्जवरून पक्षांच्या जाहिराती का गायब?

खरंतर सध्याच्या जमान्यात डिजिटल जाहिरातींना जास्त प्राधान्य दिलं जातंय. चेन्नईत यूट्यूब उघडलं की अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या जाहिरांतीचा मारा होत आहे.

पण तरीही आपला ठसा लोकांवर जास्तीजास्त उमटवण्यासाठी आणि प्रभावी प्रचारासाठी कमर्शियल होर्डिंगवरच्या जाहिरातींनासुद्धा तेवढंच महत्त्व आहे.

पण तरीही चेन्नईत त्या जाहिराती दिसत नाहीत. असं नाहीये की पक्षांना कमर्शिल होर्डिंग्ज परवडत नाहीयेत. परवडत आहेत. पण जाहिरात कंपन्या मात्र सध्या स्वतःला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची मोठी चर्चा सध्या चेन्नईमध्ये आहे.

सध्या चेन्नईतल्या जाहिरात विश्वात हा सर्वांत मोठ्या चर्चेचा विषय आहे. या क्षेत्रात काम करणारी मंडळी या विषयावर फारशी बोलायला तयार होत नाहीयेत.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, BBC/Nilesh dhotre

डीबीएल मिडिया कंपनीकडे चेन्नईतल्या 600 बस आणि 30 होर्डिंग्जचं कॉन्ट्रॅक्ट आहे. पण त्यांच्या कंपनीकडे आतापर्यंत एकाही राजकीय पक्षानं जाहिरीतीसाठी संपर्क केला नसल्याचा कंपनीचे जनरल मॅनेजर रमेश यांचा दावा आहे. शिवाय यामध्ये वाद होण्याची शक्यता असल्याने कंपन्या स्वतःला राजकीय जाहिरातीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रमेश सांगतात, "चेन्नईतील बऱ्याच कमर्शिल होर्डिंग्जच्या साईट्स खासगी जागेत आहेत. बरेचदा तिथले मालक हे एका पक्षाचे असतात आणि तिथं जाहिरातीसाठी दुसऱ्याच पक्षानं संपर्क केलेला असतो, अशावेळी ही मालक मंडळी ती जाहिरीत लावण्यास विरोध करतात. त्यामुळे वाद नको म्हणून यापासून आम्ही दूरच राहण्याचा प्रयत्न करतो."

पण दोन्ही एकाच पक्षाचे लोक असले तर काय होतं मग असा प्रश्नच उरतोच त्यावर अजून कुणी जाहिरातीसाठी आलंच नाही असं सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात स्वतः पाठिंबा देत असलेल्या पक्षाचं होर्डिंग लावण्यासाठीसुद्धा मालक मंडळी कचरत आहेत, असं या क्षेत्रात काम करणाऱ्या एका एक्सपर्टने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

त्याचं करण म्हणजे आपण पाठिंबा देत असलेल्या पक्षाचं होर्डिंग लावलं आणि उद्या त्यांचं सरकार नाही आलं तर सत्तेत आलेली मंडळी सर्वांत आधी त्यांना टार्गेट करतील आणि त्याचा परिणाम त्यांच्या व्यापारावर होईल म्हणून या क्षेत्रातली मंडळी राजकीय जाहिरातबाजीपासून दूरच राहत असल्याचं संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)